एसटी विभागाकडून सहलींसाठी ५० टक्के सवलत, यंदा सहलीतून २१.२८ कोटींचे उत्पन्न

ST bus tour scheme Maharashtra : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) सांगली विभागाला शालेय सहलींच्या माध्यमातून यंदा मोठे उत्पन्न मिळाले आहे. २०२५-२६ या शैक्षणिक वर्षात तब्बल २१ कोटी २८ लाख रुपयांचे उत्पन्न मिळाले असून, १,१३६ बस फेऱ्यांद्वारे हजारो विद्यार्थ्यांची सुरक्षित वाहतूक करण्यात आली. विश्वासार्ह सेवेमुळे एसटीच्या उत्पन्नात भरीव वाढ नोंदवली गेली आहे.
यावर्षी शालेय सहलींसाठी अद्ययावत व नवीन बसेस उपलब्ध करून दिल्याने विद्यार्थ्यांचा प्रवास अधिक सुरक्षित, आरामदायी आणि समाधानकारक ठरला. परिणामी, शाळा व महाविद्यालयांचा एसटीकडे कल वाढल्याचे दिसून आले. भविष्यातही सहलींसाठी वेळोवेळी बसेस उपलब्ध करून देण्याचे महामंडळाने स्पष्ट केले आहे.
हेही वाचा – राज्यातील १७ लाख सरकारी कर्मचारी सोमवारी बेमुदत संपावर
शालेय सहल हा विद्यार्थ्यांसाठी संस्मरणीय अनुभव ठरतो. धार्मिक व ऐतिहासिक स्थळांच्या भेटीसाठी एसटीमार्फत सहली आयोजित केल्यास शासनाकडून प्रवासी भाड्यात ५० टक्क्यांपर्यंत सवलत मिळते. त्यामुळे कमी खर्चात सुरक्षित व विश्वासार्ह प्रवासाची सुविधा उपलब्ध होत असून, विशेषतः ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना याचा मोठा दिलासा मिळत आहे.
दरम्यान, राज्यभरात एसटीने शालेय सहलींच्या माध्यमातून १२७ कोटी १८ लाखांचे विक्रमी उत्पन्न मिळवले आहे. हे उत्पन्न मागील वर्षाच्या तुलनेत ३३ कोटी २९ लाख रुपयांनी अधिक आहे. यावरून एसटीच्या सेवेला मिळणारा प्रतिसाद अधिक बळकट होत असल्याचे स्पष्ट झाले आहे.





