महाराष्ट्राचे अर्थमंत्री दहावी पास, त्यांना अर्थकारण कळतं का? अंजली दमानियांची अजित पवारांवर बोचरी टीका

पुणे | महाराष्ट्राच्या राजकारणात नेमकं काय चाललं आहे हेच आता कळेनासं झालं आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जे राज्याचे गृहमंत्री आहेत, ते निलेश घायवळसारख्या व्यक्तीला वाचवत आहेत, हे अत्यंत दुर्दैवी आहे, अशी टीका सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी केली.
अंजली दमानिया काय म्हणाल्या?
राजकारणात काय चाललं आहे तेच कळत नाही. आज जो पक्ष एका पक्षाबरोबर आहे तो दुसऱ्याबरोबर जातो आणि पहिल्यावर टीका करायला लागतो. घायवळ प्रकरणात देवेंद्र फडणवीस म्हणतात की आम्ही पासपोर्टची संमती दिली नव्हती. हे सगळं जे काही चाललं आहे ते किळसवाण्या पद्धतीने होतं आहे, असं अंजली दमानिया यांनी म्हटलं आहे.
हेही वाचा : राज ठाकरे सहकुटुंब मातोश्रीवर, उद्धव ठाकरेंसह स्नेहभोजन; ठाकरे बंधूंची तीन महिन्यांतली सहावी भेट
संपूर्ण महाराष्ट्राची परिस्थिती बिकट होत चालली आहे. अमुक पक्ष हिंदुत्ववादी अमुक पक्ष सेक्युलर अशी भांडणं आहेतच. शिवाय बिहारसारखी महाराष्ट्राची स्थिती होत चालली आहे. पुणे किंवा बीडच नाही राज्यातली परिस्थितीच वाईट आहे. भ्रष्टाचार अमाप प्रमाणात चालला आहे. अधिकारीही वरुन फोन आला तरच कामं करतात. हे आपल्या सगळ्यांचं नागरिक म्हणून दुर्दैव आहे असं मला वाटतं असं अंजली दमानिया म्हणाल्या.
महाराष्ट्राचे अर्थमंत्री हे दहावी पास आहेत. त्यांच्या शिक्षणावर मला टीका करायची नाही. पण अर्थकारण त्यांना खरंच कळतं का यासाठी मी हे उदाहरण दिलं. महाराष्ट्र हा स्वित्झर्लंड इतका मोठा आहे. पण तो एक देश आहे आणि आपला महाराष्ट्र हे आपलं राज्य आहे. महाराष्ट्रावर सध्या नऊ लाख कोटींचं कर्ज आहे. हे पैसे कुठूण आणणार यावर कुणीही चर्चा करत नाही. क्षुल्लक गोष्टींचं राजकारण कायमच केलं जातं पण हा प्रश्नही महत्त्वाचा आहे असंही अंजली दमानिया म्हणाल्या.




