‘कुठे भाजी विकत होतास, मुंबईत काय-काय केलं..’; जरांगे पाटलांचा भुजबळांवर हल्लाबोल

मुंबई : राज्यात मराठा आरक्षणाचा प्रश्न तापलेला असतानाच ओबीसी विरुद्ध मराठा असा संघर्ष सुरू झाला आहे. जालन्यातील आंबड येथे आयोजित ओबीसी एल्गार सभेत छगन भुजबळ यांनी मनोज जरांगे पाटील यांच्यावर त्यांच्या खासगी आयुष्यावर भाष्य करत टीका केली होती. दरम्यान, यावरून मनोज जरांगे पाटील यांनी छगन भुजबळ यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे.
मनोज जरांगे पाटील म्हणाले, तू कुठे भाजी विकत होतास, कोणाचं काय करत होतास, मुंबईत काय-काय केलं, कोणत्या नाटकात आणि चित्रपटात काम केलं याची मला माहिती आहे. तू कोणाचा बंगला बळकावला हेदेखील मला माहिती आहे.
हेही वाचा – Pune : एसटीचा ब्रेक फेल, दोन मोटारींसह पाच दुचाकींना धडक
तू महाराष्ट्रातल्या जनतेचं खाल्लंस, महाराष्ट्र सदनाचा पैसा खाल्ला, महाराष्ट्रात सदनाचा पैसा हा महाराष्ट्रातील जनतेचा होता, तो पैसा तू खाल्लास, त्यामुळे तुला जनतेचा, गोरगरिबांचा तळतळाट लागला. म्हणूनच तू तुरुंगात गेलास. तिथं बेसण-भाकरी खाल्ली. आता म्हणतो तिथे कांदाही मिळत होता. मग अजून कांदा खा. पाच किलो कांदा खा, असंही मनोज जरांगे म्हणाले.
दरम्यान, जरांगेंची मंगळवारी ठाण्यात सभा पार पडली. या सभेतही जरांगेंनी भुजबळांवर टीका केली. म्हातारपणात त्याला काहीच सुचेना झालंय. आपण त्याचं नाव घेत नाही. आपण कोणाचं नाव घेतलंही नाही आणि घेणारही नाही. कारण त्यांची तेवढी लायकी राहिलेली नाही. मुंबईत तो काय करतो ते माहितीय. त्याच्याकडे कोणते पाहुणे राहायला आले होते. त्याने कोणत्या पिक्चरमध्ये काम केलंय. मला त्याच्याबद्दल सगळं माहितीय, असं मनोज जरांगे म्हणाले.





