To The Point: ‘‘स्टॅच्यू ऑफ हिंदुभूषण’’ समोर राष्ट्रवादीसह शिवसेना नगरसेवक ‘‘नतमस्तक’’
बलिदान दिन निमित्त धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांना केले अभिवादन
पिंपरी-चिंचवड । विशेष प्रतिनिधी
फाल्गुन अमावस्या किंवा मृत्युंजय अमावस्या अर्थात धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांचा ‘‘बलिदान दिन’’ च्या निमित्त पिंपरी-चिंचवडमधील राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना शिंदे गटाचे नगरसेवक ‘‘स्टॅच्यू ऑफ हिंदुभूषण’’ समाेर नतमस्तक झाले. वास्तविक, सातत्याने या पवित्र कार्यावर आक्षेप नोंदवणारे हे सन्माननीय आजतरी ‘‘आत्मक्लेश’’ करतील का? असा प्रश्न उपस्थित झाला आहे.
पिंपरी-चिंचवड महानगरपालिका प्रशासनाच्या माध्यमातून आणि भाजपा आमदार महेश लांडगे यांच्या संकल्पनेतून बोऱ्हाडेवाडी-मोशी येथे धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांचा जगातील सर्वांत उंच पुतळा अर्थात ‘‘स्टॅच्यू ऑफ हिंदुभूषण’’ उभारण्याचे काम प्रगतीपथावर आहे. या पुतळ्यामुळे पिंपरी-चिंचवड शहराची नवी ओळख महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात आणि देश-विदेशातही निर्माण होवू लागली आहे. शिव-शंभूप्रेमी आणि हिंदुत्ववादी तरुणांमध्ये ‘‘शंभूसृष्टी’’ बाबत कमालीची ‘क्रेझ’ आहे. सोशल मीडियावर हजारो इन्फ्ल्यूएन्सर व्यक्त होताना दिसतात.
दरम्यान, ‘‘स्टॅच्यू ऑफ हिंदुभूषण’’ च्या स्थापत्य आणि विद्युत विषयक कामाचा प्रस्ताव स्थायी समितीसमोर होता. त्यापैकी स्थापत्य विभागाचा प्रस्ताव AT PAR दराने मंजूर करण्याबाबत शिवसेना शिंदे गटाच्या स्थायी समिती सदस्या सुलभा उबाळे यांनी आक्षेप नोंदवला. त्यानंतर सर्वसाधारण सभेतही आगपाखड केली होती. सुरूवातील हा विषय तहकूब ठेवण्यात आला. त्यानंतर स्थायी समिती सभापती अभिषेक बारणे यांनी या विषयाला मंजुरी दिली. त्यामुळे उबाळे आणि टीमच्या विरोधाची हवा काढून घेतली होती.
छत्रपतींच्या पुतळ्याच्या कार्यात राजकीय उद्देशाने केलेली टीका-टीपण्णी आणि चमकोगिरीवर शिव-शंभू विचारांच्या कार्यकर्त्यांमध्ये संताप व्यक्त होवू लागला. शिवसेनेचे नाव सांगायचे अन् शिव-शंभू विचाराच्या कार्याला राजकीय फायद्यासाठी विरोध करायचा.. त्याचा ‘‘ड्रामा’’ करणे योग्य आहे का? असा प्रश्न सोशल मीडियावर अनेकांनी उपस्थित केला. त्यामुळे हादरलेल्या सुलभा उबाळे यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसमधील काही नगरसेवकांनी बलिदान दिनाच्या निमित्त ‘‘स्टॅच्यू ऑफ हिंदुभूषण’’ समोर नतमस्तक होण्याचा निर्णय घेतला असावा, असे निरीक्षण राजकीय जाणकारांनी नोंदवले आहे.
महापालिकेच्या पायऱ्यांवर पुन्हा ‘‘ड्रामा’’
छत्रपती संभाजी महाराज पुतळ्यावरुन पुन्हा एकदा सुलभा उबाळे आणि टीमने महापालिका भवनाच्या पायऱ्यांवर बसून आंदोलन करीत ‘‘ड्रामेबाजी’’ केली. प्रसारमाध्यमांसमोर ‘‘धनेश्वर काय महापालिकेचा जावई आहे का? ’’ असा प्रश्न उपस्थित केला. त्यानंतर हिंदूभूषण स्मारक ट्रस्ट ही अराजकीय व अशासकीय संस्था स्थापन केल्याबद्दल त्यावरही आक्षेप नोंदवला. केवळ आक्षेप नोंदवला नाही, तर या संस्थेवर सर्वपक्षीय गटनेत्यांची नियुक्ती करावी, अशी आश्चर्यजनक मागणी केली. याचा अर्थ असा होतो की, संबंधित ट्रस्ट स्थापन केले, याला उबाळे यांचा विरोध नाही, तर त्यामध्ये सर्वपक्षीय गटनेते, विरोधी पक्षनेते, महापौर यांना का घेतले नाही? अशी सल आहे. विशेष म्हणजे, धनेश्वर नावाचा ठेकेदार महापालिकेचा जावई आहे का? असा प्रश्न उपस्थित करणाऱ्या सुलभा उबाळे भारतीय जनता पार्टीचा निषेध करतात. त्याच उबाळे ‘स्टॅच्यू ऑफ हिंदुभूषण’ समोर भाजपाचे निष्ठावंत नेते आणि माजी खासदार अमर साबळे यांच्यासोबत छायाचित्र फोटो काढण्यासाठी उभा राहातात, हा परस्पर विरोधाभास आहे. त्यामुळे पुतळ्याच्या कामाला नव्हे, तर पुतळ्याच्या आडून भाजपाला विरोध आहे. कारण, उबाळे यांना आगामी विधानसभा निवडणूक लढवायची आहे, असे स्पष्ट होते, अशी वस्तुनिष्ठ टीपण्णीही राजकीय निरीक्षकांनी नोंदवली आहे.





