breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

लोकसंवाद : भाजपाने कितीही ताकद लावावी; राष्ट्रवादीचा ‘टायगर अभी जिंदा है’..!

पिंपरी । विशेष प्रतिनिधी

२०१९ मध्ये विधानसभा निवडणुकांनंतर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी एक डॉयलॉग मारला होता. ‘‘आता विरोधकांनाही समजले असेल, टायगर अभी जिंदा है..’’ हा डॉयलॉग राज्यात सोशल मीडियावर प्रचंड गाजला. जयंत पाटील यांचे निकटवर्ती आणि पिंपरी-चिंचवडच्या राजकारणातील ‘शरद पवार’ अशी ओळख असलेल्या माजी आमदार विलास लांडे यांच्याबाबत तंतोतंत लागू पडतो.
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या स्थापनेनंतर पिंपरी-चिंचवड महापालिकेत सलग १५ वर्षे राष्ट्रवादीने सत्ता गाजवली. या काळात शहराचे नेते असलेल्या माजी आमदार विलास लांडे यांनी शहराचे नेतृत्व राज्यात केले. २०१४ मध्ये लांडे यांचा पराभव झाला. तशी शहरात राष्ट्रवादीला उतरती कळा लागली. २०१७ मध्ये महापालिकेतील सत्ताही गमवावी लागली. राष्ट्रवादीला विरोधी बाकावर बसावे लागले.
दरम्यान, माजी आमदार विलास लांडे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आणि पवार कुटुंबियांशी असलेली ‘निष्ठा’ कायम ठेवली. भाजपाकडे निरंकूश बहुमत असतानाही लांडे यांनी विविध मुद्यांवर भाजपाच्या आमदारांना ‘लक्ष्य’ केले. मध्यंतरी राष्ट्रवादीचे ‘कारभारी’ असलेल्या उपमुख्यमंत्री अजित पवारांसोबत मनभेद असल्याचे बोलले जात होते. पण, लांडे यांनी प्रसंगावधान राखून परिस्थिती नियंत्रणात आणली. राष्ट्रवादीची तिसरी पिढी असलेल्या युवा नेते पार्थ पवारांच्या विचारांशी जुळते घेतले.
आजच्या घडीला राष्ट्रवादीचा राज्यातील कोणत्याही नेत्याच्या पिंपरी-चिंचवड दौरा विलास लांडे यांच्या भेटीशिवाय पूर्ण होत नाही. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा दस्तुरखुद्द शरद पवार, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील, युवकचे प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख, शिरुरचे खासदार अमोल कोल्हे यांच्यासह आजी-माजी नेते, आमदारांचा लांडे यांच्यासोबत कौटुंबिक जिव्हाळा आहे.
२०१९ मधील विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर विलास लांडे राजकीय क्षेत्रातून अलिप्त राहतील, असा दावा करण्यात येत होता. मात्र, लांडे यांनी राजकीय जाणकारांचे अंदाज खोटे ठरवले. सध्यस्थितीला लांडे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीत ‘डिसिझन मेकर’ आहेत, हे मान्य करायला हवे.
**
लांडे- खडसेंच्या भेटीने भाजपाला धडकी…
दोन-तीन दिवसांपूर्वी राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी पिंपरी-चिंचवडमध्ये दौरा केला. पूर्वाश्रमी भाजपामध्ये असल्यामुळे भाजपाचे सभागृह नेते नामदेव ढाके आणि माजी सभागृह नेते एकनाथ पवार यांनी जाहीरपणे खडसेंची भेट घेतली. भाजपाकडून ही भेट कौटुंबिक होती. त्यामुळे राजकीय अर्थ काढू नये, असा दावा केला. पण, खडसेंच्यासोबत विलास लांडे या भेटीला उपस्थित असल्यामुळे भाजपाच्या गोटात खळबळ उडाली. लवकरच २० ते २२ नगरसेवक भाजपातून राष्ट्रवादीत जाणार, अशा आशयाच्या बातम्या येवू लागल्या. त्यामुळे भाजपाला अक्षरश: धडकी भरली होती.
**
लांडेंच्या विचाराचा शहराध्यक्ष होणार?
दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये संघटनात्मक बदलाबाबत चर्चा आहे. शहराध्यक्ष संजोग वाघेरे यांनी अध्यक्षपदाचा राजीनामा दिला असून नवीन अध्यक्ष निवडीची प्रक्रिया जवळपास होतच आलेली आहे. राष्ट्रवादीकडून शहर अध्यक्षपदासाठी भोसरीतील माजी स्थायी समिती सभापती अजित गव्हाणे यांचे नाव जवळपास निश्चित झाले आहे. अजित गव्हाणे हे माजी आमदार विलास लांडे यांचे निकटवर्तीय आणि अत्यंत विश्वासू समजले जातात. गव्हाणे यांचे नाव अध्यक्षपदासाठी समोर येणे हे विलास लांडे यांच्या मुरब्बी राजकारणाचाच एक भाग आहे, असेही बोलले जात आहे
**
पुणे विधान परिषदेची गणिते…
माजी आमदार लांडे मुरब्बी आणि दूरदृष्टीचा नेता आहेत. महाविकास आघाडीची सत्ता राज्यात आहे. राज्यातील विधान परिषदेच्या ७ जागा लवकरच रिक्त होणार आहेत. यामध्ये पुण्यातील अनिल भोसलेंची एक जागा आहे. गतवेळी म्हणजे सहा वर्षांपूर्वी याच जागेवर लांडे यांनी दावा केला होता. त्यावेळी राष्ट्रवादीच्या पक्षश्रेष्ठींनी लांडे यांना माघार घ्यायला लावली होती. आता ती संधी पुन्हा एकदा लांडे यांच्याकडे आली आहे. किंबहुना, विलास लांडे यांच्याइतका सक्षम उमेदवार राष्ट्रवादीकडे नाही, ही वस्तुस्थिती आहे. त्यामुळे आगामी महापालिका निवडणुकीत पक्षाला गतवैभव अर्थात विजय मिळवून देण्यात लांडे सर्वस्व पणाला लावतील. त्याची बक्षीसी म्हणून लांडेंना विधान परिषदेवर संधी देण्यात येईल, असे निरीक्षण राजकीय जाणकार नोंदवताना दिसतात.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button