रोहित गोलांडे सोशल वेल्फेअरतर्फे वसुबारसला गोमाता पूजन सोहळा संपन्न

पिंपरी | दिवाळी सणाच्या मंगल प्रारंभाचा दिवस मानला जाणारा वसुबारस हा हिंदू संस्कृतीतील अत्यंत पवित्र आणि धार्मिक असा दिवस आहे. या शुभदिनी गोमातेला वंदन करून तिचे पूजन करण्याची परंपरा शतकानुशतके आपल्या संस्कृतीत जोपासली गेली आहे. याच पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक १९ मध्ये रोहित गोलांडे सोशल वेल्फेअर यांच्या वतीने गोमाता पूजन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
या कार्यक्रमाला स्थानिक नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. पूजन विधी अत्यंत श्रद्धा, भक्तिभाव आणि अध्यात्मिकतेच्या वातावरणात संपन्न झाला. पारंपरिक मंत्रोच्चार, फुलांच्या सजावटी आणि दीपप्रज्वलनाने परिसर भक्तिमय झाला होता.

हेही वाचा : पदवीपूर्व दंतवैद्यक क्षेत्रात मॅग्निफिकेशन तंत्रज्ञानाचा समावेश
या पूजन सोहळ्याचा मुख्य आकर्षणाचा भाग म्हणजे गोमातेला पारंपरिक पद्धतीने सजवून पूजन व नैवेद्य अर्पण करणे हा होता. भक्तांनी गोमातेला फुलांनी आणि हळदी-कुंकवाने अलंकृत केलं. त्यानंतर विविध प्रकारचे नैवेद्य — गूळ, तूप, गवत, आणि ताज्या फुलांचा अर्पण करून पूजन करण्यात आलं.
कार्यक्रमादरम्यान उपस्थित भक्तांनी “गौमाता सर्व देवतांची माता आहे” या भावनेने गोमातेला वंदन केलं. या वेळी गौसेवेचं महत्त्व आणि पर्यावरण संतुलनात गोवंशाचं योगदान यावरही प्रकाश टाकण्यात आला.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनाबद्दल स्थानिक नागरिकांनी आयोजकांचे अभिनंदन केले आणि अशा धार्मिक उपक्रमांनी समाजात एकता आणि आध्यात्मिकतेचं वातावरण अधिक दृढ होईल, असा विश्वास व्यक्त केला.




