breaking-newsTOP Newsकोकणताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबईराजकारण

तोंडात सत्तेचा बोळा कोंबला असता, तर उद्धव ठाकरे मोदींविरोधात बोलले असते का? : राज ठाकरे

लोकसभा निवडणूक : कणकवली येथे नारायण राणे यांच्या प्रचारार्थ सभा

कणकावली: ‘‘श्री. उद्धव ठाकरे म्हणतात अडीच-अडीच वर्षाचा शब्द पाळला नाही म्हणून मी युतीतून बाहेर पडलो. ह्याचा अर्थ समजा भाजपाने अडीच वर्ष मुख्यमंत्रीपद दिले असते तर हे मोदींविरोधात बोलले असते का? ह्याचा अर्थ सत्तेचा बोळा तोंडात कोंबला असता तर आज विरोधात नसते’’, अशी घणाघाती टीका मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी केली आहे.

कणकवली येथे महायुतीचे उमेदवार नारायण राणे यांच्या प्रचारानिमित्त आयोजित जाहीर सभेत राज ठाकरे बोलत होते.

राज ठाकरे यांच्या भाषणातील महत्त्वाचे मुद्दे : 

– शिवतीर्थावरील गुढीपाडवा मेळाव्यातील भाषणानंतर जाहीर सभा घेण्याचा मनोदय नव्हता पण नारायणराव राणेंशी असलेला स्नेह आणि आग्रहामुळे त्यांना नाही म्हणून शकलो नाही. कारण ते माझे जुनेसहकारी आणि मित्र आहेत.

– जितकं आपलं तळकोकण देखणं आहे तितकीच इथली जनताही सुजाण आहे कारण महाराष्ट्र राज्याला ९ भारतरत्न आहेत त्यापैकी ७ भारतरत्न एकट्या कोकणातून येतात.

– माझी राजकीय वाटचाल आडेवेढे घेणारी नसते… सरळ आणि सुस्पष्ट असते. एखादी भूमिका पटली तर मी समर्थन करतो आणि नाही पटली तर टोकाचा विरोध करतो.

– २०१४ ते २०१९ मोदी सरकारकडून जी धोरणं आखली गेली त्यातल्या ज्या नाही पटल्या त्यांना २०१९ निवडणुकांमध्ये दाखवून जाहीर विरोध केला. नोटबंदी, पुतळ्यावर खर्च करणं अशा अनेक बाबी आजही नाही पटत. पण जेव्हा काश्मीरमधलं ३७० कलम रद्द झालं, तेव्हा पहिलं अभिनंदन करणारा मीच होतो.

– देश स्वतंत्र झाल्यापासून ३७० कलम रद्द करा ही मागणी होती. का? तर आपल्या देशाच्या भागात काश्मीरमध्ये एक इंचही जमीन खरेदी करू शकत नाही. असं ३७० कलाम आज मोदी सरकारने रद्द केलं हे मान्यच करावं लागेल.

– राम मंदिर उभं राहिलं आणि कारसेवकांच्या आत्म्याला शांती मिळाली. आताच सुप्रीम कोर्ट आणि प्रामुख्याने सत्तेत श्री. नरेंद्र मोदी नसते तर हे राममंदिर उभं राहिलंच नसतं.

– मित्राची खरडपट्टी काढताना आपण मागेपुढे पाहू नये आणि शत्रूची स्तुती करतानाही आपण मागे पुढे पाहू नये. – २०१९ च्या निवडणुकांमध्ये माझी मांडणी लक्षपूर्वक ऐका आजच्या विरोधी पक्षांची बोलायचीही हिंमत होणार नाही इतके तीक्ष्ण प्रश्न मी उपस्थित केले होते कारण ते माझा हेतू शप्ष्ट होता तो विरोध फक्त धोरणांसाठीचा होता. मला काहीतरी हवं म्हणून नव्हते.

– श्री. उद्धव ठाकरे म्हणतात अडीच-अडीच वर्षाचा शब्द पाळला नाही म्हणून मी युतीतून बाहेर पडलो. ह्याचा अर्थ समजा भाजपाने अडीच वर्ष मुख्यमंत्रीपद दिले असते तर हे मोदींविरोधात बोलले असते का? ह्याचा अर्थ सत्तेचा बोळा तोंडात कोंबला असता तर आज विरोधात नसते.

– कोकणातले उद्योगधंदे गुजरातला जात आहेत असं श्री. उद्धव ठाकरे म्हणाले. मला एकंच प्रश्न विचारायचा आहे, वर्ष २०१४ ते २०१९ तुम्ही भाजप बरोबर सत्तेत होतात नंतर २०१९ ते २०२२ स्वतः मुख्यमंत्री होतात म्हणजे गेल्या दहा वर्षात तुम्ही साडेसात वर्ष सत्तेत होतात मग उद्योग गुजरातला गेलेच कसे? तुम्ही विरोध का केला नाहीत?

– उद्योगधंदा आला कि उद्धव ठाकरेंचा खासदार विरोध करणार आणि आमदार पाठिंबा देणार. हे कोणतं पक्षाचं धोरण ? – अणुऊर्जा प्रकल्प आला तर नाश होईल असा प्रचार जैतापूरच्या प्रकल्पाला विरोध झाला. पण देशात तामिळनाडू, कर्नाटक, राजस्थान, उत्तरप्रदेश, गुजरात, तारापूर (महाराष्ट्र) इतके अणुऊर्जा प्रकल्प भारतात आहेत आणि सगळ्यात महत्वाचा भाभा अणू संशोधन केंद्र मुंबईच्या मध्यात आहे मग उद्या तिथे काही विस्फोट झाला तर… असे प्रकल्प निर्धोक सुरु असताना का आणि कसली भीती घातली जाते आहे.

– नाणारला विरोध केला. तिथे हजारो एकर जमिनी कशा विकत घेतल्या गेल्या ? मग बारसू तिथेही ५००० एकर जमीन आधीच विकत घेतली होती. प्रकल्प कुठे येणार हे दलाल – अधिकारी – राजकारणी ह्यांना आधीच माहित असतं मग त्या जमिनी कवडीमोल दराने विकत घ्यायच्या आणि चढ्या भावाने सरकारला विकायच्या. हे कोणतं षडयंत्र ? कोण रचतंय ? ह्यावर खासदाराने लक्ष ठेवायला हवं होतं ना?

– कोकण रेल्वे किती वेगात पूर्ण झाली कारण तेव्हा जमिनीचे दलाल फिरत नव्हते. – कोकणात चांगले उद्योग यावेत, प्रदूषणमुक्त उद्योग यावेत. – गोवा राज्य फक्त पर्यटनावर सुरु आहे मग आपला रत्नागिरी-सिंधुदुर्ग का नाही ? – परदेशी पर्यटक आले कि आपल्या काही लोकांचं पालुपद असतं कि ‘संस्कृतीवर घाला येतो. संस्कृती बिघडेल’ वगैरे. दोन वेळेचं अन्न देऊ शकत नाही अशी कोणती संस्कृती. आपल्याच मुलांच्या हाताला रोजगार मिळेल. आपल्या लोकांच्या हाती पैसे येईल.

– परदेशी पर्यटक आल्याने गोव्याची, केरळची संस्कृती बिघडली का? तिथली संस्कृती रसातळाला गेली का? नाही. पर्यटक येतील, आपल्या प्रदेशाचा आनंद घेतील, चांगले पैसे इथे खर्च करतील आणि जातील. – मी मलेशियाला गेलो होतो. मलेशिया हा मुस्लिम देश आहे. मुस्लिमांमध्ये दारू पिणं आणि जुगार खेळणं वर्ज्य मानलं जातं. तिथे जेंटिंग हाईलँड्स म्हणून एक ठिकाण आहे. तिथे मोठ्या प्रमाणावर दारू आणि कसिनोचा आनंद घ्यायला लोकं येतात. आम्हीही तिथे गेलो पण मला जुगार खेळात येत नाही फक्त ५ वर्षातून एकदा जुगार खेळतो.

– मलेशियाच्या एका रेस्टोबारमध्ये एक पाटी दिसली ‘मुस्लिमांना प्रवेश नाही’. मी विचारपूस केली, तेव्हा कळलं. त्यांची धार्मिक मान्यता काहीही असली तरी पर्यटन आणि त्यातून आर्थिक सुबत्ता येणार असेल तर त्यांनी धर्म बाजूला ठेवला. मग आपण कोणती संस्कृती घेऊन बसलोय. – गोवा, केरळ अशी बाकीची राज्य पुढे जात आहेत आपण तारकर्ली घेऊन बसलोय. – आपलं कोकण जैविविधतेने इतकं समृद्ध आणि सुंदर आहे की, जगात दुसऱ्या क्रमांकावर आहे. अमेझॉन नंतर ह्या सह्याद्री पश्चिम घाटाची दखल घेतली जाते. आपल्याला त्याची जाणीवच नाही.

– माझी नारायणराव राणे ह्यांना विनंती आहे. जगातील सुसज्ज हॉटेलची साखळी उभी करा. परदेशी पर्यटकांशी बोलायला इंग्लिश स्पिकिंग क्लासेस आणा. – नारायणराव राणेंना मुख्यमंत्रीपदाचे फक्त ६ महिने मिळाले ते जर पुढची ५ वर्ष मिळाली असती ना तर कुणाला इथे प्रचाराला यायची गरजच लागली नसती. ते ज्या वेळेला मुख्यमंत्री झाले तेव्हा मलाही प्रश्न पडला होता कि मुख्यमंत्री पदाचा आवाका पाहता नारायणरावांना हे जमेल का? पण त्यांनी ज्याप्रकारे मुख्यमंत्रीपद हाकलं, हाताळलं ते भल्याभल्यांना नाही जमलं आहे. – झपाटल्यासारखं काम करणं आणि कामाचा सपाटा लावणं हे काय असतं हे नारायणरावांकडे बघून तुम्हाला कळेल.

– मी, सन्मा. बाळासाहेब असे कधी गप्पांना बसायचो तेव्हा बाळासाहेब सांगायचे अंतुलेनंतर कुणी कामाचा वाघ बघितला असेन तर आपले नारायणराव राणे. – एखादा विषय समजून घेणं आणि समजल्या नंतर तो मांडणं… ह्याचं एक उत्तम उदाहरण देतो. नारायणराव राणे विरोधी पक्षनेते होते तेव्हा माझे आजचे सहकारी अनिल शिदोरे एकेदिवशी सामाजिक कार्यकर्ते श्री. अभय बंगांना घेऊन त्यांना भेटले. श्री. बंगांनी बालमृत्यू, कुपोषण ह्या समस्येबद्दल नारायणरावांना माहिती दिली. दुसरी दिवशी सभागृहात नारायणरावांनी तो विषय ज्या विस्तृतपणे, अभ्यासपूर्ण तासभर मांडला त्यावर बालमृत्यू, कुपोषण प्रश्नावर काम करणारे अभय बंगही बेहद्द खुश होते. असा माणूस तुमच्यासमोर खासदारकीचा उमेदवार म्हणून उभा आहे.

– रत्नागिरी-सिंधुदुर्गवासियांना माझी विनंती आहे कि, तुम्हाला नुसताच बाकड्यावर बसणार खासदार पाहिजे कि केंद्रीय मंत्रिमंडळात स्थान मिळवून तळकोकणाचा विकास करणारा खासदार पाहिजे. – कोकणाबद्दलची जी काही मतं आहेत, माझ्या ज्या कल्पना आहेत ते मी नारायणराव राणेंकडे घेऊन गेल्यावर ते चालढकल करणार नाहीत. त्या विषयांना न्याय देतील हा मला विश्वास आहे. – माझा कोकणी माणूस आज उद्योग नाही, सुबत्ता नाही म्हणून कोकण सोडतो. त्या कोकणी माणसाला आपल्या कुटुंबापासून विभक्त व्हायची पुन्हा वेळ येणार नाही ह्यासाठी आम्ही काम करू.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button