‘महायुती’ तील मतभेदांचे दर्शन, व्हाया फडणवीस !

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे नेहमी ‘टू दि पॉईंट’ बोलण्यासाठी प्रसिद्ध आहेत. पत्रकारांना उत्तर देताना नेमकेपणा साधतात आणि इतर पाल्हाळ टाळतात ! त्यांची जीभ तर कधीच घसरत नाही. पण, नुकतीच एका कार्यक्रमात त्यांनी आपले डावे-उजवे हात म्हणजे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याबाबत जी टिप्पणी केली, त्यामुळे चर्चांना ऊत आला! या तिघांमध्ये विसंवाद किंवा मतभेद असल्याच्या वावड्या उठू लागल्या आहेत..!
‘महायुती’ एकत्रच लढणार..
‘महायुती’ मध्ये वादाची ठिणगी पडल्याची स्वप्ने पाहत विरोधी आघाडीमध्ये मात्र चांगलेच आनंदाचे वातावरण आहे. स्वतः फडणवीस किंवा भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी स्पष्ट केले आहे, की आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ‘महायुती’ मधील तीनही पक्ष एकत्रच लढवणार आहेत, पण शेवटी त्यांच्यातील मतभेद हे विरोधकांसाठी सुखद मानावे लागतील!
शिंदे-पवार संवादासाठी अयोग्य..
फडणवीस यांनी केलेल्या एका विधानाची सध्या सगळीकडे जोरदार चर्चा आहे. एका मुलाखतीत, त्यांनी अजित पवार आणि एकनाथ शिंदे हे दोघेही संवाद साधण्यात चांगले नसल्याचे म्हटले आहे. त्यांच्या या विधानामुळे ‘महायुती’ सरकारमध्ये सगळे सुरळीत सुरू नाही, हे मात्र पुढे आले आहे.
‘महायुती’ चे दणदणीत पुनरागमन..
विधानसभा निवडणुकीनंतर राज्यात प्रचंड बहुमताने ‘महायुती’ सरकारने पुनरागमन केले. भाजपाला ऐतिहासिक यश मिळाल्याने मुख्यमंत्रिपदी देवेंद्र फडणवीस विराजमान झाले, तर शिवसेनेचे एकनाथ शिंदे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार उपमुख्यमंत्री झाले. या तीन नेत्यांच्या नेतृत्वाखालील ‘महायुती’ सरकारमध्ये अधूनमधून वादाची ठिणगी पडत असते. मात्र, आम्ही आपआपसात संवाद साधून हे मतभेद दूर करतो, असा दावा या नेत्यांकडून वेळोवेळी केला जात असतो. अशातच एका मुलाखतीत फडणवीस यांनी आपल्या दोन उपमुख्यमंत्र्यांबाबत धाडसी विधान केले आहे. अजित पवार आणि एकनाथ शिंदे या दोघांपैकी एकही नेता संवाद साधण्यात चांगला नाही, असे फडणवीस यांनी म्हटले असून जणू बॉम्बच टाकला आहे!
महायुतीत ‘आलबेल’ नसल्याचे संकेत ?
एका मुलाखतीदरम्यान फडणवीस यांना काही प्रश्न विचारण्यात आले. अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांच्यामध्ये कोण सर्वांत चांगल्या पद्धतीने संवाद ठेवतात? असा प्रश्न यावेळी विचारण्यात आला होता. त्यावर फडणवीस म्हणाले की, त्यांनी मला माफ करावे, पण दोघेही चांगले संवाद साधणारे नेते नाहीत. मुख्यमंत्र्यांनी केलेल्या या धाडसी विधानाची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा होत असून ‘महायुती’ त सर्व काही ‘आलबेल’ नसल्याचे संकेत तर फडणवीस यांनी या माध्यमातून दिले नाहीत ना, अशी चर्चा मात्र रंगू लागली आहे.
हेही वाचा – ‘धनंजय मुंडे यांनी योग्य पर्याय निवडला, त्यांना मनःशांती मिळेल’; पंकजा मुंडे
अजित पवार की एकनाथ शिंदे ?
फडणवीस यांना या मुलाखतीमधील ‘रॅपिड फायर राऊंड’ मध्ये अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांच्याशी संबंधित इतरही काही प्रश्न विचारण्यात आले. अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांच्यात नैसर्गिक आपत्तीचे व्यवस्थापन कोणता नेता चांगल्या पद्धतीने करतो? या प्रश्नावर ते म्हणाले की, एकनाथ शिंदे यांना नैसर्गिक आपत्तीत स्वतःला झोकून देण्याची आवड आहे. त्यामुळे मी त्यांचे नाव घेईन. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत अजित पवार की एकनाथ शिंदे, कोण वरचढ आहे ? या प्रश्नावर देवेंद्र फडणवीसांनी चलाखीने उत्तर देत भाजपा वरचढ असल्याचे म्हणाले. तर पायाभूत सुविधांच्या विकासाबाबत कोणाचा दृष्टीकोन चांगला आहे? असे विचारले असता आम्हाला तिघांनाही हे काम आवडते, असे ते म्हणाले.
दोघांपैकी एकाचाही सल्ला घेणार नाही..
तुमचे तुमच्या पक्षश्रेष्ठींसोबत मतभेद झाले, तर तुम्ही या दोघांपैकी कोणाचा सल्ला घ्याल? असा प्रश्न फडणवीस यांना विचारण्यात आला होता. या प्रश्नावरही उत्तर देताना आपण अजित पवार किंवा एकनाथ शिंदे यांचा सल्ला घेणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. कारण, आमच्या पक्षनेतृत्वाला मी जास्त चांगला आणि जवळून ओळखतो. त्यांना त्याबाबत फार माहिती नाही, असे ते म्हणाले.
निधी वळविल्याचा आरोप चुकीचा..
फडणवीस म्हणाले, की लाडकी बहीण योजना ही राज्य सरकारची ‘गेमचेंजर’ योजना आहे. त्यामुळे लाडक्या बहिणींना प्राधान्य दिले आहेच. पण, लाडक्या बहीण योजनेसाठी अन्य खात्यांच्या निधी वळल्याचा आरोप अतिशय चुकीचा आणि खोटा आहे. अर्थसंकल्पाची पद्धत ज्यांना कळत नाही, तेच अशाप्रकारे आरोप करतात. कारण, अर्थसंकल्पाच्या नियमानुसार वैयक्तिक लाभासाठी जो निधी दिला जातो, तो आदिवासी विभागातच दाखवावा लागेल, अनुसूचित जाती व सामाजिक न्याय विभागातच तो दाखवावा लागेल. यासंदर्भात, अजित पवार यांनीही सभागृहात खुलासा केला आहे. पण बेछूट आरोप करणारे आरोप करतच असतात, असेही त्यांनी स्पष्ट केले.
एकनाथ शिंदे यांची शांतीत क्रांती..
दरम्यान, एकनाथ शिंदे यांची कामाची पद्धत वेगळी असून सुरू असून त्यांनी राज्यभर ‘ऑपरेशन टायगर’ हाती घेतले आहे. ते पक्षसंघटन बळकट करण्यावर ‘फोकस’ करत असून उद्धवसेनेचा तळागाळात अक्षरशः बाजार उठवत आहेत. गेल्या पाच महिन्यांत राज्यात अनेक ठिकाणी त्यांनी उद्धवसेनेत शिल्लक राहिलेल्या अनेकांना पुन्हा शिवसेनेत सामावून घेतले आहे. शिवसेनेने ठाकरेसेनेला धक्का देत दापोलीत सत्तापालट केले आहे ! दापोलीत सगळे ठाकरेसेना नगरसेवक अचानक फिरले आणि त्यांनी नगराध्यक्षपदी शिवसेनेच्या उमेदवाराची बिनविरोध निवड केली आहे !
ठाकरेसेनेत फक्त नवरत्ने शिल्लक..
थोडक्यात काय, येत्या काही दिवसांत उद्धव ठाकरे यांच्या पक्षात फक्त आदित्य, वरूण, परब, नार्वेकर, अंबादास, सावंत, प्रभू आणि सुनील व संजय राऊतबंधू ही नवरत्नेच शिल्लक राहणार, असे टोमणे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून मारले जात आहेत. तिकडे, अजितदादांच्या आघाडीवर दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येण्यावर चर्चा सुरू झाल्या असाव्यात, असे ठोकताळे आहेत.
तीनही नेते जमिनीवरील..
फडणवीस, शिंदे किंवा अजित पवार हे तीनही नेते तळागाळातील नागरिकांसाठी काम करणारे आणि जमिनीवर राहणारे नेते आहेत, त्यामुळे आपापसातील वादामध्ये ते हातची सत्ता घालवतील, असे कधीच वाटत नाही. जनतेला चर्चेला विषय मिळावा, म्हणूनच फडणवीस यांनी संवादाचा तो मुद्दा पुढे आणला असावा, हे निश्चित !