नांदेड जिल्ह्यात सुशिक्षित बेरोजगारांची संख्या वाढली
दीड लाख सुशिक्षित बेरोजगार नोकरीच्या शोधात

नांदेड : सातत्याने हाताला काम मिळेल, अशा मोठ्या प्रकल्पाची प्रतीक्षा अद्यापही जिल्ह्यातील युवा वर्गाला असून, जिल्ह्यात दिवसेंदिवस बेरोजगारांची फौज वाढच होत आहे. जिल्ह्यातील तब्बल १ लाख ४० हजार बेरोजगारांनी कौशल्य विकास केंद्राकडे नोंदणी करत नोकरीची मागणी केली आहे.
पण, नोंदणी केल्यानंतरही नोकरी मिळण्याची कुठलीच हमी नसल्याने सुशिक्षितांचे लोंढेच्या लोंढे रोजगाराच्या शोधात मोठ्या शहरांकडे वळत आहेत. निवडणुका आल्या की, रोजगाराच्या नावावर लोकप्रतिनिधींकडून सुशिक्षित बेरोजगारांना केवळ भूलथापा मिळत असल्याने बेरोजगार युवक वाममार्गाकडे वळू लागले आहेत.
निवडणुकीच्या काळात रोजगार उपलब्ध करून देण्याचे आश्वासन देणारे पुढारीही निवडणुका संपल्या की, बेपत्ता झाले आहेत. मागील काही वर्षात जिल्ह्याला अनेक वर्षानंतर पहिल्यांदाच केंद्रात तसेच राज्याच्या मंत्रिमंडळात प्रतिनिधित्वाची संधी मिळाली नाही. त्यामुळे मोठे उद्योग जिल्ह्यात आणण्यासाठी लोकप्रतिनिधींना केंद्र अणि राज्य सरकारकडे एकजुटीने मागणी करावी लागणार आहे.
हेही वाचा – छत्रपती शिवाजी महाराजांचे छायाचित्र असलेल्या ‘रूपे कार्ड’चे अनावरण
यापूर्वी जिल्ह्याला राज्यात तसेच केंद्रातही प्रतिनिधित्व मिळाले. पण, एकाच ठिकाणी हजारो सुशक्षितांना रोजगार मिळेल, असा एकही मोठा उद्योगधंदा जिल्ह्यात येऊ शकला नाही. मात्र, रस्ते, आरोग्य, शिक्षण यासह मूलभूत सोयी-सुविधांची कामे बहुतांश भागात मार्गी लागली.
लोकसंख्येच्या तुलनेत तसेच जिल्ह्याचे सोळा तालुक्याचे भौगोलिक क्षेत्र पाहता मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध होईल, असे मोठे उद्योग आले नाहीत. अनेक युवक उच्च शिक्षण घेऊनही छोट्या-मध्यम उद्योग व्यवसायात आपले नशिब आजमावत होते. पण, कोरोनाच्या पहिल्या व दुसऱ्या लाटेने हाती असलेले कामही हिरावले, त्यानंतर सुशिक्षितांपुढे पुन्हा रोजगाराचे आव्हान उभे राहिले आहे.
रोजगाराच्या शोधात युवावर्ग शहरात
जिल्ह्यातील सुशिक्षितांना स्थानिक पातळीवर काही प्रमाणात नोकरीच्या संधी मिळतात. पण, दरवर्षी पदवी घेऊन महाविद्यालांतून बाहेर पडणाऱ्या हजारो सुशिक्षितांना मोठ्या शहरात जाऊन नोकरीसाठी जिल्ह्यातून स्थलांतर करावे लागते. शिक्षण घेऊनही रोजगार मिळत नसल्याने जिल्ह्यातील युवावर्ग मोठ्या संख्येने मुंबई, पुणे, हैदराबाद, बेंगलोर, नागपूर यासारख्या मोठ्या शहरांमध्ये रोजगाराच्या शोधात जात आहे. दुसरीकडे शेती व्यवसायाशिवाय रोजगाराची मुबलक साधने उपलब्ध नसल्याने सर्वसामान्य मजुरांची नेहमीच रोजगारासाठी भटकंती होत असते.
जिल्ह्यात ३१०० युवकांना मिळाला रोजगार
मुख्यमंत्री युवा कार्यक्रमांतर्गत जिल्ह्यातील विविध तालुक्यात एकूण १७० रोजगार मेळावे घेण्यात आले. यामध्ये विविध कंपन्यांचे प्रतिनिधी सहभागी झाले होते. त्यात १ एप्रिल २०२४ ते २५ फेब्रुवारी २०२५ या कालावधीमध्ये जिल्ह्यातील ३ हजार १०० युवकांना विविध कंपनीमध्ये रोजगार उपलब्ध झाला आहे.
महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा
सुशिक्षित बेरोजगारांनी महास्वंयम पोर्टलवर नोंदणी करावी तसेच पंडित दीनदयाल रोजगार मेळाव्यात सहभागी व्हावे.
— रेणुका तमलवार, सहायक आयुक्त, कौशल्य विकास