हिंदी सक्तीचा शासन निर्णय राज्य सरकारकडून रद्द
श्री बल्लाळेश्वर मंदिर परिसरात लाडू वाटप करून आनंदोत्सव साजरा
पाली : हिंदी सक्तीचा शासन निर्णय राज्य सरकारने रद्द केल्यानंतर रायगड जिल्ह्यात सर्वत्र महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने जल्लोष केला. पाली सुधागडात मनसे तालुकाध्यक्ष सुनिल साठे यांच्या नेतृत्वात नुकतेच भर पावसात जल्लोष करण्यात आला. श्री बल्लाळेश्वर मंदिर परिसरात लाडू वाटप करून व भरवून आनंदोत्सव साजरा करण्यात आला.
उद्धव ठाकरे व राज ठाकरे हे दोन भाऊ महाराष्ट्राच्या हितासाठी, मराठी माणसाच्या उत्कर्षासाठी एकत्र आले, आणि हा पहिलाच विजय झाला आहे, भविष्यात दोन ठाकरे बंधू एकत्र राहावेत, नक्कीच महाराष्ट्र गतिमानतेने पुढे जाईल असे जनतेच्या मनात आहे असे सुनिल साठे यावेळी म्हणाले. यावेळी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.
हेही वाचा : मावळचे आमदार सुनील शेळके यांनी “शासनाची हजारो कोटींची रॉयल्टी बुडवली”; संजय राऊत यांचा घणाघात
यावेळी मनसे सुधागड तालुका अध्यक्ष सुनील साठे, पाली शहर अध्यक्ष दीपेश लहाने, शंकर कदम,भागवत जाधव, दत्ता पांगरे, रोहन साजेकर, रुपेश दळवी, संजय जाधव व अमित घाटवळ इत्यादी मनसे सैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
आंदोलनाच्या इशाऱ्यानंतर राज्य सरकार नरमले. व हिंदी सक्तीचा शासन निर्णय रद्द केला. हा राज ठाकरे व मनसेचा विजय आहे. महाराष्ट्र हित राज साहेब जपतात. नरेंद्र मोदी ज्या गुजरात मधून येतात तिथं फक्त गुजराती व इंग्रजी शिकवली जाते मग माझ्या महाराष्ट्रात हिंदी का? परप्रांतीयांना गोंजारण्यासाठी हिंदी सक्तीचा हट्ट होता. महाराष्ट्र हे खपवून घेणार नाही, महाराष्ट्रात मराठी चाच बोलबाला असेल.





