भाजपचे नव्या अध्यक्षांच्या निवडीच्या दिशेने पाऊल; लवकरच संपणार सस्पेन्स

BJP : भाजपने सोमवारी काही राज्यांचे प्रदेशाध्यक्ष निश्चित केले. आता उद्या (मंगळवार) आणखी काही प्रदेशाध्यक्षांच्या नावांवर शिक्कामोर्तब होईल. त्या प्रक्रियेकडे पक्षाच्या नव्या राष्ट्रीय अध्यक्षांच्या निवडीच्या दिशेने पाऊल म्हणून पाहिले जात आहे. त्या निवडीने विद्यमान अध्यक्ष जे.पी.नड्डा यांचा उत्तराधिकारी कोण ठरणार याविषयीचा सस्पेन्स संपेल.
भाजपच्या ३७ प्रदेश शाखा आहेत. त्यापैकी किमान १९ शाखांचे प्रदेशाध्यक्ष निश्चित झाल्यानंतर नव्या राष्ट्रीय अध्यक्षांच्या निवडीची प्रक्रिया सुरू करता येऊ शकते. पक्षाच्या घटनेनुसार ती अनिवार्यता आहे. भाजपने सोमवारी पुदुचेरी आणि मिझोरमचे प्रदेशाध्यक्ष निश्चित केले. ती धुरा अनुक्रमे व्ही.पी.रामलिंगम आणि के.बेइछुआ यांच्याकडे सोपवण्यात आली. त्यामुळे भाजपच्या १६ प्रदेश शाखांना प्रदेशाध्यक्ष मिळाले आहेत.
हेही वाचा – चांदणी चौक जलवाहिनी गळती; उद्या उशिराने पाणीपुरवठा
आता उद्या महाराष्ट्र, उत्तराखंड, तेलंगणा आणि आंध्र प्रदेशातील प्रदेशाध्यक्षांची औपचारिक घोषणा होईल. महाराष्ट्रासह (रवींद्र चव्हाण) संबंधित राज्यांचे प्रदेशाध्यक्ष निश्चित झाले आहेत. त्याबाबतच्या घोषणनेनंतर पक्षाच्या प्रदेशाध्यक्षांची संख्या २० इतकी होईल. त्यामुळे नव्या राष्ट्रीय अध्यक्षांच्या निवडीची प्रक्रिया सुरू करण्याचा भाजपचा मार्ग मोकळा होईल. ती निवड जुलैमध्येच मार्गी लागण्याची शक्यता आहे.