दिल्ली साहित्य संमेलनात मोदी हेच ‘मॅन ऑफ द मॅच’!

दिल्लीमध्ये आयोजित ९८ व्या मराठी साहित्य संमेलनात जो उद्घाटन सोहळा पार पडला, त्यावेळी सर्वांची जोरदार भाषणे झाली. पण, साहित्य संमेलनाचे मैदान पंतप्रधान आदरणीय नरेंद्रजी मोदी यांनीच गाजवले. तेच ‘मॅन ऑफ द मॅच’ ठरले !
वास्तविक, यावेळी व्यासपीठावर ज्येष्ठ नेते शरद पवार, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, संमेलनाध्यक्षा डॉ. तारा भवाळकर तसेच अन्य प्रतिथयश वक्ते होते, पण मोदी यांनी कधी हिंदीतून तर कधी मराठीतून केलेली फटकेबाजी मराठी माणसाच्या मनावर बिंबली आणि ती खूप काळ स्मरणातही राहील !
संस्कारित राजकारण्याची देहबोली
मोदी यांनी आपल्या भाषणाची सुरुवातच प्रचंड टाळ्यांच्या कडकडाटात केली. शरद पवार यांनी हे भाग्य माझ्या वाटेला दिले, हे सांगताना आणि त्याच्या बरोबर वावरताना जी देहबोली मोदीजी यांची होती, ती एका संस्कारित राजकारण्याची होती.
उद्घाटनावेळी दीप प्रज्वलन करताना पवारांना बोलावून घेणे, खुर्ची सरकवून त्यांना बसण्यास मदत करणे, स्वतः पाणी ओतून पवार यांना देणे.. हे सगळे पवार यांच्या ज्येष्ठत्वाचा सन्मान होता. राजकीय मतभेदाच्या पलीकडे संबंध असले पाहिजेत, हे खानदानी संस्कार त्यांनी अगदी सुरुवातीलाच महाराष्ट्रातील अगदी फालतू राजकारण्यांना दाखवून दिले !
प्रत्यक्ष भाषणाच्या वेळी व्यासपीठावर उपस्थित असणाऱ्या किंवा दूरवरून पाहणाऱ्या सगळ्या पुरोगामी, तथाकथित समाजवाद्यांना तसेच मोदीद्वेष्टांना त्यांनी मराठी आणि महाराष्ट्राची जी परंपरा आठवण करून दिली, त्यातून तात्विक आणि वैचारिकदृष्ट्या आपण किती पक्के आहोत, हेही त्यांनी दाखवून दिले. त्यांचे भाषण ऐकून त्यांच्या धाडसाचे, योग्य वेळ साधण्याचे आणि विरोधकांना न डगमगता स्पष्ट बोलण्याचे कौतुक करावे तेवढे थोडेच !
पुरोगामीत्वाच्या नावाखाली बाजार
सगळ्या मंडळीनी पुरोगामीत्वाच्या नावाखाली साहित्य, संस्कृती आणि कला क्षेत्रात जो धुमाकूळ घातला आहे, त्या सर्वांना महाराष्ट्र नेमका कुणामुळे ओळखला जातो ? मराठी भाषेचे वैभव कसे आहे ? हे सांगताना ज्या महापुरुषांची नावे मोदी यांनी घेतली, त्याच महापुरुषांना या पुरोगामींच्या विशिष्ट प्रकारच्या कारस्थानांमुळे हद्दपार करण्याचा गेली कित्येक वर्षे जणू चंगच बांधला होता. महाराष्ट्रातील हिंदुत्ववादी म्हणवणारे राजकारणी पण लाजेकाजेस्तव या महापुरुषांची आडून पाडून नावे घेत होते. पण, मोदींनी एकाचवेळी पुरोगामी आणि हिंदुत्ववादीना तत्वाचा, विचाराचा निग्रह काय असतो आणि तो कसा मांडता येतो, हेच कुठलाही आक्रस्ताळेपणा न करता सहजपणे दाखवून दिले. पुरोगामी विचारसरणीच्या डोळ्यात झणझणीत अंजन घालण्याची खेळी मोदींनी यशस्वीपणे राबवली.
हेही वाचा : पिंपरी-चिंचवडमधील माजी सैनिकांच्या हितासाठी सदैव कटिबद्ध!
मराठीचा डौलच न्यारा
नुकताच अभिजात दर्जा मिळालेली आणि कित्येक वर्षांची परंपरा असलेली मराठी भाषा ही ज्ञानेश्वर माऊलींच्या ज्ञानेश्वरी मध्ये आहे, तुकारामांच्या गाथेत आहे, हे सांगताना आपली उज्ज्वल संत परंपरेची आठवण करून दिली. त्याच बरोबरं समर्थ रामदास स्वामी यांच्या मराठा तितका मेळवावा ! हा उल्लेख करताना त्यांनी कुठलाही न्यूनभाव मनात ठेवला नाही. आपल्याकडील काही संतांना डावलण्याचं कुभांड विकृत मंडळी रचत असतात त्यांना मोदींनी चपराक दिली आहे.
टिळक, सावरकर, फडके, चाफेकर बंधू
संपूर्ण देशाला स्वातंत्र्य लढ्याला प्रेरणा देणारे लोकमान्य टिळक, स्वातंत्र्यवीर सावरकर, वासुदेव बळवंत फडके, चाफेकर बंधू हे सगळे मराठी भाषिक होते, हे सांगताना जातीभेद करणाऱ्यांना त्यांनी तुला लगावला, अप्रत्यक्षपणे अधोरेखित केले.
गीतारहस्य आणि ज्ञानेश्वरीचेही कौतुक
लोकमान्य टिळकांच्या गीतारहस्य ग्रंथाचा जाणीवपूर्वक दोनदा वेगवेगळ्या संदर्भात केलेला उल्लेख विशेष म्हणावा लागेल. मराठीमध्ये गीतेवर टीकात्मक ग्रंथ ज्ञानेश्वरी हा आजही सगळ्यांचा संदर्भ ग्रंथ आहे हे त्यांनी निक्षून सांगितले.
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पराक्रमाला साजेशी मराठी भाषा आहे आणि मग ‘छावा’ या सध्या सर्वात चर्चेत असणाऱ्या शंभूराजांच्या जीवनावरील हिंदी चित्रपटाचा उल्लेख करताना मोदीनी शिवाजी सावंत यांच्या मूळ ‘छावा’ या मराठी कादंबरी वरून हा चित्रपट निर्माण केला गेला आहे, हे आवर्जून सांगितले. त्यांनी पेशव्यांच्या पराक्रमाचा गौरव करताना कुठलेही आणि कसलेही आढेवेढे घेतले नाहीत.
सनावळी आणि संदर्भ तोंडपाठ
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेक वर्षाला ३५० वर्षे, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जन्मवर्षाला ३०० वर्षे हा उल्लेख तर त्यांनीं केलाच, पण त्यानंतर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाबद्दल त्यांनी काढलेले उदगार सर्व स्वयंसेवक , कार्यकर्ते यांना सुखद धक्का देणारे, सुखावणारे आणि अभिमान बाळगावा, असे ठरले. संघाचा उल्लेख बाकीचे वक्ते नेहमी टाळतात, त्यालाच मोदींनी उच्च स्तरावर नेऊन ठेवले !
संघामुळे मराठीशी संबंध दृढ
शंभर वर्षापूर्वी महाराष्ट्रात डॉ. केशव बळीराम हेडगेवार या महापुरुषाने राष्ट्रीय स्वयंसेवक संघ या संघटनेचे बीज रोवले आणि आता तो एक वटवृक्ष बनला आहे, हे त्यांनी ठणकावून सांगितले. वेदांपासून ते स्वामी विवेकानंद यांच्या विचारधारेला स्थापित करण्यासाठी निर्माण झालेले कार्य असा संघकार्याचे वर्णन करताना त्याचा उल्लेख ‘संस्कार यज्ञ’ या शब्दात त्यांनी केलाच आणि माझ्यासारख्या लाखो लोकांना देशासाठी समर्पित होण्याची प्रेरणा संघाने दिली आहे, हे पण विशेष करून सांगितले ! माझी मराठीची ओळख दृढ होण्यास संघ कारणीभूत आहे हेही त्यांनी स्पष्टपणे कबूल केले.
परांजपे, रानडे, गोखले, अत्रे
मोदी यांनी शि. म. परांजपे, महादेव गोविंद रानडे, गोपाळ कृष्ण गोखले, आचार्य अत्रे , वीर सावरकर या सगळ्या जुन्या साहित्य संमेलनाच्या अध्यक्षांचा उल्लेख करताना आजच्या उथळ, अर्ध्या हळकुंडानी पिवळ्या झालेल्या साहित्यिक महामंडळातील पोटभरू मंडळींना एक प्रकारे विसरलेल्या उज्ज्वल परंपरेची आठवण करून दिली. त्यांनी ज्योतिबा तसेच सावित्रीबाई, महर्षी कर्वे आणि परमपूज्य बाबासाहेब आंबेडकर यांच्या माध्यमातून मराठी भाषेने समाज सुधारणेचा कसा मार्ग अवलंबला, हे सांगितलेच. पण, मराठीने दलित वेदनेतून निर्माण झालेल्या दलित साहित्याचा पण गौरवपूर्ण उल्लेख केला.
चक्क .. गजानन दिगंबर माडगूळकर
संपूर्ण महाराष्ट्राला गीत रामायण रचून मोहित करणारे आधुनिक वाल्मिकी गदिमा यांच्या पूर्ण नावाचा त्यांनी केलेला उल्लेख अनेकांना अचंबित करून गेला. तर सुधीर फडके यांच्याबरोबर या गीत रामायणाने अद्भुत परिणाम समाजजीवनावर केल्याचे त्यांनी सांगितले. त्यांचे चौफेर ज्ञान प्रत्येक शब्दातून स्पष्ट दिसत होते.
मोदींचे टोले ऐकण्याशिवाय पर्याय नव्हता
मराठी सारस्वतात गेल्या ३०/४० वर्षात घुसलेल्या बांडगुळाना त्यांच्या राजकीय आश्रयदात्यासमोर मोदी जेव्हा हा चिंतनशील आरसा समोर ठेवत होते, तेव्हा त्या सर्वांचे चेहरे हे बघण्यासारखे झाले होते. सत्य तर स्वीकारण्याशिवाय पर्याय नव्हता. पण, टाळ्या वाजवण्याचे साहस पण नव्हते. अधून मधून काही टाळ्यांच्या आवाजाने या संमेलनात काही राष्ट्रीय विचाराचे प्रतिनिधी उपस्थित आहेत, हे कळत होते आणि महाराष्ट्रात साहित्याच्या क्षेत्रात अजूनही राष्ट्रीय विचाराच्या मंडळींना खूप पल्ला गाठायचा आहे, हे लक्षात येत होते.
अत्यंत सुंदर आणि स्वच्छपणे वाहणारा साहित्याचा प्रवाह विद्रोहामुळे गढूळ करणाऱ्या अनेकांना मोदींचे भाषण आणि विचार पटले नसतीलही, पण मराठीची परंपरा आणि तिचे पावित्र्य जपणे, एवढेच त्यांना पटले तरी खूप ! ज्या प्रमाणे, ब्राह्मण्यवादावर टीका करणे म्हणजे समाजवादी, त्याचप्रमाणे साहित्यावर टीका करणे म्हणजेच विद्वान असे समजणाऱ्यांना मोदींनी अक्षरशः धू..धू धुतले, आणि या उद्घाटन सोहळ्याचे ते ‘मॅन ऑफ द मॅच’ ठरले!