नोकरीचे आमिष दाखवून साडेसात लाखांची फसवणूक; रावेत पोलिसांत महिलेवर गुन्हा दाखल
गुन्हे वृत्त : नोकरी- व्यावसायाच्या आमिषाने फसवणुकीपासून सावधानतेचे आवाहन

पिंपरी-चिंचवड | सरकारी नोकरी लावण्याचे आमिष दाखवून दोन महिलांची ७ लाख ४५ हजार ५०० रुपयांची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी रावेत पोलिसांनी एका महिलेविरुद्ध गुन्हा दाखल केला असून, पोलीस अधिक तपास करत आहेत.
खुशी वसंतराव देशमुख (रा. शिवनगरी मंदिराजवळ, बिजली नगर, चिंचवड) असे गुन्हा दाखल झालेल्या संशयित आरोपी महिलेचे नाव आहे. याप्रकरणी पीडित महिलेने रावेत पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
हेही वाचा
डाव्यांचा शेवटचा गड कोसळला! केरळमध्ये काँग्रेसप्रणीत आघाडीला स्पष्ट बहुमत
नेमकी घटना काय?
मिळालेल्या माहितीनुसार, १५ जुलै २०२१ ते १६ जुलै २०२५ या कालावधीत हा फसवणुकीचा प्रकार घडला. आरोपी खुशी देशमुख हिने फिर्यादी महिलेला येरवडा जेल विभागात ‘ज्युनिअर क्लार्क’ या पदावर आणि फिर्यादीची मैत्रीण तृप्ती निलेश बैठणकर यांना ‘सेल्स टॅक्स इन्स्पेक्टर’ (विक्रीकर निरीक्षक) या पदावर सरकारी नोकरी लावून देते, असे आमिष दाखवले. या दोन्ही महिलांचा विश्वास संपादन करून आरोपीने त्यांच्याकडून वेळोवेळी एकूण ७ लाख ४५ हजार ५०० रुपये उकळले. मात्र, बराच काळ उलटूनही नोकरी मिळाली नाही आणि दिलेले पैसेही परत न मिळाल्याने आपली फसवणूक झाल्याचे फिर्यादीच्या लक्षात आले.
रावेत पोलिसांत गुन्हा दाखल
फिर्यादीने दिलेल्या तक्रारीवरून रावेत पोलिसांनी दि. ३ मे २०२६ रोजी दुपारी ३ वाजता खुशी देशमुख विरोधात भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ३१८ (४) आणि ३१६ (२) नुसार गुन्हा दाखल केला आहे. अद्याप आरोपीला अटक करण्यात आलेली नाही. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक टार्फे करत आहेत. सरकारी नोकरीचे आमिष दाखवून पैसे मागणाऱ्या लोकांपासून सावध राहावे आणि अशा प्रकारच्या प्रलोभनांना बळी पडू नये, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.





