पुणे जिल्हा प्रशासनाने पालखी सोहळा सोलापूर प्रशासनाकडे सुपूर्द
पालखी सोहळ्यावर जेसीबीतून फुलांची उधळण

अकलूज: जगद्गुरू संत तुकाराम महाराज पालखी सोहळा नीरा नदीवरील पूल ओलांडून सोलापूर जिल्ह्यात प्रवेश करताच जेसीबीतून पुष्पवृष्टी करीत अतिशय उत्साहात व भक्तिभावाने पालखी सोहळ्याचे स्वागत करण्यात आले.
श्रीक्षेत्र देहू ते पंढरपूर आषाढी पायी वारी निमित्ताने विठुरायाच्या दर्शनास निघालेला जगद्गुरू संत श्री तुकाराम महाराज पालखी सोहळा सोमवारी (३० जून) सराटी येथील मुक्काम आटोपून मंगळवारी (१ जुलै) सकाळी सात वाजता नीरा नदीवर पोचला. नीरा नदीच्या पात्रात तुकोबारायांच्या पादुकांना शाही नीरास्नान सोहळा पार पडला. त्यानंतर सकाळी ८.४० वाजता सोलापूर- पुणे जिल्ह्याच्या सरहद्दीवरील नीरा नदीचा पूल ओलांडत सोलापूर जिल्ह्यात प्रवेश केला.
पुणे जिल्हा प्रशासनाने पालखी सोहळा सोलापूर जिल्हा प्रशासनाकडे सुपूर्द केला. पालखी सोहळा सोलापूर जिल्ह्यात येताच सोहळ्यावर जेसीबीतून फुलांची उधळण करत स्वागत करण्यात आले. यावेळी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद, खासदार धैर्यशील मोहिते- पाटील, जिल्हा पोलिस अधीक्षक अतुल कुलकर्णी, मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम, अपर जिल्हाधिकारी मोनिका सिंग, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. प्रकाश महानवर, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संतोष नवले, कृषी समितीचे सभापती मदनसिंह मोहिते- पाटील, प्रांताधिकारी विजया पांगारकर, तहसीलदार सुरेश शेजूळ, नगरपरिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दयानंद गोरे यांनी नगारा, अश्व व पादुकांना पुष्पहार अर्पण करून स्वागत केले. सोलापूर जिल्हा पोलिस बँड पथकानेही राष्ट्रभक्ती व भक्तिरसातील गीते गाऊन पालखीचे स्वागत केले.
हेही वाचा : मावळचे आमदार सुनील शेळके यांनी “शासनाची हजारो कोटींची रॉयल्टी बुडवली”; संजय राऊत यांचा घणाघात
यावेळी पुणे जिल्ह्यातील पोलिस अधीक्षक संदीप गिल, इंदापूरचे तहसीलदार जीवन बनसोडे, नायब तहसीलदार अविनाश डोईफोडे आरोग्याधिकारी डॉ. पोळ यांच्यासह विविध खात्यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी पुणे जिल्हा प्रशासनाच्या वतीने पालखी सोहळा सोलापूर जिल्हा प्रशासनाकडे सुपूर्द केला. स्वागतानंतर पालखी सोहळा अकलूज शहरातील गांधी चौकात येताच फटाक्यांच्या आतषबाजीत स्वागत करण्यात आले.
यावेळी माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते- पाटील, नंदिनीदेवी मोहिते- पाटील, आमदार रणजितसिंह आणि सत्यप्रभादेवी मोहिते- पाटील, माजी सरपंच शिवतेजसिंह मोहिते- पाटील, विश्वतेजसिंह व शिवंशिका मोहिते- पाटील यांनी पादुकांचे पूजन करून स्वागत केले. पालखी सोहळा गांधी चौकातून विजय चौक, शिवसृष्टी, नगरपरिषद चौक, विठ्ठल मंदिर, आंबेडकर चौक, जुने एसटी स्टँड या मार्गाने सदाशिवराव माने विद्यालयात आला. पालखी दर्शनासाठी रस्त्याच्या दुतर्फा अकलूजकरांनी गर्दी केली होती.