breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रविदर्भ

पोटच्या मुलींना रेल्वे स्थानकावर सोडून महिला प्रियकरासोबत गेली, सहा दिवसांनी परतली तेव्हा…

नागपूरः पोटच्या दोन मुलींना रेल्वेस्थानकावर सोडून प्रियकरासोबत निघून गेलेली महिला सहा दिवसांनंतर नागपुरात परतली. ‘मला माझ्या मुली हव्या आहेत’, अशी विनंती तिने रेल्वे पोलिस आणि वरदान संस्था संचालित रेल्वे चाइल्डलाइनकडे केली. मात्र, बालकल्याण समितीच्या आदेशानंतरच मुलींना सुपूर्द करता येत असल्याचे सांगत आईला परत पाठविण्यात आले.

एका मुलीचे वय चार वर्षे तर दुसरी केवळ दोन वर्षांची आहे. रेल्वेस्थानकावरील प्लॅटफॉर्म क्रमांक एकवर त्यातील एकीचा रडण्याचा आवाज तेथील दुकानदाराने २५ मेच्या रात्री ऐकला. मुलीजवळ कुणीच दिसत नसल्याने चाइल्डलाइनच्या कार्यालयात त्या मुलीला नेण्यात आले. परिसरात शोध घेतल्यानंतर आणखी एक मुलगी तिथे आढळली. सीसीटीव्ही तपासले असता अर्ध्या तासापूर्वी एक महिला त्यांच्यासोबत होती.

मात्र, मुलींना सोडून एका पुरुषाच्या मागे ती रेल्वेत बसून निघून गेली असल्याचे दिसले. या सीसीटीव्ही फुटेजच्या आधारावर रेल्वे पोलिसांनी तपास केला. इटारसी रेल्वे पोलिसांशी संपर्क साधून सीसीटीव्हीत आढळलेल्या महिलेचा शोध घेण्यात आला. मात्र, ती महिला सापडली नव्हती. आपले नावही नीट सांगता येत नसलेल्या या मुलींना चाइल्डलाइन, रेल्वे पोलिसांनी जेवायला दिले, चांगले कपडे दिले. त्यांना धीर दिला. त्या दोन्ही मुलींची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. त्यानंतर त्यांना श्रद्धानंद अनाथालयात ठेवण्यात आले. येथे मुलींची योग्य काळजी घेतली जात आहे.

अशीही बेपर्वाई…

‘मुलींचा योग्य सांभाळ व्हावा, याला प्राधान्य देण्यात येईल. या माझ्याच मुली असून माझ्या ताब्यात द्या’, असे म्हणणाऱ्या या महिलेकडे या मुली तिच्याच आहेत, याचा कुठलाही पुरावा नाही. मुलींना रेल्वेस्थानकावर असेच सोडून का गेली, याबाबत रेल्वे पोलिसांनी विचारले असताना त्या महिलेने घडलेला प्रकार सांगितला. माझ्या पतीचा मृत्यू झाला आहे. लग्न करण्याचे आश्वासन एका पुरुषाने मला दिले. मात्र, या मुलींना तात्पुरते इथेच सोड, अशी अट टाकली. लग्न झाल्यानंतर आपण त्यांना घेऊन जाऊ, असेही सांगितले. या महिलेनेही तसेच केले आणि रेल्वेस्थानकावरच या चिमुकल्यांना सोडून ती त्या पुरुषासोबत निघून गेली. मात्र, त्या पुरुषांच्या कुटुंबीयांनी तिला स्वीकारले नसल्याने ती पुन्हा नागपुरात परत आली, असे या महिलेचे म्हणणे आहे.

हृदय द्रवले नाही?

पोटच्या चिमुकल्या मुलींना रेल्वेस्थानकावर सोडून जाताना या महिलेला काहीच कसे वाटले नाही, तिचे हृदय द्रवले नाही का, असा संतप्त सवाल नागरिकांतून उपस्थित झाला. भांबावलेल्या त्या मुली रेल्वेस्थानकावर रडत होत्या. वेळीच सहृदयांचे त्यांच्याकडे लक्ष गेले म्हणून ठीक झाले. काही अनुचित प्रकार घडला असता तर काय झाले असते, असा उद्विग्न सवालही उपस्थित करण्यात आला.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button