पाकिस्तान आणि चीनकडून स्वस्त दरात कांदा आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत
भारतीय कांद्याची निर्यात घटली, भारतीय कांद्याला तीव्र स्पर्धेचा सामना

लासलगाव : पाकिस्तान आणि चीनकडून स्वस्त दरात कांदा आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत पाठविला जात असल्याने भारतीय कांद्याला तीव्र स्पर्धेचा सामना करावा लागत आहे. परिणामी, भारतीय कांद्याची निर्यात घटली असून, स्थानिक बाजारात दर ३० ते ४० टक्क्यांनी कोसळले आहेत. याचा मोठा फटका थेट शेतकऱ्यांना बसत आहे.
पाकिस्तानकडून सध्या कांदा सुमारे २३० डॉलर प्रतिटन, तर चीनकडून २०५ ते २१० डॉलर प्रतिटन दराने निर्यात होत आहे. तुलनेत भारतीय कांद्याचा दर सध्या २५५ डॉलर प्रतिटन असल्याने आंतरराष्ट्रीय ग्राहक स्वस्त पर्यायांकडे वळत आहेत. पाकिस्तानने तर श्रीलंकेला फक्त १७० डॉलर प्रतिटन दराने कांदा पुरविला आहे. भारतीय कांद्याची गुणवत्ता चांगली असूनही तो तुलनेत महाग असल्याने मागणी कमी होत आहे.
हेही वाचा : मावळचे आमदार सुनील शेळके यांनी “शासनाची हजारो कोटींची रॉयल्टी बुडवली”; संजय राऊत यांचा घणाघात
स्थानिक बाजारात दर घसरले
निर्यात घटल्याने नाशिक जिल्ह्यातील लासलगाव, पिंपळगाव आदी प्रमुख बाजारपेठांमध्ये कांद्याचा साठा वाढला आहे. परिणामी, बाजारभावात तीव्र घसरण झाली असून, शेतकऱ्यांचा उत्पादन खर्चही निघेनासा झाला आहे.
परिणाम
चालू हंगामात मोठ्या उत्पादनाची शक्यता
निर्यातीसाठी नवीन बाजारपेठांची गरज
बांगलादेशकडून आयात बंद
स्पर्धक देश स्वस्त दराने कांदा देत असल्याने भारतीय कांद्याची मागणी घटली
ग्राहकांना फायद्याचे दर; पण शेतकऱ्यांचा उत्पादन खर्चही निघत नाही
व्यापाऱ्यांचे जुने साठे अडकले, गुंतवणुकीला फटका
गावातील रोजगार संधींवरही नकारात्मक परिणाम
महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा
कांद्याची लागवड करताना १४-१६ रुपये किलो खर्च येतो. आज मिळणारा दर परवडत नाही. आता स्वस्त कांदा बाजारात आल्याने दर आणखी पडतील. बँकेचे कर्ज फेडायचे कसे? घरखर्च चालवायचा कसा? असे प्रश्न पडतात.
– सोमनाथ काळे, कांदा उत्पादक, आंबेगाव
स्वस्त कांद्यामुळे बाजारात पुरवठा वाढतो आणि दर घसरतात. ग्राहकांना फायदा होतो; पण आमच्या जुन्या साठ्याला तोटा होतो. आमची गुंतवणूक अडकते.
– कांदा व्यापारी, लासलगाव