ब्रिटनच्या राजकारणात मोठा भूकंप! पंतप्रधान कीर स्टार्मर यांचा तडकाफडकी राजीनामा; १० वर्षांत ७ पंतप्रधान

Keir Starmer Resigns | ब्रिटनच्या राजकारणातून आज एक अत्यंत मोठी आणि धक्कादायक बातमी समोर आली आहे. पक्षांतर्गत वाढत्या दबावापुढे अखेर झुकत ब्रिटनचे पंतप्रधान कीर स्टार्मर यांनी आपल्या पदाचा तडकाफडकी राजीनामा दिला आहे. लेबर पार्टी अंतर्गत गेल्या काही महिन्यांपासून त्यांच्या नेतृत्वावर तीव्र नाराजी व्यक्त केली जात होती. सातत्याने घसरणारी लोकप्रियता आणि पक्षातच वाढणारा अंतर्गत विरोध यांमुळे अखेर सोमवारी त्यांनी पायउतार होण्याचा निर्णय घेतला. नवीन उत्तराधिकारी मिळेपर्यंत ते हंगामी पंतप्रधान म्हणून जबाबदारी सांभाळणार आहेत.
पंतप्रधानांचे अधिकृत निवासस्थान असलेल्या ‘१० डाऊनिंग स्ट्रीट’बाहेर प्रसारमाध्यमांशी बोलताना कीर स्टार्मर यांनी आपल्या राजीनाम्याची घोषणा केली. यावेळी ते अत्यंत भावूक झाले होते. जुलै २०२४ च्या सार्वत्रिक निवडणुकीत लेबर पार्टीला ऐतिहासिक विजय मिळवून दिल्यानंतर, अवघ्या दोन वर्षांच्या आतच स्टार्मर यांना अशा प्रकारे पायउतार व्हावे लागल्याने ब्रिटनच्या राजकीय वर्तुळाला मोठा धक्का बसला आहे.
आपल्या कार्यकाळातील कामगिरीबद्दल बोलताना भावूक झालेल्या स्टार्मर म्हणाले, “सहा वर्षांपूर्वी जेव्हा मी लेबर पार्टीची धुरा हाती घेतली, तेव्हा हा पक्ष आता संपला आहे, असे मला वारंवार सांगण्यात आले होते. पण आम्ही लोकांना चुकीचे ठरवले. कठोर परिश्रमांमुळेच पक्षात हा बदल शक्य झाला आणि आम्ही पुन्हा सत्तेत आलो. एका विशेषाधिकारप्राप्त वर्गाऐवजी, सर्वसामान्य नागरिकांना आदर, संपत्ती आणि समान संधी देणारा ब्रिटन घडवणे हे आमचे स्वप्न होते आणि त्यासाठी आम्ही प्रामाणिक प्रयत्न केले.”
हेही वाचा
शालेय स्तरापासून योगाचे धडे देणे काळाची गरज; आमदार शंकर जगताप
गेल्या काही काळापासून लेबर पार्टीमध्ये स्टार्मर यांच्या नेतृत्वाखाली पुढील निवडणूक लढवायची की नाही, यावरून अंतर्गत कलह शिगेला पोहोचला होता. यावर बोलताना स्टार्मर म्हणाले, “माझा पक्ष सध्या एकच प्रश्न विचारत आहे की, आगामी निवडणुकीत पक्षाचे नेतृत्व करण्यासाठी मी योग्य व्यक्ती आहे का? आणि मला माझ्या पक्षाचे उत्तर मिळाले आहे. मी या पक्षाच्या निर्णयाचा आदर करतो आणि आपल्या पंतप्रधानपदाचा राजीनामा देत आहे.”
अवघ्या १० वर्षांत ७ पंतप्रधान
देशातील राजकीय अस्थिरता संपवण्याचे आश्वासन देत सत्तेत आलेल्या कीर स्टार्मर यांनी पायउतार होताना पुढील प्रक्रियेची माहिती दिली. येत्या सप्टेंबर महिन्यात संसदेचे अधिवेशन सुरू होण्यापूर्वी ब्रिटनला नवा पंतप्रधान मिळेल, असे स्टार्मर यांनी स्पष्ट केले. स्टार्मर यांच्या या निर्णयामुळे ब्रिटनमध्ये गेल्या अवघ्या १० वर्षांतील सातवा पंतप्रधान सत्तेवर येणार असून ब्रिटनची राजकीय अस्थिरता पुन्हा एकदा जगासमोर आली आहे.
स्टार्मर यांच्या या अनपेक्षित एक्झिटमुळे आता ब्रिटनचा पुढचा कारभारी कोण होणार, याकडे संपूर्ण जगाचे लक्ष लागले आहे. लेबर पार्टी लवकरच आपल्या नव्या नेत्याची निवड करण्यासाठी अधिकृत प्रक्रिया सुरू करणार आहे.





