breaking-newsTOP NewsUncategorizedताज्या घडामोडीराजकारणराष्ट्रिय

काँग्रेसला हवा निवडून आलेला पूर्णवेळ अध्यक्ष: पृथ्वीराज चव्हाण

मुंबई: ‘काँग्रेस पक्षाच्या घटनेनुसार गेल्या २४ वर्षांमध्ये पक्षांतर्गत निवडणुका झालेल्या नाहीत. काँग्रेस कार्यकारिणी, संसदीय मंडळ किंवा निवडणूक समिती या कोणत्याच समितीवरील सदस्य निवडून आलेले नाहीत. सध्याचे अध्यक्षही अंतरिम स्वरूपाचे आहेत. त्यामुळे काँग्रेसला सध्या गरज आहे ती निवडून आलेल्या पूर्णवेळ अध्यक्षांची; मग ते कोणत्याही परिवाराचे असोत…’ अशी स्पष्टोक्ती महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केली आहे.

‘टाइम्स ऑफ इंडिया’च्या संकेतस्थळाला दिलेल्या मुलाखतीत चव्हाण यांनी आपली मते सविस्तरपणे मांडली आहेत. काँग्रेसमधील नाराज असलेल्या २३ प्रमुख नेत्यांमध्ये चव्हाण यांचाही समावेश होता. या मुलाखतीमध्ये चव्हाण म्हणाले, ‘कपिल सिब्बल यांच्यासारखा नेता अस्वस्थ होऊन दुसऱ्या पक्षाच्या पाठिंब्यावर राज्यसभेची निवडणूक लढवीत आहे. पक्षात असलेली अस्वस्थता त्यातूनच पुढे आली आहे. आम्ही २३ जणांनी याचबाबत पक्षाध्यक्ष सोनिया गांधी यांना पत्र लिहिले होते. नरेंद्र मोदी व अमित शहा यांच्या विरोधात लढा देण्यासाठी पक्षाला पूर्णवेळ कार्यरत असलेल्या व रोज कार्यकर्त्यांना भेटेल अशा अध्यक्षाची गरज आहे.’
‘गेल्या २४ वर्षांत काँग्रेसमध्ये निवडणुका झालेल्या नाहीत. आता नवीन रक्ताला वाव देण्यासाठी या निवडणुका होणे आवश्यक आहे. काँग्रेसला नवीन अध्यक्ष हवा आहे, तो निवडून आलेला हवा; भले तो कोणत्याही परिवाराचा सदस्य असो. पूर्ण वेळ अध्यक्ष असेल तर सहकारी पक्षांनाही चर्चा करणे शक्य होते. त्यांच्यामध्येही स्पष्टता राहते. विरोधी पक्षांचे नेतृत्व करण्यासाठी हे आवश्यक आहे,’ असे त्यांनी नमूद केले.

ते पुढे म्हणाले, ‘उदयपूर येथे झालेले पक्षाचे शिबिर हे चिंतन शिबिर नव्हते; तर नवसंकल्प शिबिर होते. चिंतन करून झालेल्या चुका नेमक्या शोधणे, त्यावर उपाययोजना करणे हे आवश्यक होते. ते केल्याशिवाय भविष्याचा मार्ग शोधणे अवघड आहे. अगदी उदाहरण द्यायचे झाले, तर नुकत्याच झालेल्या गोव्याच्या निवडणुकीदरम्यान प्रचाराला गेलो असता तेथील मतदारांनी आम्हाला गेल्या निवडणुकीनंतर काँग्रेसने सरकार का स्थापन केले नाही, याचा जाब विचारला. त्याचे उत्तर आमच्याकडे नव्हते.’

भाजपच्या हिंदुत्वाला उत्तर देण्याचे आव्हान

‘भाजपच्या हिंदुत्वाच्या कार्यक्रमाला काँग्रेस कसे उत्तर देणार हे सगळ्यात मोठे आव्हान आहे,’ असे नमूद करून चव्हाण म्हणाले, ‘काही वेळा आम्ही अशा मुद्द्यांवर भूमिका घेत नाही अशी टीका होते. काही प्रमाणात ती खरीदेखील आहे. उदयपूरच्या शिबीरातही हा मुद्दा चर्चेला आला पण त्यावर काहीही निर्णय होऊ शकला नाही. अशा मुद्द्यांवर पक्षाची भूमिका ठरविणे हे नेतृत्वापुढील मोठे आव्हान आहे. उद्या काँग्रेसनेही हिंदुत्वाचा मुद्दा घेतला, तरीही भाजपसारख्या पक्षाचा पर्याय असताना मतदार काँग्रेसकडे परत का येतील, हा मुद्दा राहतोच. त्यामुळे अशा मुद्द्यांवर सैद्धांतिक पातळीवर स्पष्टता असणे गरजेचे आहे.’

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button