कौशल्यम लाईटहाऊस सारख्या प्रकल्पामुळे युवकांना रोजगाराच्या नव्या संधी; महापौर रवि लांडगे
निगडी येथील यमुनानगर कौशल्यम लाईटहाऊस प्रकल्पाची महापौरांनी केली पाहणी, यशस्वी युवकांचा केला गौरव

पिंपरी | कौशल्यम लाईटहाऊससारखे आणखी प्रकल्प निर्माण करण्याची सध्या गरज असून, महापौर युवा रोजगार संकल्प योजनेतून सुद्धा रोजगारनिर्मिती केली जात आहे. अशा प्रकारे प्रत्येक तरुण-तरुणीला रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी आम्ही सदैव प्रयत्नशील राहू, असे प्रतिपादन महापौर रवि लांडगे यांनी केले.
निगडी येथील यमुनानगर परिसरातील कौशल्यम लाईटहाऊस प्रकल्पाची महापौर रवि लांडगे यांनी पाहणी करीत या प्रकल्पाचा आढावा घेतला. येथील प्रशिक्षण प्रक्रियेची माहिती जाणून घेत त्यांनी प्रकल्पातील यशस्वी युवकांशी संवाद साधला व त्यांच्या यशाचे कौतुक करत त्यांचा गौरव केला.
यावेळी उपमहापौर शर्मिला बाबर, नगरसदस्य उत्तम केंदळे, अनिल घोलप, क्षेत्रीय अधिकारी अतुल पाटील, लाईट हाऊस कम्युनिटीजच्या सीईओ अमृता बहुलेकर, प्रकल्प प्रमुख दीपिका केडिया तसेच लखन रोकडे, अक्षय किटे, वैभव कोल्हे, अभिजित कांबळे आदी उपस्थित होते.
हेही वाचा : शेतकऱ्यांना मोठा दिलासा; पीकविमा योजनेतून भरपाई मंजूर
महापौर रवि लांडगे म्हणाले, बदलत्या काळानुसार कौशल्याधारित शिक्षणाला विशेष महत्त्व प्राप्त झाले असून, उद्योगांच्या गरजेनुसार प्रशिक्षण देणे अत्यंत आवश्यक आहे. अशा उपक्रमांमुळे युवकांना केवळ नोकरीच नव्हे, तर स्वावलंबी होण्याची संधी मिळत आहे. भविष्यात अशा प्रकल्पांचा विस्तार करून अधिकाधिक तरुणांना रोजगाराच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी महापालिका कटिबद्ध आहे,असे देखील त्यांनी सांगितले.
यावेळी महापौर रवि लांडगे यांनी प्रशिक्षणाची गुणवत्ता, रोजगार संधी आणि विद्यार्थ्यांचा प्रतिसाद याबाबत समाधान व्यक्त केले. या प्रसंगी शिवमूर्ती सोनटक्के, सुमेधा ढाके, सुमित कुंभकरण, शंकर प्रसाद, रुचा लोंढे, अक्षय माने या नोकरी प्राप्त झालेल्या तसेच ओम सुर्वे, सचिन जाधव, प्रीती कोळेकर, आरती होलाडे या स्किल कोर्स पूर्ण केलेल्या युवक-युवतींचा सत्कार करण्यात आला. कौशल्य विकासाच्या माध्यमातून शहरातील अधिकाधिक युवकांना सक्षम करण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.





