भारताची सागरी ताकद वाढली; बॅलिस्टिक मिसाइलने सज्ज तिसरी आण्विक पाणबुडी नौदलात दाखल

INS Aridhaman Nuclear Submarine | जागतिक स्तरावर वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर भारताने आपल्या लष्करी सामर्थ्यात महत्त्वाची भर घातली आहे. बॅलिस्टिक मिसाईलने सज्ज असलेली ‘INS अरिदमन’ ही तिसरी आण्विक पाणबुडी शुक्रवारी भारतीय नौदलाच्या ताफ्यात दाखल झाली. या समावेशामुळे भारताची सागरी आण्विक क्षमता मोठ्या प्रमाणावर वाढली असून देशाच्या सागरी सीमांची सुरक्षा अधिक बळकट झाली आहे. याच कार्यक्रमात अत्याधुनिक तंत्रज्ञानाने सुसज्ज ‘INS तारागिरी’ या युद्धनौकेचे जलावतरणही करण्यात आले. विशाखापट्टणम येथे झालेल्या या कार्यक्रमाला देशाचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
INS अरिदमन आणि INS तारागिरी यांच्या जलावतरणाच्या पार्श्वभूमीवर संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी सोशल मीडियावर मोजक्या शब्दांत सूचक संदेश दिला. “फक्त बोलत नाही, करून दाखवतो,” अशा आशयाची पोस्ट त्यांनी शुक्रवारी सकाळी शेअर केली.
कार्यक्रमात बोलताना त्यांनी INS अरिदमनच्या समावेशामुळे भारताच्या नौदलाची ताकद लक्षणीय वाढल्याचा उल्लेख केला. तसेच, देशाच्या सागरी सीमा आता अधिक सुरक्षित झाल्याचा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
हेही वाचा : अभिषेक शर्मावर बीसीसीआयची कारवाई; २५ टक्के मॅच फीचा दंड
भारताला मिळालं ‘तिहेरी संरक्षण’
INS अरिदमनच्या समावेशामुळे आता भारताच्या सागरी सीमांना तिहेरी संरक्षण मिळाले आहे. याआधी भारतीय नौदलाच्या ताफ्यात INS अरिहंत आणि INS अरिघात या लांब पल्ल्याच्या अण्वस्त्रवाहू पाणबुड्या आधीपासूनच कार्यरत आहेत. आता या दोन्ही पाणबुड्यांसोबत INS अरिदमनची भर पडल्याने भारताची सामरिक ताकद आणखी वाढली आहे.
विशेष म्हणजे, एकाचवेळी भारताच्या तीन अण्वस्त्रवाहू पाणबुड्या समुद्रात उतरण्याची ही पहिलीच वेळ ठरली आहे, ज्यामुळे भारताच्या सागरी सुरक्षेला नवे बळ मिळाले आहे.
महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा





