श्रीरामपुरातून ८० वारकऱ्यांची अनोखी सायकलवारी
यंदा आषाढी एकादशीनिमित्त सायकलवरून पंढरपूर गाठण्याचा संकल्प
श्रीरामपूर : वारी झाली पायीची, आता सायकलवरून! श्रीरामपूरच्या ८० हून अधिक वारकऱ्यांनी यंदा आषाढी एकादशीनिमित्त सायकलवरून पंढरपूर गाठण्याचा संकल्प केला आहे. २० जून रोजी पहाटे पाच वाजता श्रीराम मंदिर चौकातून या सायकलवारीला प्रस्थान होणार आहे. २२ जून रोजी पंढरपूरच्या रिंगण सोहळ्यात सर्वजण सहभागी होणार आहेत.
या वारीचे विशेष म्हणजे ही पंढरवारी सायकलवरून साकारते आहे. श्रद्धा, आरोग्य आणि पर्यावरणाचे त्रिसूत्री साधणारी! श्रीरामपूर सायकलिंग क्लबच्या पुढाकाराने ही अनोखी संकल्पना मूर्तरूप घेत आहे. क्लबचे प्रमुख डॉ. संकेत मुंदडा आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी गेल्या काही महिन्यांपासून यासाठी अभ्यासू व नियोजनबद्ध तयारी केली आहे.
श्रद्धा, सराव आणि पर्यावरणाचे भान वारी यशस्वी व्हावी यासाठी सायकलस्वारांनी नेवासे, शिर्डी, संगमनेर, शिवनेरीसारख्या स्थळांपर्यंत सराव दौरे केले. दर रविवारी १०० किलोमीटर सायकलिंगचा सराव हा त्यांच्या दृढ निश्चयाचा पुरावा आहे. पर्यावरण दिनानिमित्त संगमनेरच्या गणपती मंदिरात जाऊन सायकलवारीसाठी गणरायाचे आशीर्वादही घेतले गेले.
हेही वाचा – ‘मला उद्धव ठाकरे यांनी भेटायला बोलावलं तर मी देखील जाऊ शकतो’; संजय शिरसाट
यंदाचं वैशिष्ट्य :महिलांचा सहभाग
या सायकलवारीत ६ ते ७ महिलांनीही सहभाग नोंदवला आहे, हे विशेष आहे. करमाळा, टेंभुर्णी मार्गे तीन दिवसांचा हा प्रवास सोपा नसला, तरी उत्साह आणि श्रद्धा यातून सर्व अडथळे पार केले जातील, असा विश्वास सहभागी सायकल वारकऱ्यांना आहे.
राज्यभरातून साडेतीन हजार सायकल विठ्ठल
२२ जून रोजी पंढरपूरमध्ये राज्यभरातील ८७ सायकलिंग क्लबचे सुमारे ३५०० सायकलस्वार एकत्र येणार असून, सायकल रिंगण सोहळा, रॅली आणि सन्मान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. सायकलवरून पंढरीची वाट तुडवत सायकलस्वारांचा ‘माउली माउली’चा गजर ठिकठिकाणी आसमंतात दुमदुमवणार आहे.
सांस्कृतिक परंपरेला नवसंजीवनी
या संकल्पनेमुळे ‘वारी’ या परंपरेला नवे रूप मिळाले आहे. सायकलस्वार वारकरी ही महाराष्ट्राच्या सांस्कृतिक परंपरेतील नवसंजीवनी ठरत आहे. सामाजिक, शारीरिक आणि आध्यात्मिक आरोग्य यांची सांगड घालणारी ही सायकलवारी खरंच, हटके आहे.





