Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीमहाराष्ट्र

सिंदेवाहीत काळजाचा थरकाप उडवणारी घटना! तेंदूपत्ता तोडण्यासाठी गेलेल्या ४ महिलांचा वाघाच्या हल्ल्यात जागीच मृत्यू

चंद्रपूर | सिंदेवाही तालुक्यातील गुंजेवाही परिसरात आज, शुक्रवारी सकाळी वाघाने केलेल्या भीषण हल्ल्यात चार महिलांचा जागीच मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. एकाच वेळी चार महिलांचा वाघाने बळी घेतल्यामुळे संपूर्ण सिंदेवाही तालुक्यासह चंद्रपूर जिल्हा हादरला आहे. या घटनेमुळे गावात तीव्र संतापासोबतच दहशतीचे वातावरण निर्माण झाले असून तणावाची स्थिती आहे.

उन्हाळ्याच्या हंगामात तेंदूपत्ता संकलनाला सुरुवात झाल्याने ग्रामीण भागातील महिला व पुरुष मोठ्या संख्येने जंगलात जात आहेत. आज, २२ मे रोजी पहाटेच्या सुमारास गुंजेवाही गावातील काही महिला नेहमीप्रमाणे तेंदूपत्ता तोडण्यासाठी जंगलात गेल्या होत्या. सकाळी सुमारे आठ वाजताच्या दरम्यान जंगलात दबा धरून बसलेल्या वाघाने या महिलांवर अचानक झडप घातली.

प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, महिलांना सावरण्याची कोणतीही संधी न देता वाघाने त्यांच्यावर सलग जीवघेणे हल्ले केले. वाघाचा हा हल्ला इतका भीषण होता की, चारही महिलांचा घटनास्थळीच वेदनादायक मृत्यू झाला.

हेही वाचा

‘शेती कर्ज वाटपाचा विषय बॅंकांनी गांभीर्याने हाताळावा’; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

वाघाच्या हल्ल्यात मृत पावलेल्या चार महिलांची नावे पुढील प्रमाणे आहेत. कवडूबाई दादाजी मोहुर्ले (४५), अनुबाई दादाजी मोहुर्ले (४६), संगीता संतोष चौधरी (३६) व सुनीता कौशिक मोहुर्ले (३३).

ग्रामस्थांमध्ये तीव्र संताप; वन अधिकाऱ्यांची घटनास्थळी धाव

एकाच गावातल्या चार महिलांचा वाघाने शिकार केल्याची बातमी पसरताच गुंजेवाही गावावर शोककळा पसरली. घटनेची माहिती मिळताच सिंदेवाही वनपरिक्षेत्र अधिकारी अंजली सायंकर यांनी वन विभागाचे कर्मचारी आणि पोलीस पथकासह तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. प्रशासनाने मृतदेहांचा पंचनामा करून पुढील तपास सुरू केला आहे.

दरम्यान, या नरभक्षक वाघाचा तात्कालिक बंदोबस्त करण्यात यावा, अशी आक्रमक मागणी ग्रामस्थांनी केली आहे. वन विभागाने नागरिकांना सध्या जंगल परिसरात न जाण्याचे आणि सावधगिरी बाळगण्याचे आवाहन केले असून, परिसरात वन कर्मचाऱ्यांची गस्त वाढवण्यात आली आहे. या दुर्दैवी घटनेमुळे तेंदूपत्ता हंगामादरम्यान जंगलात जाणाऱ्या शेकडो मजुरांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button