ओवळे सरपंचपदी सोमनाथ इंगळे यांनी निवड!
शिवभक्त अजित शिंदेंनी घेतली भेट, व्यक्त केली दिलगिरी

ओवळे | ओवळे ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी श्री. सोमनाथभाऊ इंगळे यांची नुकतीच निवड झाली असून, या निवडीचे सर्वत्र स्वागत केले जात आहे. याच पार्श्वभूमीवर, शिवभक्त अजित शिंदे यांनी नवनिर्वाचित सरपंचांची सदिच्छा भेट घेऊन त्यांचे अभिनंदन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
अजित शिंदे यांनी सोमनाथभाऊ इंगळे यांची भेट घेऊन त्यांना शाल आणि भेटवस्तू देऊन सन्मानित केले. यावेळी बोलताना त्यांनी सोमनाथभाऊंच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त केला आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली गावचा चेहरामोहरा बदलेल, अशी आशा व्यक्त केली.
हेही वाचा
राजकीय मतभेद विसरून विकासाचा निर्धार
या भेटीदरम्यान अजित शिंदे यांनी एक महत्त्वपूर्ण आणि प्रांजळ मनोगत व्यक्त केले. एप्रिल २०२६ मध्ये झालेल्या ग्रामपंचायत पोटनिवडणुकीच्या आठवणींना उजाळा देत त्यांनी सांगितले की, “निवडणुकीच्या वेळी काही स्थानिक पुढार्यांना विरोध करण्याच्या नादात, सोमनाथभाऊंसारख्या एका चांगल्या व्यक्तिमत्त्वाला नकळत विरोध करावा लागला. त्याबद्दल मला मनापासून खेद वाटतो. जर माझ्या कोणत्याही कृतीमुळे सोमनाथभाऊंचे मन दुखावले असेल, तर मी दिलगिरी व्यक्त करतो.”
‘एकत्र येऊन गावचा विकास करूया’
“जे झाले ते विसरून आता आपल्याला पुढे जायचे आहे,” असे म्हणत शिंदे यांनी भविष्यात सोमनाथभाऊंच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याचे संकेत दिले. वैयक्तिक हेवेदावे बाजूला ठेवून, केवळ गावच्या सर्वांगीण विकासासाठी एकत्र येण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले. या सकारात्मक भूमिकेमुळे ओवळे गावातील राजकीय वातावरण निवळण्यास मदत होणार असून, विकासाला नवी गती मिळेल, अशी चर्चा आता ग्रामस्थांमध्ये रंगली आहे.





