मराठा आरक्षणाचा लढा अधिक तीव्र, मुंबई होईल बंद
शहर-जिल्ह्यातून हजारो तर जुळे सोलापुरातून शेकडो वाहने जाणार
सोलापूर : मराठा आरक्षणाचा लढा अधिक तीव्र होत आहे. मुंबईत २८ तारखेपासून होणाऱ्या मनोज जरांगे-पाटील यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी शहरासह जिल्ह्यांतून हजारो वाहनातून मराठा बांधव मुंबईला जाणार आहेत. जुळे सोलापूरमधीलही शेकडो वाहने गुरुवारी (ता.२८) सकाळी ११ वाजता गोविंदश्री मंगल कार्यालयापासून मुंबईच्या दिशेने रवाना करण्याचा निर्धार अखंड मराठा समाजाच्या वतीने करण्यात आला. रविवारी हॉटेल मयूरवन येथे झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.
मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्यात यावे, या मागणीसाठी मनोज जरांगे-पाटील यांनी पुन्हा बिगूल फुंकले आहे. २८ ऑगस्टला त्यांच्या नेतृत्वाखाली मुंबईत आंदोलन होत आहे. या आंदोलनासाठी राज्यातून लाखोंच्या संख्येने वाहने मुंबईला जाणार आहेत. काही मराठा बांधव रेल्वे प्रवास करत मुंबईला पोचणार आहेत. सोलापर जिल्ह्यातून दहा हजा वाहने मुंबईला जाण्याच्या तयारीत आहेत.
हेही वाचा : सर्व सरकारी कर्मचाऱ्यांना आणि पेन्शनधारकांना उद्याच वेतन मिळणार; उपमुख्यमंत्री अजित पवार
या बैठकीच्या प्रारंभी मजरेवाडी येथील रविराज भोपळे-पाटील यांची विजापूर रोड मध्यवर्ती गणेशोत्सव मंडळाच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल अभिनंदनाचा ठराव करण्यात आला. याबैठकीला रवी मोहिते, पोपट भोसले, सूरज टोणपे, संतोष शिंदे, नामदेव पवार, महेश देवकर, मनिषा नलावडे, प्रा. विजया काकडे, प्रशांत देशमुख, महेश घाडगे, सचिन गोडसे, अरुण कदम, प्रशांत बाबर, उमाकांत घुले, तात्या इंगोले, विकास कदम, विजय गुंड आदी समाजबांधव उपस्थित होते.
जुळे सोलापुरातून घरटी एकजण
जुळे सोलापूर परिसरात पंधरा ते वीस हजार मराठा कुटुंबे राहतात. या सर्व समाज बांधवांनी प्रत्येक घरातून किमान एकजण तरी मुंबई येथील आंदोलनात सहभागी व्हावे, असे आवाहन या बैठकीत करण्यात आले. ज्यांच्याकडे वाहने आहेत. त्यांनी आपले चारचाकी वाहन द्यावे, असा निर्णय या बैठकीत घेण्यात आला. या परिसरात राहणाऱ्या मराठा समाज बांधवांनी गुरुवारी (ता.२८) सकाळी ११ वाजता गोविंदश्री मंगल कार्यालयात जमावे, असे आवाहन करण्यात आले.
गावागावांत तयारी
गावागावातून दुचाकी, चारचाकी वाहनांसह मुक्कामाच्या व स्वयंपाकाच्या तयारीनिशी आंदोलक मुंबईला जाणार आहेत. अनेक गावातून ट्रॅक्टरमध्ये स्वयंपाक करता येईल, अशी व्यवस्था तयार करण्यात आलेली आहे. मागील काही दिवसांत गावागावांतून मुंबईला जाण्याची तयारी सुरू आहे. विशेष म्हणजे प्रवास खर्चासाठी लागणारे पैसे आंदोलकांनी वर्गणी स्वरूपाच जमा केले आहेत. मराठा समाजासह इतरही समाजातूनही वाहनांसह आर्थिक सहकार्य करण्यासाठी दानशूर व्यक्ती पुढे येत आहेत. सध्या गावागावात समाज बांधवांची सुरू असलेली तयारी पाहता या मोर्चामुळे मुंबई बंद होऊ शकते, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.





