breaking-newsताज्या घडामोडीमराठवाडा

औरंगाबाद-घाटी येथील कोविडग्रस्त मातेने दिला बाळास जन्म; दोघांचीही प्रकृती स्थिर

औरंगाबाद ।महाईन्यूज । प्रतिनिधी

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (घाटी) येथे शनिवारी (दि.2 मे रोजी) मध्यरात्री 1.30 वाजता बायजीपुऱ्यातील 28 वर्षीय गरोदर महिला दाखल झाली. त्या महिलेने शनिवारीच दुपारी 12.30 वाजता चिमुकलीस जन्म दिला. मात्र, या मातेचा कोविड अहवाल पॉझिटिव्ह आला. त्यामुळे मातेस कोविड कक्षात दाखल करून पुढील उपचार सुरू करण्यात आलेले आहेत. चिमुकलीचे वजन 2.8 किलो आहे. बाळ आणि बाळांतीण दोघींचीही तब्येत स्थिर आहे. बाळावर नवजात शिशु विभागात उपचार सुरू आहेत. प्रसुती प्रक्रिया यशस्वीतेसाठी अधिष्ठाता डॉ.येळीकर, स्त्री रोग व प्रसुती शास्त्र विभागाचे डॉ. श्रीनिवास गडप्पा यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. प्रशांत भिंगारे,  डॉ. राहुल इंगळे, डॉ. तनिज फातिमा, डॉ. रूची पुजारा, डॉ.शशी, डॉ. प्रियंका केशरवाणी, डॉ. अश्विनी होतकर, परिचारिका सुनिता चक्रनारायण, किरण डोंगरदिवे यांनी कामगिरी पार पडली.

घाटीत 25 कोविड पॉझिटिव्ह रुग्ण

आज दुपारी चार वाजेपर्यंत घाटी रुग्णालयात 69 रुग्ण भरती झाले आहेत. त्यापैकी 12 रुग्ण संशयित आहेत. त्यांचा अहवाल येणे बाकी आहे. घाटीच्या कोविड डेडिकेटेड रुग्णालयात 25 कोविड पॉझिटिव्ह रुग्णांवर उपचार सुरू आहेत.  त्यापैकी 21 रुग्णांची स्थिती सामान्य आहे. चार रुग्णांची स्थिती गंभीर आहे. तर घाटीत 32 कोविड निगेटीव्ह रुग्णांवर उपचार सुरू आहेत. एकूण 21 कोविड निगेटीव्ह बरे झाल्याने त्यांना घरी सोडण्यात आल्याचे  घाटीच्या अधिष्ठाता डॉ. कानन येळीकर व माध्यम समन्वय डॉ. अरविंद गायकवाड यांनी सांगितले.

जिल्ह्यात 282 कोविड रुग्ण, एकास डिस्चार्ज

औरंगाबाद शहरातील कोविड रुग्ण संख्येत काल रात्रीपासून (2 मे) सकाळपर्यंत एकूण 30 कोविड रुग्णांची वाढ झाली. काल रात्री उशीरा (कंसात रुग्ण संख्या) नंदनवन कॉलनी (1), जयभीम नगर (12) अशा एकूण 13 रुग्णांची वाढ झाल्याने 257 कोविड रुग्ण 2 मेपर्यंत आढळले. तर आज सकाळी इंदिरा नगर, बायजीपुरा (1), मुकुंदवाडी (16), संजय नगर (5), गुलाबवाडी जय भीम नगर (3) येथील एकूण 25 रुग्णांची भर पडल्याने आतापर्यंत जिल्ह्यात 282 कोविड रुग्ण आढळल्याचे जिल्हा सामान्य रुग्णालय प्रशासनाच्यावतीने  कळविण्यात आले आहे.

 मिनी घाटीत आज आठ जणांची तपासणी करून त्याचे स्वॅब घेण्यात आले. 41 जणांच्या लाळेचे नमुने तपासणीसाठी घाटीच्या प्रयोगशाळेत पाठविण्यात आले आहेत.  औरंगाबाद शहरातील बायजीपुरा येथील 15 वर्षीय रुग्णाचा चाचणी अहवाल निगेटीव्ह आल्याने त्या रूग्णास आज सुटी देण्यात आल्याने आतापर्यंत 25 रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. मिनी घाटीत आता 90 पॉझिटिव्ह रुग्णांवर उपचार सुरू आहेत, असेही कळविण्यात आले आहे.

दरम्यान, कोरोनाचे संकट मोठे आहे. त्यावर मात करण्यासाठी आम्ही लढा देत आहोत.  लढा देत असताना समाजातून प्रोत्साहन मिळते आहे. लष्कराकडून देण्यात आलेल्या मानवंदनेमुळे या कोरोनाविरुद्धच्या लढ्यात लढण्यासाठी अधिक बळ मिळाल्याची भावना शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या (घाटी) अधिष्ठाता डॉ. कानन येळीकर यांनी व्यक्त केली. 

कोरोनाच्या आपात्कालिन परिस्थ‍ितीवर मात करणाऱ्या, कोरोना रुग्णांच्या सेवेसाठी अहोरात्र योद्ध्यांप्रमाणे सेवा बजावणाऱ्या कोरोना योद्ध्यांना मान व प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न म्हणून लष्कराच्यावतीने आज घाटीच्या परिसरात जाऊन कोरोना योद्ध्यांना मानवंदना देण्यात आली. यावेळी छावणी परिषदेचे ब्रिगेडिअर यू. एस. आनंद, अजय लांबा, हरमिंदर सिंग, आर.के. सिंग या लष्कर अधिका-यांची उपस्थिती होती. मानवंदना स्वीकारल्यानंतर डॉ. येळीकर, ब्रिगेडिअर आनंद यांनी त्यांच्या भावना व्यक्त केल्या.

घाटीमध्ये सुरू असलेल्या कोरोना रुग्णांवरील उपचार, घाटीमध्ये देण्यात येत असलेल्या विविध सोयी सुविधा प्रयोगशाळा आदींसह विविध कामांची माहिती लष्करी अधिकाऱ्यांना दिली. घाटीच्या अधिकारी, कर्मचारऱ्यांचे आभार मानण्यात येणारी फ्रेम लष्कराच्यावतीने डॉ. येळीकर यांना भेट देण्यात आली. यावेळी डॉ. येळीकर यांच्यासमवेत घाटीचे उपाधिष्ठाता डॉ. मोहन डोईबळे, डॉ.सुधीर चौधरी, कर्करोग रुग्णालयाचे विशेष कार्य अधिकारी तथा माध्यम समन्वयक डॉ. अरविंद गायकवाड, वैद्यकीय अधीक्षक डॉ. सुरेश हरबडे, नवजात व शिशु विभागाचे प्रमुख डॉ.एल.एस.देशमुख, डॉ.अनिल धुळे, डॉ.अमरनाथ आवरगावकर, डॉ.सोनल येळीकर यांनीही लष्कराच्या या भेटवस्तूचा स्वीकार करत लष्करी अधिका-यांचे आभार मानले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button