नांदेडमधील शिव रोडचे काम दोन वर्षांपासून रखडले
शिव रस्त्यावर दररोज हजारो वाहनांची वर्दळ

नांदेड : नांदेड शहरातील शिव रोड परिसरातील मच्छी मार्केट ते खंडोबा चौक रस्ता मागील दोन वर्षांपासून रखडला आहे. आता पावसाळा सुरू होत असूनही, रस्त्याच्या कामाला सुरवात झाली नाही. त्यामुळे खड्डे, चिखल आणि गोंधळलेल्या वाहतुकीतून दररोज जीव मुठीत घेऊन नागरिक प्रवास करत आहेत.
शिव रस्त्यावर दररोज हजारो वाहनांची वर्दळ असते. मात्र, सध्या संपूर्ण मार्गावर खड्डे, उखडलेली गिट्टी, चिखल आणि पावसाचे पाणी साचून परिसरात दुर्गंधी पसरत आहे. रखडलेल्या या कामांमुळे अपघातांच्या घटना घडत आहेत. रस्त्यावर जागोजागी तुंबलेल्या खड्ड्यात पाय घसरून नागरिक पडत आहेत, तर अनेक दुचाकी चिखलात अडकून पडताहेत. पादचाऱ्यांना रस्त्यावरून चालणे कठीण झाले आहे. सर्वसामान्य नागरिक वारंवार तक्रारी करतात, निवेदने देतात, तरीही अधिकारी आणि लोकप्रतिनिधी गप्प आहेत. एकीकडे मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली शहराच्या विकासाचा नारा दिला जातो, तर दुसरीकडे दोन वर्षे एका रस्त्याचे कामही पूर्ण होत नाही, हे प्रशासनाच्या ढिसाळ नियोजनाचे आणि ठेकेदारस्नेही कारभाराचे उदाहरण असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.
हेही वाचा – ‘काँग्रेसने कुरघोडी केल्यास आम्हीही करू’; रोहित पवार नेमकं काय म्हणाले?
सुरक्षा व्यवस्थाही वाऱ्यावर
शिव भागात सुरू असलेल्या कामांमध्ये कोणतेही सुरक्षाव्यवस्थेचे पालन होत नाही. सूचना फलक नाही, जाळ्यांची सुरक्षा नाही, काम करणारे मजूर क्वचितच दिसतात. यामुळे ही विकासकामे केवळ ठेकेदारांच्या मर्जीवर सोडण्यात आली असून, त्यावर प्रशासनाचा कोणताही अंकुश नाही, हे स्पष्ट होते
वाहने चिखलात, प्रशासन झोपेतच !
रखडलेल्या शिव रस्त्याच्या कामांमुळे ठिकठिकाणी चिखल झाला आहे. मागील काही दिवसांच्या पावसामुळे या भागात वाहने अक्षरशः चिखलात रुतून बसत आहेत. पादचाऱ्यांना चिखल टाळत रस्त्यावरून वाट काढावी लागत आहे. या सगळ्यांवर प्रशासन, लोकप्रतिनिधी आणि संबंधित कंत्राटदाराने डोळ्यांवर पट्टी बांधली आहे.
दोन वर्षांपासून शिव रस्त्याच्या नावाखाली नागरिकांची रोजची परीक्षा सुरू आहे. रस्त्याची अवस्था पाहता प्रशासनाने जबाबदारी झटकल्याचेच दिसते.
महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा
रुग्णवाहिका अडतात, शालेय वाहने उशिरा पोचतात आणि पादचाऱ्यांचे हाल सुरूच आहेत. हा केवळ रस्ता नसून गैरसोयीचे केंद्र बनले आहे.
-श्रीकांत कदम, रहिवासी