दिल्लीतील भीषण अग्नितांडव! ९ जण जिवंत जळाले; तीन चिमुकल्यांचाही दुर्दैवी अंत
पालम मेट्रोजवळील इमारतीला पहाटे आग; धुरामुळे अडकले कुटुंब, उडी मारून दोघांचा थरारक बचाव - मुख्यमंत्रींकडून चौकशीचे आदेश

दिल्ली : बुधवारी सकाळी दिल्लीच्या पालम मेट्रो स्टेशनजवळ एका बहुमजली इमारतीत भीषण आग लागली. या दुर्घटनेत एकूण नऊ जणांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये तीन निष्पाप बालिका होत्या. या कुटुंबातील ३ वर्षांच्या लहान मुलीपासून ७० वर्षांच्या वृद्ध महिलेपर्यंत सर्वजण आगीच्या भक्ष्यस्थानी पडले. इमारतीच्या खालच्या भागात कपड्यांची व सौंदर्यप्रसाधनांची दुकाने होती, तर वरच्या मजल्यावर एक कुटुंब राहत होते. सकाळी सात वाजण्याच्या सुमारास अचानक ज्वाळा उसळल्या आणि संपूर्ण इमारत धुराने वेढली गेली.
अनेकांना रुग्णालयात हलवण्यात आलं
दिल्ली अग्निशमन सेवा (डीएफएस) यांना सकाळी सात वाजता ही माहिती मिळताच तातडीने ३० अग्निशमन वाहने घटनास्थळी दाखल झाली. बचाव पथकाने इमारतीत अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले. अनेकांना रुग्णालयात हलवण्यात आले. मात्र, दोन जणांनी इमारतीवरून उडी मारून स्वतःला वाचवले. त्यांना स्थानिक नागरिकांनी तातडीने रुग्णालयात नेले. या घटनेत तीन जण जखमी झाले असून, त्यांपैकी एक दोन वर्षांच्या मुलीवर उपचार सुरू आहेत.
हेही वाचा : शिवालिक, नंदादेवीनंतर आता ‘जग लाडकी’ जहाजही भारतात पोहचलं
डीएफएस अधिकारी एस. के. दुआ यांनी सांगितले की, इमारतीत तळघर, तळमजला आणि पहिला मजला येथे व्यावसायिक दुकाने होती. दुसऱ्या व तिसऱ्या मजल्यावर फ्लॅट्स होते. या इमारतीत एकूण पाच मजले व तळघर होते. छतावर तात्पुरते पत्र्याचे शेडही बांधले होते. खालच्या मजल्यावरून वर जाण्यासाठी फक्त एकच सीढी होती. आगीच्या तीव्र ज्वाळा तळमजल्यापासून सुरू झाल्याने वरच्या भागात धूर भरला. यामुळे वर राहणाऱ्या लोकांना बाहेर पडणे अशक्य झाले.
ही दुर्घटना पालम गावातील मूळ रहिवाशी एका कुटुंबाशी संबंधित आहे. हे कुटुंब पिढ्यान्पिढ्या येथे वास्तव्य करत होते आणि सौंदर्यप्रसाधनांचा व्यवसाय चालवत होते. मृत व्यक्तींची ओळख पटली आहे. त्यामध्ये प्रवेश (३३), कमल (३९), अनिल (३२), आशु (३५), दीपिका (२८), लाडो (७०) आणि हिमांशी (२२) यांचा समावेश आहे. मृत्यू झालेल्या तीन मुली अनुक्रमे १५, ६ आणि ३ वर्षांच्या होत्या. घटनास्थळी मोठी गर्दी जमली होती. रडारड, आरडाओरड आणि हाहाकार सुरू होता.
दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांनी या दुर्घटनेत झालेल्या जीवितहानीबद्दल गहन दुःख व्यक्त केले. त्यांनी न्यायालयीन चौकशीचे आदेश दिले असल्याचेही सांगितले. संपूर्ण कुटुंब एकाच वेळी आगीत बळी गेल्याने परिसरात शोककळा पसरली आहे.





