अध्यात्म । भविष्यवाणीताज्या घडामोडी

श्रीब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांची प्रवचने

परमार्थ श्रद्धेने करावा.

आपण मनुष्यजन्माला आलो, ते भगवंतप्राप्तीकरिताच आलो. आत्तापर्यंत मी पुष्कळ योनी हिंडलो, भगवंताने आता मनुष्य-योनीत आणले. ‘ भगवंता, आता नाही तुला विसरणार ’ असे कबूल करूनही, आपण जन्मास आलो नाही तर लगेच ‘तू कोण ?’ असे म्हणू लागतो ! संत आपल्याला, ‘ तोच मी ’ असे भगवंताजवळ कबूल करून आल्याची आठवण करून देतात. पण संतांनी जागे केले तरी आम्ही मात्र पुन: तोंडावरून पांघरूण ओढून घेतो, याला काय करावे ? झोपेचे सोंग घेतलेल्याला जागे करणे कठीणच जाते. पुष्कळ तीर्थयात्रा केल्या पण होतो तसाच राहिलो; यात दोष गंगेचा का माझा ? ‘ गंगेच्या काठी कितीतरी लोक येतात, स्नान करतात, पूजाअर्चा करतात, मग हे कलियुग आहे असे कसे म्हणावे ?’ असे एकाने म्हटले. त्यावर दुसरा म्हणाला, ‘ याचे प्रत्यंतर समोरच दाखवतो.

हेही वाचा –  शिवसैनिकांचा रुद्रावतार.! उद्धवसेनेकडून स्मार्ट मीटरला विरोध

समोर एक रक्तपिती माणूस बसला आहे. त्याला जो पापी नसेल त्याने कवटाळावे म्हणजे त्याची रक्तपिती जाईल. पण एवढे होईल, की जर कवटाळणारा पापी असेल तर त्याला त्या माणसाची रक्तपिती होईल. ’ असे समजल्यावर जो तो हळूहळू तिथून पसार होऊ लागला ! म्हणजे, एवढे नेमनिष्ठ, विद्वान्, गंगामाईचे रोज स्नान करणारे, तरी आपले अंत:करण शुद्ध झाले आहे असे त्या कुणालाच वाटले नाही ! तेवढ्यात वऱ्हाडकडला एक गरीब शेतकरी घोंगडी पांघरून हातातली काठी टेकीत टेकीत येत होता. त्याची निष्ठाच अशी की, गंगेत स्नान केले की सर्व पापे नष्ट होतात. त्याने गंगेत बुडी मारली आणि वर येऊन त्या रोग्याला कडकडून भेटला; आणि आश्चर्य म्हणजे त्या रोग्याचा रोग एकदम बरा झाला ! असे हे जे गोरगरीब, भोळेभाळे लोक, त्यांच्याजवळ अंधश्रद्धेने जे येते, ते मोठ्या विद्वानांनाही साधत नाही. आपण व्यवहारात पुष्कळ ठिकाणी अंधश्रद्धा ठेवतो. घरून कचेरीला निघताना वेळेवर आपण पोहचू अशी अंधश्रद्धा आपली असतेच.

कधी कधी आकस्मिक कारणाने आपण कचेरीला पोहचू शकत नाही; तरीपण आपण भरवसा ठेवतोच ! व्यवहारात आपण एकमेकांवर जेवढी निष्ठा ठेवतो, तेवढी जरी भगवंतावर ठेवली, तरी भगवंत आपल्याला समाधान देईल. परमार्थ पूर्ण समजून तरी करावा, किंवा अडाण्यासारखा श्रद्धेने करावा. पण आपण आहोत अर्धवट; म्हणजे पूर्ण कळलेले नसून आपल्याला ते कळले आहे असे वाटते. अशा माणसाला शंका फार, आणि त्याचे समाधान करणेही फार कठीण जाते. अमुक एक खरे आहे असे कळूनसुद्धा ज्याला आचरणात आणता येत नाही, तो मनुष्य खरा अज्ञानी. जे अनुभवाने सुधारले तेच शहाणे भले !

बोधवचन:- परमार्थामध्ये अंधश्रद्धेची मुळीच गरज नाही. पण तेथे श्रद्धेशिवाय मुळीच चालायचे नाही.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button