शिवरायांबाबत केलेल्या विधानावर अमृता फडणवीसांची प्रतिक्रिया
राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबाबत केलेल्या विधानावरून राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. विविध स्तरावरून राज्यपालांच्या विधानाचा निषेध करण्यात येत आहे. दरम्यान, राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनीही यासंदर्भात प्रतिक्रिया दिली आहे. मुंबईत माधमांशी बोलताना त्यांनी यासंदर्भात प्रतिक्रिया दिली.
काय म्हणाल्या अमृता फडणवीस?
”महाराष्ट्राचे सध्याचे राज्यपाल हे एकमेव राज्यपाल आहेत. जे महाराष्ट्रात येऊन मराठी भाषा शिकलेत. मराठी माणसांवर त्यांचे खूप प्रेम आहे. हे मी स्वत: अनुभवलं आहे. मात्र, अनेक वेळा त्यांच्या विधानाचा चुकीचा अर्थ काढण्यात येतो. यापूर्वीही असं अनेकदा घडलं आहे. मात्र, त्यांचे महाराष्ट्रावर प्रेम आहे, हे निश्चित”, अशी प्रतिक्रिया अमृता फडणवीस यांनी दिली आहे.
दरम्यान, यावेळी बोलताना त्यांनी श्रद्धा हत्याकांड प्रकरणावरही प्रतिक्रिया दिली. ”हा अत्यंत धक्कादायक प्रकार असून अशा घटनेच्या मुळाशी जाणं गरजेचं आहे. आरोपीला कठोर शिक्षा होणं गरजेचं आहे. तसेच तपासांत काही त्रृटी राहिल्या असतील, तर तपास करणाऱ्यांवरही कारवाई होणं गरजेचं आहे”, असे त्या म्हणाल्या.





