एक अत्यंत गलिच्छ रेल्वे स्थानक: कान्हे स्टेशन अन् तिथला अनागोंदी कारभार
काही वेळेला आपला एखाद्या गावाविषयी प्रचंड उत्सुकता असते. आजुबाजूच्या स्वस्त घरांच्या जाहिरातींमुळे तर आपली उत्सुकता शिगेला पोहोचते . आपण लगेच वेळ काढून खास ते गाव बघायला जातो. वाटेत आपण खूप कल्पनेत स्वप्नरंजन केलेले असते, खूप चित्र रंगवलेली असतात.त्या स्टेशनवर आपण उतरतो …. इकडे तिकडे पाहू लागतो आणि तिथूनच आपल्या भ्रमनिरासाची कहाणी सुरू होते. कारण कान्हे स्टेशन च्या बाहेर जाण्यासाठीचा मुख्य रस्ता आणि प्रवेशद्वार आपण शोधू लागतो. पण इतर स्टेशन्स प्रमाणे ते तसं नाही हे आपल्या लक्षात येतं. ट्रॅकच्या बाजूने एक पायवाट फुटलेली आपल्याला दिसते. तिथून अनेक लोक जीव मुठीत घेऊन कसेबसे मुख्य रस्त्याकडे जात असतात. एखादी जलद गाडी आली तर हा प्रवास अधिकच जीवघेणा ठरू शकतो. ज्येष्ठ नागरिकांसाठी तर हा रस्ता म्हणजे अपघात होण्याचे हमखास साधन. जरा जरी तोल गेला तरी माणूस खाली पडलाच म्हणून समजा. पुल पार करून आपण पलीकडे गेलो जिथे नागरी वस्ती थोडी जास्त दिसत होती. तिथे सहज म्हणून तिकीट खिडकीपाशी थांबायचे म्हंटले तर तिथे इतके दुर्गंधी पसरलेली होती. की आपण एक क्षण सुद्धा थांबू शकत नाही. तिथे मात्र बाहेर पडण्याचा व्यवस्थित रस्ता दिसला. पण तिथून मुख्य रस्ता मात्र गल्ल्यागल्ल्यांमधून चोरवाटांनी तयार झालेला. तुलनेने बरा.
गावात गेल्यावर. गाव तसं छान… शाळेचा परिसर उत्तम. मुख्य रस्ता जो हायवे कडे जातो तोही तसा छान. पण मुख्य गोष्ट म्हणजे जेव्हा पुन्हा परतीच्या प्रवासासाठी पुन्हा रेल्वे स्टेशनवर येण्याचा प्रसंग आला. परतीचे तिकीट काढण्यासाठी पुन्हा तिकीट काउंटरपाशी आलो. ती दुर्गंधी आता वाढलेली होती. आणि तिकीट काउंटर वर कोणीच नव्हते. स्टेशन मास्तर कडे तक्रार करायला जाणार, तर ते स्टेशन मास्टर बाहेर येऊन उभे राहिलेले. अत्यंत उर्मट किंवा कदाचित त्या दुर्गंधीमुळे वैतागल्यामुळे थोडेसे चिडलेलेच वाटत होते. “आत्ता तिकीट मिळणार नाही. कारण आता अर्ध्या तासाने ट्रेन आहे. तेव्हाच तुम्हाला तिकीट मिळेल”.पण असं कसं ना, ट्रेन जरी अर्ध्या तासाने असली तरी रेल्वेच्या नियमाप्रमाणे अर्ध्या तासापूर्वी काढलेले तिकीट हे वैध ठरलच पाहिजे. तिकीट काढल्यानंतर ते एक तास वैध असतं रेल्वेच्या नियमाप्रमाणे.
तिकीट काउंटर वर अर्धा तास उभं राहणं शक्यच नव्हतं. त्यामुळे रेल्वेच्या तिकिटाच्या अधिकृत ॲपवर पाहिलं असता तिथे कान्हे स्टेशनचं नावच येत नव्हतं. त्याच्या पुढच्या स्टेशनचं नाव म्हणजेच कामशेत स्टेशनचं नाव येत होतं, वडगाव च नाव येत होत. पण कान्हे हे नाव तर काही येईना. तिकीट कामशेतहून काढायचं म्हटलं तर दर बदलत होता. तळेगाव ते कान्हे चा तिकीट दर हा पाच रुपये आहे. तर तळेगाव ते कामशेत हा दहा रुपये दाखवत होता. म्हणजेच पाच रुपये वाढत होते. शेवटी अर्धा तास थांबून ते तिकीट काउंटर वरच काढण्यात आलं. तिकीट काढून समोरच्या प्लॅटफॉर्मवर थांबलो . ट्रेनची वाट बघत. लोकल उशिरा आली आणि तीही अत्यंत भरून. ज्याच्यात चढताना निव्वळ अशक्य होतं. तिथे अजून एक बाब खटकली ते म्हणजे प्लॅटफॉर्म ची उंची आणि ट्रेन यांच्यात इतकी तफावत असल्यामुळे उतरणार्यांना उड्या माराव्या लागत होत्या चढणाऱ्यांना जीवाची बाजी लावावी लागत होती. ज्येष्ठ नागरिकांचे हाल तर बघवत नव्हते. गर्दीमुळे ती लोकल सोडावी लागली. पुन्हा तसेच थांबलो.
ॲप मध्ये लगेच अर्ध्या तासाने लोकल दाखवीत होते. पण तीच लोकल तब्बल दोन तासांनी आली. त्यादरम्यान स्टेशनवर कुठल्याही प्रकारची घोषणा नव्हती की काहीही नव्हतं.
एक नवीन पद्धत तिथे कळली की तेथील नेहमीची लोकं ही सिग्नल प्रमाणे आणि फाटक बंद झालं की ठरवतात की आत्ता कदाचित लोकल येण्याची वेळ झाली आहे. आणि मग ते स्टेशनवर जातात. सिग्नल आणि फाटकातून हे तर कळतच नाही की आत्ता येणारी ट्रेन ही लोकलचा आहे की नाही. कारण आम्ही असताना पाच वेळा तरी त्या लोकलने आम्हा सगळ्या प्रवाशांना जबरदस्त गुंगारा दिला. प्रत्येक वेळेला वाटायचं की आता आली लोकल. पण ती लोकल नव्हती, तर वेगवेगळ्या एक्सप्रेस आणि मालगाड्या जात येत होत्या. त्याही इतक्या भरधाव वेगाने की अख्खा प्लॅटफॉर्म हादरत होता. त्यावेळी फारच भीतीदायक वातावरण होत होते. शेवटी दोन तासाने ती लोकल एकदाची आली. अन आम्ही त्यात बसलो. आणि एकदाचे तळेगावला पोहोचलो.
तळेगावला उतरल्यानंतर आमच्यासारख्यांनी तर ठरवलं पुन्हा कधीही कान्हे स्टेशनला सहज म्हणून फिरायला जायचं नाही. पण हे आमचं झालं. जे नेहमीचे जाणार आहेत कामधंद्यांसाठी, त्यांचं काय? त्यांचा आणि इतर प्रवाशांचा कोणी विचार करणार आहे का?
बातम्यांमध्ये कळतं की, रेल्वे स्टेशन्स ही आता आंतरराष्ट्रीय दर्जाची होणार आहेत. म्हणजेच तिथे आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सुख सोयी रेल्वे कडून प्रदान केल्या जाणार आहेत. ती होतील तेव्हा होतील हो, पण, कान्हे स्टेशन सारख्या आदल्या मधल्या स्टेशनचा विचार रेल्वे करणार आहे की नाही, तिथल्या स्वच्छतेचा, ज्या मूलभूत सुविधांचा समावेश एक स्टेशन म्हणून असायला हवा त्याही जर तिथे नसतील तर कसं व्हायचं. ना तिथे स्वच्छतागृह आहे. प्लॅटफॉर्मवर काही ठिकाणी छत सुद्धा नाही. प्रवाशांना शिस्तीत बाहेर पडण्यासाठी अधिकृत मुख्य प्रवेशद्वारच नाही. रेल्वे ट्रॅकच्या बाजूने जीव मुठीत घेऊन बाहेर जाणं, बाहेर कसलं जाणं, बाहेरच असता मुख्य रस्त्यावर जाता . याला अधिकृत स्टेशनचा दर्जा तरी कसा मिळतो? रेल्वेच्या तिकिटांच्या अधिकृत ॲप मध्ये सुद्धा या कान्हे स्टेशनला जागा नाही. अशा गलिच्छ रेल्वे स्टेशन बद्दल कोणी काहीच बोलत नाही. सगळेजण मूक गिळून गप्प बसलेले असतात आणि अशी गलिच्छ रेल्वे स्टेशन्स आपल्या मावळ तालुक्यात आहेत याबद्दल लाज वाटते. ते बुलेट ट्रेन वगैरे असू द्या, पण जरा रेल्वेला आणि केंद्र सरकारला म्हणावं तुम्ही जरा आदल्या मधल्या स्टेशन्सना सुद्धा सुधारा, तिथे सुद्धा माणसंच राहतात, आणि चांगल्या सुविधा मिळणं हा त्यांचा सुद्धा अधिकार आहे बरं का!
इतकेच
धन्यवाद
लेखक: हर्षल आल्पे





