१५ वर्षीय वैभव सूर्यवंशीचा विश्वविक्रम! अवघ्या ११ चेंडूत ठोकले अर्धशतक

Vaibhav Sooryavanshi Fastest Fifty | भारतीय क्रिकेटचा ‘बॉस बेबी’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीने आपल्या वादळी फलंदाजीने क्रिकेट विश्वात नवा इतिहास रचला आहे. भारत ‘अ’ आणि श्रीलंका ‘अ’ यांच्यातील तिरंगी मालिकेच्या अंतिम सामन्यात वैभवने केवळ ११ चेंडूंमध्ये वादळी अर्धशतक झळकावत ‘लिस्ट ए’ (List A) क्रिकेटमधील सर्वात जलद अर्धशतकाचा जागतिक विक्रम आपल्या नावावर केला आहे. संपूर्ण मालिकेत शांत असलेली वैभवची बॅट अंतिम सामन्यात मात्र चांगलीच तळपली.
मैदानावर चौकार-षटकारांचा पाऊस, ४०५ चा स्ट्राईक रेट
अंतिम सामन्यात वैभव सूर्यवंशीचे रौद्र रूप पाहायला मिळाले. त्याने डावाच्या पहिल्याच चेंडूवर चौकार मारत आपले मनसुबे जाहीर केले होते. त्यानंतर न थांबता त्याने श्रीलंकेच्या गोलंदाजांवर अक्षरशः हल्ला चढवला. वैभवने आपल्या ११ चेंडूंच्या खेळीत ६ चौकार आणि ५ गगनचुंबी षटकार ठोकले. यादरम्यान त्याचा स्ट्राईक रेट तब्बल ४०५ होता.
लाँग-ऑनच्या दिशेने मारलेल्या आपल्या पाचव्या षटकारासह त्याने ५० धावांचा टप्पा पार केला आणि २० वर्षांपासून कायम असलेला जागतिक विक्रम मोडीत काढला.
कौशल्या वीररत्नेचा २० वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला
वैभव सूर्यवंशी आता ‘लिस्ट ए’ क्रिकेटच्या इतिहासात सर्वात जलद अर्धशतक झळकावणारा जगातील पहिला फलंदाज ठरला आहे. यापूर्वी हा जागतिक विक्रम श्रीलंकेच्या कौशल्या वीररत्ने याच्या नावावर होता. वीररत्नेने २००५ मध्ये रगामा क्रिकेट क्लबकडून खेळताना १२ चेंडूंमध्ये अर्धशतक झळकावले होते. वैभवने अवघ्या ११ चेंडूत हा पराक्रम करत वीररत्नेला मागे टाकले आहे.
हेही वाचा
अमित शाहांना शिवसेना आणि महाराष्ट्राचा द्वेष; संजय राऊत यांची टीका
सर्फराझ खानचा भारतीय रेकॉर्डही मोडीत
या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर वैभवने भारतीय क्रिकेटमधील एक मोठा विक्रमही आपल्या नावे केला. यापूर्वी ‘लिस्ट ए’ क्रिकेटमध्ये सर्वात जलद अर्धशतक झळकावण्याचा भारतीय विक्रम मुंबईचा फलंदाज सर्फराझ खानच्या नावावर होता. सर्फराझने विजय हजारे ट्रॉफीमध्ये पंजाबविरुद्ध अवघ्या १५ चेंडूंमध्ये अर्धशतक पूर्ण केले होते. वैभवने केवळ ११ चेंडूत अर्धशतक झळकावत सर्फराझचा हा विक्रम ४ चेंडू आधीच मोडीत काढला.
एकच षटकात कुटल्या २६ धावा; वादाला बॅटने दिले उत्तर
अंतिम सामन्यापूर्वी सलग काही सामन्यांत आलेले अपयश आणि याच आठवड्यात प्रतिस्पर्धी खेळाडूसोबत झालेल्या धक्काबुक्कीच्या घटनेमुळे वैभव सूर्यवंशी चांगलाच चर्चेत आला होता. मात्र, या सर्व वादाला त्याने मैदानावर आपल्या बॅटनेच चोख उत्तर दिले.
श्रीलंकेचा गोलंदाज शिराझच्या पहिल्या षटकात दोन चौकार लगावल्यानंतर, वैभवने त्याच्या दुसऱ्या षटकात अक्षरशः धुमाकूळ घातला. त्या एकाच षटकात तीन षटकार आणि दोन चौकार ठोकत त्याने तब्बल २६ धावा वसूल केल्या आणि काही क्षणातच आपले अर्धशतक पूर्ण केले.
भारतीय क्रिकेटचा भावी सुपरस्टार
डिसेंबर २०२४ मध्ये ‘लिस्ट ए’ क्रिकेटमध्ये पदार्पण केल्यापासून अवघ्या १२ सामन्यांचा अनुभव पाठीशी असलेल्या या १५ वर्षीय फलंदाजाने आपल्या अफाट प्रतिभेची झलक दाखवली आहे. देशांतर्गत क्रिकेटमध्ये बिहारकडून खेळताना त्याने १९० धावांची सर्वोत्तम खेळीही साकारली आहे. अत्यंत कमी वयात विक्रमांच्या शिखरावर झेपावणाऱ्या वैभव सूर्यवंशीकडे आता भारतीय क्रिकेटचा भावी सुपरस्टार म्हणून पाहिले जात आहे.





