भाषावादाचे घोंगावणारे वादळ ‘यु-टर्न’ मुळे सध्या तरी शमले !

हिंदी भाषा सक्तीच्या प्रकरणावरून उद्भवलेले वादंग सध्या तरी मिटले आहे. त्याला ‘महायुती’ सरकारचा यु-टर्न म्हणा किंवा ठाकरे बंधूंची सामंजस्याची भूमिका म्हणा, पण समाजावर घोंगावणारे वादळ सध्या तरी शमले आहे ! यामध्ये नेमका फायदा कोणाचा आणि तोटा कोणाचा याची समीकरणे राजकीय तज्ज्ञ खुशाल मांडोत, पण, यामध्ये उद्धव आणि राज या ठाकरे बंधूंचे हिंदुत्व मात्र जनतेला कळून चुकले आहे, हे नक्की!
ठाकरे बंधूंकडून स्वतःचीच गोची!
हिंदी सक्तीच्या मुद्द्यावर लढताना दोन्ही ठाकरे बंधू आक्रमक होतेआणि एकत्र मोर्चा काढणार होते. पण, असे असले तरी दोघा ठाकरेंना कळून चुकले आहे, की त्यांच्या हिंदुत्वाच्या भूमिकेची त्यांनी स्वतःच गोची करून ठेवली आहे. आणि मग, घराण्याकडे असलेल्या जुन्या औषधाची आठवण त्यांना झाली! पुन्हा तेच जुने औषध.. भाषावाद !!
देशापुढील समस्यांचे काय?
तिकडे बंगाल जळत आहे, बांगलादेशी घुसखोरांनी तिकडे अक्षरशः वक्फ कायद्यावरून भारतीयांशी युद्ध पुकारले आहे, पण दोघांपैकी एकसुद्धा ठाकरे यावर व्यक्त झालेले नाहीत. त्यांचा हक्काचा भोंगा सकाळी वाजलेला आठवत नाही. किती मोठी संधी आहे, बघा.. बंगालच्या निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाहांवर टोमण्यांचे बाणावर बाण मारण्याची संधी उद्धव साहेब आणि संजय राऊत यांना आहे, तथापि, त्या विषयात अभ्यासा नसणाऱ्या या राजकारण्यांना मुळीच इंटरेस्ट दिसत नाही.
बंगालमधील हिंदूंची दुरवस्था..
बंगालचा हिंदू ‘त्राही माम’ अवस्थेत असताना महाराष्ट्रात कोणत्याही राजकीय पक्षाचा एकही नेता असे म्हणालेला नाहीय की ‘आम्ही बंगालच्या हिंदूंसोबत आहोत. जसे काश्मिरच्या बाबतीत चूक झाली, तशी बंगालच्या बाबतींत होऊ देणार नाही म्हणून! पण हल्ली झाले आहे काय, काहीही झाले तरी ते निपटण्यास केंद्र सरकार सक्षम आहे, त्यामध्ये आपला आणि आपल्या पक्षाचा फायदा असेल तरच मध्ये नाक खुपसायचे.. मोदी सरकारला कशी अक्कल नाही.. देवाने ती फक्त आपल्याला दिली आहे, याचा आणायचा आणि डायलॉग बाजी करत फड जिंकल्याच्या थाटात शड्डू ठोकायचा, हाच यांचा उद्योग झाला आहे !
बांगलादेशी घुसखोरांचे काय ?
तसा विचार केला तर आपल्या इथे मुंबईत बांगलादेशी घुसखोर कमी आहेत का ? आज बंगाल मध्ये जे होत आहे तेच उद्या मुंबईत झालं तर, ही शंका या राजकारण्यांना भेडसावत असावी. हा प्रश्न ठाकरे यांच्या अखत्यारित नसावा, फायदा मिळवण्याची त्यांची गणिते ही ठाम असतात आणि त्यांच्या पद्धतीनेच ती सोडविली जातात.
सध्या भाषावाद हवा आहे !
समजा, उद्या मुंबईत दंगल झाली, तरी मी मराठी किंवा मी हिंदी किंवा मी गुजराती, मी कशाला तुला वाचवू? अशी परिस्थिती निर्माण करायची आहे का..भाषावाद हा पूर्वीचा यशस्वी शब्द आहे. सध्याच्या समाजात रोटी-बेटी व्यवहार हे अंतर जातीय अंतर धर्मीय होऊ लागले असल्यामुळे भाषेचा संबंधच नाही, हे कोणीतरी या मंडळींना सांगण्याची गरज उद्भवली आहे. ज्या मुंबईमध्ये हे हिंदी भाषेच्या सक्तीला विरोध करत आहेत, त्या मुंबईत सध्या निम्म्यापेक्षा जास्त नागरिक बिगरहिंदी आहेत, हे लक्षात घ्यायला पाहिजे !
हेही वाचा – मिळकतकर सवलतीच्या दरात भरण्यासाठी मुदतवाढ, ७ जुलै पर्यंत भरा कर
मराठी माणूस आहेस कुठे?
मराठी, मराठी करून ही मंडळी मुंबईतच राहिली. देशोधडीला लागलेला मराठी माणूस मात्र मुंबई बाहेर फेकला गेला आहे. त्याची मालमत्ता विकत घेतलेले जैन, मारवाडी, गुजराती आणि उत्तर भारतीय म्हणजेच हिंदी भाषिक मुंबईकर झाले, ही वस्तुस्थिती आहे. मराठी माणूस मात्र इकडे डोंबिवलीच्या पुढे पार टिटवाळा, आसनगाव, कसारा.. अंबरनाथ, बदलापूर वांगणी कर्जत.. आणि तिकडे नालासोपारा, वसई विरार पालघर या ठिकाणी त्यातल्या त्यात स्वस्तात घरे शोधतो आहे. किती टक्के उरलाय मराठी माणूस मुंबईत ?
मराठी माणूस आणि हिंदूंचे काय?
मराठी अस्मितेच्या नावाने मराठी भाषेचे शत्रू उभे केले गेले आहेत आणि मराठी-अमराठी भिंत उभी केली गेली आहे हिंदूंमध्ये! दादर जर राज ठाकरेंचा आणि वांद्रा उद्धव ठाकरेंचा गड असेल तर याचाही विचार करा. जा..दादर पश्चिम स्थानकापासून नक्षत्र मॉल, छबिलदास गल्ली, शिवाजी मंदिर पर्यंत..रस्त्याच्या कडेला लागलेल्या दुकानदारांशी मराठीत संवाद साधून दाखवा.. आणि हिम्मत असेल तर करा त्यांना मराठी भाषेची सक्ती ! वांद्रा पश्चिमेला रिक्षाचालकांशी, रस्त्याच्या कडेला फूटपाथवर उभे असलेल्या विक्रेत्यांशी मराठीत संवाद साधून दाखवा.. आणि नंतरच घाटकोपर मराठी करून दाखवण्याचे चॅलेंज द्या !
भाषावाद करणाऱ्यांसाठी..
आधी आपापल्या भागात जाऊन स्वत:च्या गडाची तटबंदी भक्कम करून दाखवा, मग हे भाषावाद करून फोडाफोडीचे राजकारण करा.. स्वतः वेषांतर करून सोबत कोणताही लवाजमा न बाळगता सामान्य मराठी माणसाप्रमाणे उतरा मैदानात.. आणि खरोखर पाहा मराठीची किती हेळसांड चालली आहे ते आणि हिंदुत्वावर कसा घाला घातला जात आहे ते! मुंबईत प्रत्येक स्टेशनबाहेर, फूटपाथवर, स्कायवॉकवर धंदा लावून बसलेल्या विक्रेत्यांवर मराठी भाषेचा जोर काढून दाखवा.. मुंबईमध्ये तुमचे स्थान काय हेच तुम्हाला दाखवले जाईल, आणि मग भाषावादाला प्राधान्य द्या!
आज काय चाललंय देशात ?
ही वेळ राजकरण करण्याची नाही, हे समजू शकतो, तर धर्मकारण करण्याची आहे! तुमची पक्षीय दुकाने वाचवण्याची तर नक्कीच नाही. आपला देश आणि धर्म वाचवण्याची आहे, हे लक्षात घ्या!
आणि शेवटी प्रेमाचा सल्ला..
राज आणि उद्धव ठाकरे बंधूंनो.. एकत्र येताय ? अवश्य या. वंदनीय बाळासाहेब मराठी माणूस तुमच्या पाठीशी नक्कीच उभा राहील. एकत्र होऊन जा बंगालमध्ये..आवाहन करा आणि घेऊन जा इकडून हिंदूंची फौज.. या फौजेचे नेतृत्व करा आणि डरकाळी फोडून तिकडच्या हिंदूंना सांगा.. ‘आम्ही दोघे ठाकरे बंधू, बाळासाहेबांच्या हिंदुत्ववादी विचारांचे वारसदार आणि हा अवघा महाराष्ट्र तुमच्या सोबत आहे म्हणून..कोण तुम्हाला हात लावतो तेच बघतो !’ अशा तुमच्या डरकाळ्या आणि गर्जना ऐकू आल्या तर संपूर्ण महाराष्ट्र आणि मराठी माणूसच काय, देशातील तमाम हिंदू बांधव देखील तुमच्या निवासस्थानांपुढे रांग लावून उभे राहतील, आशीर्वाद देण्यासाठी !
वंदनीय बाळासाहेब असते तर..
आज वंदनीय बाळासाहेब हयात असते ना, तर बंगालची परिस्थिती पाहून त्यांनी गर्जना केली असती..’जर बंगालमध्ये माझ्या हिंदू बांधवांना काही झाले, तर मी बघतो इथे मुंबई, ठाण्यात, महाराष्ट्रात बांगलादेशी घुसखोर कसे राहतात ते.. गाठ माझ्याशी आहे..!’ ठाकरे बंधूंनो, मराठी बाणा अवश्य जपा. जपायलाच हवा. पण मराठी-अमराठी हिंदूंमध्ये फूट पडू देऊ नका..मराठी मुसलमान बोलून बांगलादेशी घुसखोरांना पाळणाऱ्या, वंदे मातरम् न म्हणणाऱ्या धर्मांध लोकांना जवळ करू नका! म्हणतात ना, बुडत्याला काडीचा आधार.. आणि इथे गंमत अशी आहे की दोन्हीं बुडते त्यांच्या समोर असलेल्या बुडत्याला काडी समजून आधार शोधत आहेत, हे मात्र नक्की!