“आम्ही युरेनियमचा साठा नष्ट करू, पण इराणला देणार नाही”; मोजतबा खामेनींच्या भूमिकेनंतर डोनाल्ड ट्रम्प भडकले

Donald Trump | अमेरिका आणि इराणमधील युद्धाबाबत दोन महिन्यांचा कालावधी उलटूनही कोणताही ठोस तोडगा निघू शकलेला नाही. काही दिवसांपूर्वीच दोन्ही देशांमध्ये तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा करण्यात आली असली, तरी प्रत्यक्षात मात्र दोन्ही देशांतील तणाव कमालीचा वाढला आहे. यामुळे मध्य पूर्वेत पुन्हा एकदा महायुद्धाचे ढग गडद झाले आहेत. इराणचे सर्वोच्च नेते मोजतबा खामेनी यांच्या एका वक्तव्यानंतर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प इराणवर चांगलेच भडकले असून त्यांनी थेट साठा नष्ट करण्याची धमकी दिली आहे.
इराणचे सर्वोच्च नेते मोजतबा खामेनी यांनी, “देशातील शस्त्रास्त्र आणि युरेनियमचा साठा कोणत्याही परिस्थितीत देशाबाहेर जाणार नाही,” अशी ठाम भूमिका जाहीर केली. त्यांच्या या भूमिकेमुळे अमेरिका आणि इराणमधील शांतता करारात आता नवीन पेच निर्माण झाला आहे.
हेही वाचा
सिंधुदुर्गात देशातील पहिले अंडरवॉटर म्युझियम साकार
डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला थेट इशारा
मोजतबा खामेनी यांच्या वक्तव्याचा खरपूस समाचार घेत डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेत पत्रकारांशी बोलताना इराणला मोठा इशारा दिला. ट्रम्प म्हणाले, “अमेरिका इराणला समृद्ध युरेनियम स्वतःकडे ठेवू देणार नाही. इराण हा साठा स्वतःकडे बाळगूच शकत नाही. आम्ही तो साठा मिळवू. वास्तविक पाहता आम्हाला त्या युरेनियमच्या साठ्याची कोणतीही गरज नाही आणि तो आम्हाला नको आहे. पण तो आम्ही ताब्यात घेतल्यानंतर संपूर्णपणे नष्ट करू. मात्र, इराणला तो कोणत्याही परिस्थितीत घेऊ देणार नाही.” ते पुढे म्हणाले की, कोणत्याही परिस्थितीमध्ये इराणकडे अणुशस्त्र असणार नाही, यावर अमेरिका ठाम आहे.
शांतता वाटाघाटींमध्ये नवा अडथळा
गेल्या काही काळापासून अमेरिका आणि इराणमधील संघर्ष संपवण्यासाठी जागतिक पातळीवर हालचाली सुरू आहेत. मात्र, इराणचा युरेनियम साठा हा नेहमीच वाटाघाटींमधील सर्वात मोठा अडथळा ठरला आहे. आता दोन्ही देशांच्या प्रमुखांनी समोरासमोर घेतलेल्या आक्रमक पवित्र्यामुळे काही दिवसांपूर्वी झालेला युद्धविराम केवळ कागदावरच राहण्याची शक्यता असून, दोन्ही देशांमधील युद्ध पुन्हा एकदा भडकण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत.





