महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा साखर कारखान्याचे चेअरमन
अजित पवार यांच्या निवडीला विरोधी गटाचा आक्षेप

पुणे : महाराष्ट्रात चर्चेचा विषय ठरलेला आणि याचबरोबर प्रतिष्ठेची निवडणूक बनलेल्या माळेगाव सहकारी कारखान्याच्या निवडणुकीत उपमुख्यमंत्री अजित पवारांचं पारडं जड ठरलं होतं, त्यानंतर आता त्यांची कारखान्याच्या चेअरमनपदावरही निवड केली गेली आहे. यामुळे आता महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री हे साखर कारखान्याचे चेअरमनही झाले आहेत.
खरंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निवडीला विरोधी गटाने आक्षेप घेतला होता. ब वर्गामधून निवडून आलेल्या व्यक्तीस चेअरमन होता येत नाही, असं विरोधकांचं म्हणणं होतं. मात्र त्यावर निवडणूक अधिकाऱ्याने वेळ संपल्याचं कारण देत अजित पवारांची चेअरमन पदावरील निवड कायम ठेवली. याचबरोबर व्हाईस चेअरमनपदावर संगिता कोकरे यांनी निवड झाली आहे.
हेही वाचा – टीकेनंतरही फडणवीसांनी मानले राज ठाकरेंचे आभार, पण उद्धव ठाकरेंना टोला; म्हणाले, “रुदाली…”
माळेगाव कारखान्याच्या संचालक मंडळाने ही बहुमातने निवड केली आहे. तर विरोधी गटाचे एकमेव निवडून आलेले संचालक चंद्ररराव तावरे यांनी या निवडीवर आक्षेप घेतला होता. त्यांनी यासाठी औरंगाबाद खंडपीठाचा तसा निर्णय असल्याचेही सांगितले होते. तसेच, नियमानुसार कामकाज करावं असं म्हणत बैठकीतून काढता पाय घेतला होता.
तर अजित पवारांची निवड बेकायदेशीर असल्याचं विधान निवडणुकीत पराभूत झालेले सहकार बचाव पॅनलचे रंजन तावरे यांनी म्हटलं होतं. मात्र अपेक्षेनुसार विरोधी गटाच्या आक्षेपाचा आणि विरोधाचा काही उपयोग झाला नाही.
२२ जून रोजी बहुचर्चित माळेगाव सहकार कारखान्याची निवडणूक पार पडली होती. निवडणुकीच्या निकालाअंती अजित पवार यांच्या निळकंठेश्वर पॅनलने २१ पैकी २० जागांवर यश मिळवत, विरोधकांचा अक्षरशा धुराळा उडवला. विशेष म्हणजे या निवडणुकीत शरद पवार गटाच्या बळीराजा पॅनलचा एकही उमेदवार निवडून आलेला नाही.