कर्मवीर काकासाहेब वाघ सहकारी साखर कारखाना गाळप हंगामापासून सुरू
शेतकऱ्यांना मिळणार मोठा फायदा

नाशिक : कर्मवीर काकासाहेब वाघ सहकारी साखर कारखाना (रानवड) येत्या गाळप हंगामापासून सुरू होणार आहे. कित्येक दिवासंपासून बंद पडलेले बॉयलर पुन्हा पेटणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली मुंबई येथे झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत कारखान्याचा गाळप हंगाम भाडेपट्ट्याने सुरू ठेवण्यासाठी नवीन फेरनिविदा प्रक्रिया राबविण्याचा ऐतिहासिक निर्णय घेण्यात आला आहे.
पूर्वी मे २०२१ पासून (स्व) अशोकराव बनकर सहकारी पतसंस्थेने भाडेपट्ट्यावर कारखाना चालवला होता. मात्र मागील गाळप हंगामात कारखाना बंद राहिला होता.
हेही वाचा – ‘मला उद्धव ठाकरे यांनी भेटायला बोलावलं तर मी देखील जाऊ शकतो’; संजय शिरसाट
पुढे कारखाना सुरू ठेवण्यास त्यांनी असमर्थता दर्शवल्याने राज्य सरकारकडून फेरभाडेपट्टा निविदा काढण्याचा मार्ग स्वीकारण्यात आला. या निर्णयामुळे तालुक्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना मोठा फायदा होणार आहे. आतापर्यंत उसाच्या वाहतुकीसाठी लांबच्या साखर कारखान्यांवर अवलंबून राहावे लागत होते. यामुळे वाहतूक खर्च, वेळ आणि उत्पादनातील नुकसान वाढत होते.
कारखाना पुन्हा सुरू झाल्यास शेतकऱ्यांचा ऊस वेळेत गाळला जाईल. स्थानिक तरुणांना रोजगाराच्या संधी मिळतील. ट्रान्सपोर्ट, दैनंदिन पुरवठा व सेवा क्षेत्रांना गती मिळेल. परिसरातील आर्थिक व्यवहाराला बळ मिळेल. हा निर्णय म्हणजे संपूर्ण परिसरासाठी नवचैतन्याची सुरुवात ठरणार असून, शासनाच्या या पावलाचे स्वागत केले जात आहे.