SBI उद्यापासून आठवडाभर बंद, अत्यावश्यक कामे आजच पूर्ण करा; कोणत्या सेवा सुरु अन् कोणत्या बंद राहणार?

SBI: देशातील सर्वात मोठी सार्वजनिक क्षेत्रातील बँक असलेल्या एसबीआयच्या (SBI) ग्राहकांनी आजच (22 मे) आपली सर्व महत्त्वाची शाखा-संबंधित कामे पूर्ण करावीत. कारण एसबीआयच्या शाखा 23 ते 28 मे 2026 या काळात सलग सहा दिवस बंद राहण्याची शक्यता आहे. यामागील मुख्य कारणे म्हणजे वीकेंड, प्रस्तावित दोन दिवसांचा कर्मचारी संप आणि भारतीय रिझर्व्ह बँकेने (RBI) बकरीद (ईद-उल-अजहा) निमित्त जाहीर केलेली दोन दिवसांची सुट्टी.
| प्रभावित सेवा (Affected Services) | सामान्य/चालू सेवा (Active Services) |
| शाखेत (Branch) जाऊन पैसे काढणे किंवा जमा करण्याचे काम होणार नाही | एसबीआयचे (SBI) एटीएम चालू राहतील, जिथून तुम्ही कॅश काढू शकता |
| संप आणि सुट्ट्यांमुळे चेक क्लिअर (Cheque Clear) होण्यासाठी वेळ लागेल | एसबीआयचे अधिकृत ॲप ‘योनो‘ (YONO) पूर्णपणे काम करेल |
| बँक काउंटरवरून पासबुक प्रिंटिंग किंवा स्टेटमेंट काढण्याची सुविधा बंद राहील | नेट बँकिंगद्वारे फंड ट्रान्सफर (NEFT, RTGS, IMPS) ची सुविधा चालू राहील |
| नवीन बँक खाते उघडणे, एफडी (FD) करणे किंवा लोनशी (कर्ज) संबंधित कामे बंद राहतील | गुगल पे, फोनपे, पेटीएम याद्वारे डिजिटल पेमेंट नेहमीप्रमाणे सुरू राहतील |
| डिमांड ड्राफ्ट (DD) बनवणे किंवा टॅक्स चालान जमा करणे यांसारखी कामे बंद राहतील | ग्राहक आपल्या मोबाईल बँकिंग किंवा ईमेलद्वारे अकाउंट बॅलन्स आणि स्टेटमेंट पाहू शकतील |
हेही वाचा – शुभमन गिलने आधी पकडला सीझनचा सर्वात भयंकर कॅच! नंतर थेट चेन्नईच्या चाहत्यांनाच डिवचलं
23 ते 28 मे दरम्यान एसबीआय बँका का बंद राहू शकतात?
23 ते 28 मे दरम्यान बँकांच्या कामकाजात व्यत्यय येण्याची विविध कारणे आहेत.
-वीकेंडच्या सुट्ट्या: 23 मे हा महिन्याचा चौथा शनिवार आहे आणि 24 मे हा रविवार आहे. नियमानुसार, देशातील सर्व बँका प्रत्येक महिन्याच्या दुसऱ्या आणि चौथ्या शनिवारी बंद असतात, त्यामुळे या दोन दिवशी बँका बंद राहतील.
-एसबीआय कर्मचारी संप: ऑल इंडिया स्टेट बँक ऑफ इंडिया स्टाफ फेडरेशनने विविध मागण्यांसाठी 25 आणि 26 मे (सोमवार आणि मंगळवार) रोजी दोन दिवसांच्या देशव्यापी संपाचा प्रस्ताव दिला आहे. याचा बँकेच्या कामकाजावर थेट परिणाम होऊ शकतो.
-बकरी ईदची सुट्टी: भारतातील वेगवेगळ्या राज्यांमध्ये बकरी ईदचा सण वेगवेगळ्या दिवशी साजरा केला जाईल, ज्यासाठी आरबीआयने दोन दिवसांची सुट्टी जाहीर केली आहे. देशाच्या बहुतांश भागांमध्ये बकरीदनिमित्त 27 मे रोजी एसबीआय बंद राहील, तर काही भागांमध्ये 28 मे रोजी सुट्टी असेल. जम्मू आणि काश्मीर या केंद्रशासित प्रदेशात 27 आणि 28 मे या दोन्ही दिवशी बँका बंद राहतील.
ऑल इंडिया स्टेट बँक ऑफ इंडिया स्टाफ फेडरेशनने (AISBISF) 16 मागण्यांसाठी संपाची घोषणा केली आहे. कर्मचाऱ्यांचे हक्क जपण्यासाठी, कामाची परिस्थिती सुधारण्यासाठी आणि ग्राहकांच्या हिताचे रक्षण करण्यासाठी हा संप पुकारण्यात आला आहे.
हा संप ‘कामगार प्रवर्गा’साठी (लिपिक आणि इतर कर्मचारी) असल्याने, चेक क्लिअरिंग, कॅश काउंटर आणि पासबुक अद्ययावतीकरण यांसारख्या कामांमध्ये व्यत्यय येऊ शकतो.





