ताज्या घडामोडीमुंबई

सामाजिक दुहीविरोधात ‘श्वेतब्रिगेड’चा महाराष्ट्र दिनी शांतीचा संदेश

 मुंबई|सहेतुक निर्माण केल्या जाणाऱ्या दुहीच्या वातावरणाचा विरोध करत राज्यभरातून अनेक नागरिकांनी शांततेच्या मार्गाने रविवार, १ मेच्या महाराष्ट्र दिन आणि कामगार दिनाच्या पार्श्वभूमीवर यशस्वी उपक्रम राबवला. राज्यात ज्या ठिकाणी पोलिस परवानगी मिळाली, तिथे नागरिकांनी शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापाशी जमून पांढऱ्या रंगाच्या वेशामध्ये उपस्थिती लावून शांततेचा संदेश लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला.

चिथावणीखोर वक्तव्ये, भडकावू भाषणे, आक्रस्ताळी आवाहने आणि यातून समाजाच्या मनःस्वास्थ्यावर आणि कृतीवरही परिणामांची भीती अनेकांना वाटत आहे. यामुळेच काही नागरिकांनी एकत्र येऊन १ मे रोजी शांतता प्रस्थापित करण्याची मागणी करत अशा वागणुकीला विरोध केला. यासंदर्भात नाट्यकर्मी अतुल पेठे यांनी या कार्यक्रमासाठी १० हजारांहून अधिक लोकांच्या सहमती दर्शवणाऱ्या सह्या गोळा झाल्या, असे सोशल मीडियावरून जाहीर केले.

मुंबईमध्ये बोरिवली येथे पश्चिम द्रुतगती मार्गालगत मागाठाणे डेपोच्या चौकात शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर तसेच मालाड मालवणी येथे हातात पांढरा कागद घेऊन मुंबईकरांनी आपली अस्वस्थता व्यक्त केली. या वेळी अभिनेता संदीप मेहता, सामाजिक कार्यकर्ते विजय तांबे, आशुतोष शिर्के, शरद कदम, पत्रकार मुकुंद कुळे, कवयित्री नीरजा, राजन धुळेकर, अभिनेत्री चिन्मयी सुमीत आदी उपस्थित होते. मालवणी येथे राष्ट्र सेवा दलाचे निसार अली यांच्या पुढाकाराने लोकांनी आपली अस्वस्थता व्यक्त केली. प्रत्यक्ष कार्यक्रमांसोबतच राज्यातील विविध सामाजिक कार्यकर्ते, सजग नागरिक, शिक्षक, कलाकार यांनीही आपली अस्वस्थता पांढऱ्या रंगाचे कपडे घालून किंवा हातात पांढरा कागद घेऊन व्यक्त केली.

५० ठिकाणी कार्यक्रम

महाराष्ट्रात किमान ५० ठिकाणी लोकांनी शांततामय कार्यक्रम उत्स्फूर्तपणे राबविला. यातही तरुणांचा सहभाग मोठा होता. शेकडो लोकांनी घरातून फोटो पाठवले. पक्ष, संघटना किंवा कोणी एका व्यक्तीने हा कार्यक्रम न राबवता समाजातील जबाबदार नागरिकांनी याला पाठिंबा दिला. काही पोलीस अधिकारीही यात सामील झाले होते, असेही त्यांनी सोशल मीडियावर सांगितले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button