अमेरिका-इराण तणाव वाढला; भारतीयांना इराण सोडण्याचे सरकारचे आवाहन

Iran-US Conflict | अमेरिका आणि इराण यांच्यातील तणाव तीव्र होत असताना भारत सरकारने इराणमध्ये राहणाऱ्या भारतीय नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. संभाव्य संघर्षाच्या पार्श्वभूमीवर भारतीय दूतावासाने नागरिकांना शक्य तितक्या लवकर इराण सोडण्याचा सल्ला दिला आहे.
भारतीय दूतावासाने जारी केलेल्या मार्गदर्शक सूचनांनुसार, उपलब्ध व्यावसायिक विमानसेवेचा वापर करून इराणमधून बाहेर पडण्याचे आवाहन करण्यात आले आहे. या सूचना विद्यार्थी, धार्मिक यात्रेसाठी गेलेले नागरिक, व्यावसायिक आणि पर्यटक अशा सर्व भारतीयांसाठी लागू आहेत.
हेही वाचा : नेपाळमध्ये भीषण बस अपघात; त्रिशुली नदीत बस कोसळून १९ ठार, २५ जखमी
१४ जानेवारी २०२६ रोजी जारी केलेल्या सूचनांचा पुनरुच्चार करत दूतावासाने नागरिकांना आंदोलने किंवा निदर्शने सुरू असलेल्या भागांपासून दूर राहण्याचा सल्ला दिला आहे. तसेच स्थानिक परिस्थितीवर लक्ष ठेवत भारतीय दूतावासाच्या संपर्कात राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
इराणमध्ये असलेल्या भारतीयांना पासपोर्ट, ओळखपत्र आणि इतर प्रवासाशी संबंधित कागदपत्रे नेहमी जवळ ठेवण्यास सांगण्यात आले आहे. कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीत मदतीसाठी दूतावासाशी संपर्क साधण्याचेही आवाहन करण्यात आले आहे.
भारतीय दूतावासाने आपत्कालीन संपर्क क्रमांक आणि ईमेलही जारी केले आहेत.
फोन: +989128109115, +989128109109, +989128109102, +989932179359
ईमेल: [email protected]
दरम्यान, अमेरिका-इराण तणाव वाढत असल्याने पश्चिम आशियातील परिस्थितीवर जगभराचे लक्ष लागले आहे. संभाव्य संघर्षाच्या पार्श्वभूमीवर भारतीय नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी सरकारकडून सतत परिस्थितीवर लक्ष ठेवले जात आहे.




