पाकिस्तानच्या तब्बल ११८ सीमा चौक्या उद्धवस्त; अमित शहांनी केली बीएसएफच्या कामगिरीची प्रशंसा

पूंछ : भारतीय सीमा सुरक्षा दलाने (बीएसएफ) ऑपरेशन सिंदूरवेळी केलेल्या प्रभावी कामगिरीची प्रशंसा केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी शुक्रवारी केली. पाकिस्तानच्या तब्बल ११८ सीमा चौक्या बीएसएफने उद्धवस्त केल्या. त्याशिवाय, सीमेवर देखरेख ठेवणारी पाकिस्तानी यंत्रणाही नेस्तनाबूत केली, असे त्यांनी नमूद केले.
भारताने नुकतेच पाकिस्तानची दाणादाण उडवणारे ऑपरेशन सिंदूर राबवले. त्यानंतर शहांनी प्रथमच जम्मू-काश्मीरचा दौरा केला. त्यांनी पूंछमध्ये बीएसएफ जवानांशी संवाद साधला. बीएसएफने दिलेल्या हादऱ्यातून सावरण्यासाठी पाकिस्तानला काही वर्षे लागतील.
भारताने दहशतवाद्यांना लक्ष्य करणारी मोहीम राबवली. त्यानंतर पाकिस्तानने सीमा भागांतील निवासी ठिकाणांवर मारा केला. त्याला जम्मू सीमेवर तैनात असणाऱ्या बीएसएफ जवानांनी चोख प्रत्युत्तर दिले.
देखरेख ठेवणाऱ्या आणि दळणवळण यंत्रणा उद्धवस्त झाल्याने पाकिस्तानला जबर तडाखा बसला. त्यामुळे पुढील काही काळ तो देश माहितीवर आधारित युद्ध छेडण्यास असमर्थ ठरेल, असा दावा शहा यांनी केला.
हेही वाचा – भारतातच व्यवसायाच्या मुबलक संधी उपलब्ध – ठाणेदार
शांतता काळातही बीएसएफचे जवान सीमेवर बारीक नजर ठेऊन असतात. वाळवंट, पर्वत, जंगलव्याप्त भाग असो की खराब हवामान; बीएसएफ संरक्षणाची पहिली फळी बनून सज्ज असते.
कुठल्याही स्थितीत प्रभावी, यशस्वी कामगिरी करण्यासाठी हृदयात देशभक्ती असावी लागते. तसेच, सर्वोच्च बलिदानासाठीही सज्ज असावे लागते. सीमेवरील कुठल्याही हल्ल्याला सर्वप्रथम बीएसएफला सामोरे जावे लागते.
पण, ते दल कशाची तमा बाळगत नाही. मी भारतीय नागरिकांच्या आणि केंद्र सरकारच्या वतीने बीएसएफ जवानांचे आभार मानतो. त्यांची कामगिरी आम्हा सर्वांसाठी अभिमानाचा विषय आहे, अशी भावनाही त्यांनी व्यक्त केली.
महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा