कसं काय पाटील बरं हाय का..? जयंत पाटलांची राजकीय घुसमट !
राष्ट्रवादी काँग्रेसच्या मेळाव्यात प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी अध्यक्ष शरद पवार यांच्याकडे विनंती केली आणि आपल्याला या जबाबदारीतून मुक्त करावे असे सांगितले. अर्थात, नेहमीप्रमाणे अन्य पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांशी चर्चा करून निर्णय घेऊ, असा आदेश शरद पवार यांनी दिला. आता पाहू काय होते ते!
नेमके कारण काय असावे?
पण, या घटनेमुळे एक गोष्ट लक्षात आली की जयंत पाटील यांची शरद पवार यांच्या गटात नक्कीच घुसमट होत आहे..मग, ती रोहित पवार यांच्यामुळे असो, नाहीतर सुप्रिया सुळे यांच्यामुळे ! किंवा देवेंद्र फडणवीस यांच्या मैत्रीमुळे..पण, त्यांचे त्या पक्षात मन लागत नाही हे नक्की ! थोडक्यात काय, जयंत पाटील अस्वस्थ नक्की आहेत. पण, कशामुळे?
सर्व सहकारी सत्तेत असल्यामुळे ?
अस्वस्थ किंवा निराश आहोत असे दाखवणारी किंवा अशा प्रकारची वक्तव्ये जयंत पाटील हे गेले वर्षभर करत आहेत. वर्षभरातील नानाविध वक्तव्यांतूनही, असे म्हणता येईल. त्यांचे सर्व सहकारी सत्तेत आहेत आणि हे सत्तेच्या बाहेर.. ते अस्वस्थ असणे साहजिकच आहे. विधानसभेचा झटका देणारा निकाल, स्वतःचे आणि मुलाचे राजकीय भवितव्य, चौकशीची प्रकरणे यासारखी कारणे अस्वस्थतेच्या मुळाशी आहेत, हे कोणाच्याही लक्षात येईल.
पक्षाध्यक्षपदी नवा चेहरा द्या..
शरद पवार यांच्या पक्षाचे ते प्रदेशाध्यक्ष आहेत. या पदाच्या जबाबदारीतून मला मुक्त करा, अशी विनंती त्यांनी केली आणि त्यांच्या बिनविरोध निवडीसही पुढे ढकलण्यात आले. यावेळी पाटील म्हणाले होते, माझ्यावर अनेक जबाबदाऱ्या आहेत. पक्ष संघटनेचे काम, चौकशीचे प्रश्न, त्यामुळे नवा चेहरा पक्ष संघटनेसाठी मिळणे आवश्यक आहे. यातून त्यांना नेमके काय सूचित करायचे होते, हे मात्र ज्यांना समजायचे त्यांना नक्की समजले !
भाजपाचा मार्ग स्वीकारणार ?
गेल्या वर्ष-दीड वर्षांकडे वळून पाहिले तर जयंत पाटील यांच्या संदर्भात कोणत्या गोष्टी सतत चर्चेत होत्या? तर ते भाजपात जाणार, राज्याच्या मंत्रिपदी वर्णी लागणार ! या आणि अशा चर्चा सतत होत. यामागे अनेक कारणे होती, त्यातील महत्वाचे म्हणजे जयंत पाटील यांच्या अनेक जवळच्या सहकाऱ्यांनी भाजपात मानाच्या जागा बळकावल्या आहेत. दुसरे कारण म्हणजे त्यांच्या विरोधातील चौकशी.. सातत्याने होणाऱ्या चौकशा, त्यातील अनियमितता, त्यांचे ‘महाविकास आघाडी’ तील बालमित्र यांना झालेला त्रास अस्वस्थतेचे कारण असल्याचे सांगण्यात येत आहे.
हेही वाचा – शिवसैनिकांचा रुद्रावतार.! उद्धवसेनेकडून स्मार्ट मीटरला विरोध
अजित पवार यांच्या पूर्वीच..
वास्तविक, अजित पवार यांनी महायुतीशी मैत्री करण्यापूर्वीच जयंत पाटील जाणार हे निश्चित झाले होते, पण त्यांच्याकडे प्रदेशाध्यक्षपद सोपवून शरद पवार यांनी त्यांचे मनसुबे उद्ध्वस्त केले, असे उघडपणे बोलले जात होते. अजित पवारांपूर्वी ते गेले असते तर कदाचित राजकारणाचे ठोकताळे आणि वेगवेगळी समीकरणे बदलली असती. त्यातच आता सांगली जिल्ह्याच्या राजकारणातही त्यांचे स्थान नगण्य झाल्याचे म्हणावे लागेल!
ही तर जयंत’नीती’
शरद पवार आणि जयंत पाटील यांच्या राजकीय वर्तनामध्ये काही साम्य स्पष्ट दिसून येते. समोरच्याच्या कोणत्याही गोष्टींचा स्पष्ट उल्लेख न करता, थेट दोषारोपाचे नाव न उच्चारता, वळणदार भाषेत उल्लेख करतात. ग्रामीण भागातील उदाहरणे देतात. अर्थात्, जयंत पाटील हे देखील शरद पवारांच्या तालमीतच तयार झाले आहेत.
राष्ट्रवादी फुटली, आणि..
राष्ट्रवादी काँग्रेस फुटली आणि शरद पवार आणि जयंत पाटील यांच्या जवळच्या अनेक कार्यकर्त्यांनी आणि मित्रांनी अजित पवार गटात प्रवेश केला, जयंत पाटील यांना दिलेले स्थान जर स्वीकारले असते तर कदाचित आजची वेळ आली नसती. जयंत पाटील यांचे वक्तव्य ‘शांत राहा, जरासं थांबा, वाट पाहा आणि मग निर्णय घ्या’ असे त्यांनी कार्यकर्त्यांना दिलेले आदेश, त्यांच्या अस्वस्थतेची ग्वाही देतात. गाडीची हालचाल सुरू आहे, त्या गाडीत अजित पवार, एकनाथ शिंदेंसारखे नेते अगोदरच बसलेले आहेत. या नेत्यांमध्ये ते राजकीयदृष्ट्या अडकले गेले आहेत पण त्यांच्या बरोबरीची पदे जयंत पाटील यांच्याकडे नाहीत, हे देखील एक कारण असू शकते.
जयंत पाटलांची कोंडी..
जयंत पाटलांचा इतिहास पाहिला तर मोठमोठी मंत्रिपदे, दूरदृष्टी आणि विकासात्मक हालचाली हे त्यांचे वैशिष्ट्य ठरले आहे. राजकारणातील आता बदलत्या परिस्थितीनुसार ते काहीच करू शकत नाहीत, अशी राजकीय समीकरणे झाली आहेत. विरोधी पक्षात बसून पुढील साडे चार वर्षे फक्त सत्ताधाऱ्यांच्या निर्णयाकडे पाहत बसणे आणि टीका करणे, एवढेच हातात राहते. सत्ताधाऱ्यांच्याकडे जावे, तर त्यांच्याबरोबरचे सर्व नेते मोठी मंत्रीपदे बळकावून बसले आहेत. अशा परिस्थितीत निर्णय काय घ्यायचा हे त्यांना सुचत नसावे.
तोंड दाबून बुक्क्यांचा मार..
शरद पवार गटाशी एकनिष्ठ राहावे, तर रोहित पवार हे त्यांना मान द्यायला तयार नाहीत आणि शरद पवार यांचे अनुकूल फासे नेहमीच सुप्रिया सुळे यांच्या बाजूने पडत असल्यामुळे जयंत पाटील यांना भवितव्य काय हा मुद्दा पुन्हा शिल्लक राहतो ! आहे त्याच ठिकाणी थांबले तर राजकीय भवितव्य नाही, सत्ताधाऱ्यांच्या कडे जावे तर योग्य मान मिळेल की नाही, याची चिंता भेडसावत आहे.
आज ना उद्या भाजपामध्ये..
सध्याच्या शरद पवार गटात जयंत पाटील यांची घुसमट होताना पाहिल्यावर ते भविष्यात काय निर्णय घेतात, हे पाहणे अतिशय महत्त्वाचे आहे. शरद पवार यांचा गट जर अजित पवारांच्या राष्ट्रवादीत सामील झाला किंवा विलीन झाला तर अनायसे जयंत पाटील देखील राष्ट्रवादीमध्ये जाऊन सत्ताधाऱ्यांशी हातमिळवणी केल्यासारखे होईल. पण, त्यापेक्षा एखादे मोठे आश्वासन पदरी पाडून जर थेट भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला तर मोठे पदही मिळू शकेल, असा राजकीय निरीक्षकांचा अंदाज आहे. जयंत पाटील यांची घुसमट भारतीय जनता पार्टीच्या पथ्यावर पडणारी आहे, हे मात्र निश्चित !





