महाराष्ट्रातील हवामानात मोठा बदल, जोरदार सरी कोसळणार; कोणत्या भागात पाऊस?

मुंबई : गेल्या काही दिवसांपासून राज्यातील हवामानात मोठ्या प्रमाणात बदल होताना दिसत आहे. भारतीय हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, ऐन दिवाळीत राज्यात अनेक ठिकाणी मोठे बदल होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. यंदा दिवाळीत हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होईल असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. या काळात पाऊस पडल्यास नागरिकांच्या सणासुदीच्या योजनांवर परिणाम होण्याची शक्यता आहे. दिवाळीची खरेदी, घराबाहेरची रोषणाई, सजावट यासारख्या गोष्टींवर याचा परिणाम होईल, असे म्हटले जात आहे.
हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, आज २१ ऑक्टोबर आणि उद्या २२ ऑक्टोबर या कालावधीत पुणे आणि पश्चिम महाराष्ट्रासह कोकण व मध्य महाराष्ट्राच्या अनेक भागांमध्ये पाऊस पडण्याची शक्यता आहे. या काळात विजांच्या कडकडाटासह हलका ते मध्यम पाऊस अपेक्षित आहे. इतकेच नव्हे तर, काही ठिकाणी जोरदार सरी कोसळण्याचीही शक्यता वर्तवण्यात आली आहे.
सध्या अरबी समुद्रामध्ये कमी दाबाचे क्षेत्र सक्रिय झाले आहे. या स्थितीमुळे परिसरातील आर्द्रता वाढून ढगनिर्मितीस चालना मिळाल्याने पाऊस पडेल, अशी शक्यता वर्तवण्यात आली आहे. तर दुसरीकडे दक्षिण अंदमान समुद्रात चक्रीवादळ निर्माण होण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे. या दोन हवामान बदलामुळे महाराष्ट्राच्या पावसाचे वातावरण तयार झाले आहे.
दरम्यान ऐन दिवाळीत पाऊस पडल्यास नागरिकांच्या नियोजनाचा खोळंबा होईल, अशी शक्यता वर्तवण्यात आली आहे. तसेच दिवाळीसाठी केलेली खरेदी, बाहेरच्या ठिकाणी असलेली रोषणाई आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे लक्ष्मीपूजन आणि दिवाळी पाडव्याच्या दिवशी आयोजित होणारे कार्यक्रम यावर याचा मोठा परिणाम होऊ शकतो. त्यामुळे नागरिकांनी हवामानाचा अंदाज घेऊन घराबाहेर पडावे, असे आवाहन करण्यात आले आहे. तसेच घराबाहेर पडताना छत्री किंवा रेनकोट सोबत ठेवावा, असेही आवाहन करण्यात येत आहे.
दिवाळीच्या काळात राज्यात पडणाऱ्या या अवकाळी पावसामुळे केवळ शहरी भागातील सणासुदीच्या कार्यक्रमांवरच नव्हे, तर ग्रामीण भागातील शेतकरी आणि पर्यटकांवरही परिणाम होण्याची शक्यता आहे. या काळात अनेक ठिकाणी शेतमाल काढणीला आलेला असतो, पण विजांच्या कडकडाटासह होणाऱ्या जोरदार सरींमुळे काढणी केलेल्या पिकांचे मोठे नुकसान होण्याची भीती वर्तवली जात आहे.
विशेषतः कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रातील भात, सोयाबीन आणि अन्य कडधान्य पिकांवर याचा विपरित परिणाम होऊ शकतो. त्यामुळे, शेतकऱ्यांनी आपला शेतमाल सुरक्षित ठिकाणी साठवावा. तसेच, दिवाळीच्या सुट्ट्यांमध्ये पर्यटनस्थळी जाणाऱ्या नागरिकांनी, विशेषतः घाटमाथ्यावरील आणि समुद्रकिनाऱ्यावरील पर्यटकांनी हवामानाचे अंदाज गांभीर्याने घेऊन आवश्यक ती खबरदारी घ्यावी. चक्रीवादळाच्या शक्यतेमुळे समुद्रकिनारी मोठी लाट उसळण्याची शक्यता असल्याने मच्छिमारांनी आणि पर्यटकांनी समुद्रात जाणे टाळावे, असे आवाहनही हवामान विभागाने केले आहे.




