‘संभाजीनगर’वरून शिवेसना आणि काँग्रेसमध्ये नुरा कुस्ती- देवेंद्र फडणवीस
नागपूर- औरंगाबादचं नाव संभाजीनगर करण्याला काँग्रेसचा विरोध आहे. यावरून शिवसेना आणि काँग्रेस यांच्या नुरा कुस्ती सुरू असल्याची टीका विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. ते नागपूरमध्ये पत्रकारांशी बोलत होते.
औरंगाबाद महापालिकेची निवडणूक जवळ आली आहे म्हणून शिवसेनेला हा मुद्दा आठवतो आहे असंही फडणवीस यांनी म्हटलं आहे. महानगरपालिकेची निवडणूक जवळ आली आहे त्यामुळेच शिवसेनेने पुन्हा एकदा नामांतराचा विषय समोर आणला आहे. महानगरपालिकेची निवडणूक झाली की शिवसेनेला या मुद्द्याचा विसर पडेल असंही देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. काँग्रेसने औरंगाबादच्या संभाजीनगर या नामकरणाला विरोध केला काय किंवा नाही केला काय? शिवसेनेला हा मुद्दा फक्त निवडणुकीपुरता हवा असतो. या मुद्द्यावरुन शिवसेना आणि काँग्रेस यांच्यात नुरा कुस्ती सुरु आहे असा टोला फडणवीस यांनी लगावला आहे.
आज देवेंद्र फडणवीस यांनी २०२१ हे वर्ष सगळ्यांना आनंदाचं आणि सुखासमाधानाचं जावो असंही म्हटलं आहे. तसंच यंदाच्या वर्षी तरी राज्य सरकार शेतकरी आणि मजुरांना मदत करेल अशी इच्छाही त्यांनी व्यक्त केली.





