असल्या पशुसमान खुन्यांपेक्षा, लचके तोडणारी गिधाडं बरी !

मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची झालेली नृसंश हत्या..त्यानंतर हत्या करतानाचे प्रसिद्ध झालेले अनेक फोटो..हत्या करत असताना ‘एन्जॉय’ करणारे खुनी..जनतेमध्ये उसळलेली संतापाची लाट.. तापलेले वातावरण..आणि धनंजय मुंडे यांचा राजीनामा !
या प्रकरणात ‘सीआयडी’ने सादर केलेले आरोपपत्र..त्यातील प्रमुख आरोपी वाल्मीक कराड.. वाल्मीक कराडचा ‘गॉडफादर’ धनंजय मुंडे..सगळं सगळं पाहताना, वाचताना आणि ऐकताना मेंदूचा अक्षरशः भुगा झालाय ! किती हा निर्लज्जपणा..अशा प्रकारे खून करताना खुन्यांना जरासुद्धा लाज वाटली नाही का हो? मृतदेहाचे लचके तोडणाऱ्या गिधाडांपेक्षा पेक्षा ही कृती अजिबात कमी नाही !
अखेर मुंडे यांनी आपल्या मंत्रीपदाचा राजीनामा दिला. राजीनामा देतानाचं कारण, तब्बेत ठीक नाही, असं दिलं आहे. तर त्यांच्या पक्षाचे नेते , अध्यक्ष अजित पवार यांनी राजीनामा नैतिकतेच्या आधारावर दिला, असं सांगितलं आहे.
मृत्यूचा सगळा खेळ मांडला..
एकीकडं दूरचित्रवाहिन्यांवर धनंजय मुंडे यांचा ‘जीव की प्राण’ असणारा वाल्मिक कराड आणि त्यांच्या कच्याबच्यांनी संतोष देशमुख यांच्या मृत्यूचा खेळ मांडला होता. त्याची छायाचित्रे दाखवली जात होती, ती पाहता कोणाच्याही तळपायाची आग मस्तकात जावी, असं ते प्रकरण होतं. खंडणी मागताना जे आडवे येतील, त्यांना आडवं करण्याची कराडची भाषा आणि त्याप्रमाणं वागणारे त्याचे बगलबच्चे हे मानवजातीला अक्षरशः कलंक आहेत. त्यांचं कृत्य मानवतेला काळिमा फासणारे आहे आणि ते पाहून समाधान मानणारे वाल्मिक कराड आणि कंपनी माणुसकीचे मारेकरी आहेत, हे अत्यंत क्लेशदायक आहे.
धनंजय मुंडे यांची भूमिका..
त्यांना कायद्याने कठोर शिक्षा झालीच पाहिजे. मात्र, याची पाळेमुळे धनंजय मुंडे यांच्या पर्यंत पोहचत असतील तर धनंजय मुंडेही या नराधमांना दिल्या जाणाऱ्याच शिक्षेस पात्र असतील. राजकारण किती गेंड्याच्या कातडीने केले जाते आणि त्या करता राजकारणी किती लाज सोडून वागतात, हे या निमित्ताने पुन्हा एकदा चव्हाट्यावर आले आहे. गेले ८४ दिवस धनंजय मुंडे यांना ‘महायुती’ वगळता सगळे पक्ष आणि महायुती मधील भाजपचे आ. सुरेश धस राजीनामा मागत होते. मात्र, निर्ढावलेले धनंजय मुंडे आपल्या मस्तीत होते.
फडणवीस का गप्प बसले?
खरे तर त्यांनी केलेल्या प्रकारामुळे अजित पवार यांना पण मुंडे नकोच असतील, मात्र त्यांना मंत्रिमंडळातून बाहेर व्हा, हे सांगता आले नाही. तर मुंडे हे फडणवीसांचेही जुने मित्र असल्याने त्यांचीही जीभ राजीनाम्यासाठी रेटली नाही. आता जनमताचा दबाव एवढा वाढला की राजीनाम्याचा आदेश दिल्याशिवाय फडणवीस यांना गत्यंतर राहिले नाही. सरकार म्हणून जी यंत्रणा आहे, ती तुमच्या सोबत नाही हे दाखवून द्यावे लागले.
कराडची तुरुंगात बडदास्त..
अजूनही वाल्मिक कराडला तुरुंगात मिळणारी बडदास्त पाहता कराड आणि कंपनीचा माज संपला नाही. अत्यंत तृतीय श्रेणीतले हे गुंड आहेत. झुंडीने राहिल्याने आणि सरकारी यंत्रणा सोबत असल्याने गेली किमान दहा वर्षे हे परळीत अवैध धंद्यातून राज्य करत होते, अक्षरशः उच्छाद मांडत होते.
प्रत्येक गावात कराड, चाटे आणि मुंडे..
प्रत्येक गावागावातील असे मुंडे, कराड, चाटे, केदार, सांगळे इत्यादी हुडकून काढले पाहिजेत. गेल्या दहा वर्षात कराड टोळीने केलेले कारनामे, मुंडेंचे प्रताप शोधले पाहिजेत. अशा किती संतोष देशमुखांवर या मंडळींनी अन्याय केला, हे शोधले पाहिजे.
हेही वाचा : शिक्षण विश्व: निवेदन-सूत्रसंचालन कार्यशाळा उत्साहात
अशा नरा, मारा पैजारा..
तब्बेत बरी नाही हे राजीनाम्याचे कारण आता होऊ शकत नाही. दिसत नाही, बोलता येत नाही मात्र मंत्री होण्याची हावं सुटत नाही, असा प्रकार मुंडे यांचा झाला आहे. अशा नरा मोजुनि पैजारा मारल्या पाहिजेत. तसेच त्यांना मंत्रिमंडळात घेणाऱ्यांनाही त्याचा प्रसाद दिला पाहिजे. अजित पवार यांना मुंडेंची कारकीर्द माहीत नव्हती का ? असे असताना त्यांना मंत्री करण्याचा अट्टहास का ? असे म्हणायचे कारण अजित पवार यांनी अखेरपर्यंत धनंजय मुंडे यांना राजीनामा मागितला नाही. तसेच अगदी नरड्यापर्यंत येईपर्यंत देवेंद्र फडणवीस यांनीही मुंडे यांना राजीनामा देण्यास सांगितले नाही, ही बाब जास्त गंभीर आहे.
सुप्रियाताई, आव्हाड यांची भूमिका..
विरोधी पक्षातल्या सुप्रिया सुळे, जितेंद्र आव्हाड यांना मुंडेंची कारकीर्द माहीत नव्हती का? धनंजय गुणी होते, कर्तृत्ववान होते म्हणून त्यांना शरद पवार यांनी, काका स्व.गोपीनाथ मुंडे यांच्याकडून फोडले होते ना ? राजकारणात त्यांची प्राणप्रतिष्ठा करण्याचे पुण्य पवार घराण्याचेच ना ? करमुसे यांची फोडलेली पाठ आणि स्व. देशमुख यांच्या पाठीचे फोटो आव्हाडांना तरी ओळखतील का ? सबब विरोधकांनी प्रामाणिकपणाचा न झेपणारा आव आणू नये.
आता, फडणवीस यांना मुंडेंसह अजित पवार आणि राष्ट्रवादी पक्षाला ही विवस्त्र करायचे असेल असा तर्क मांडला जाईल .
हे तर महाराष्ट्राचे दुर्दैव!
प्रत्यक्षात मुंडे, कराड यांची लायकी लक्षात आल्यावरही अजित पवार हे धनंजय मुंडे नैतिकतेच्या आधारावर राजीनामा देत आहेत, असे सांगत असतील तर ते राज्याचे दुर्दैव आहे. गेले अडीच-तीन महिने मुंडेंची ही नाजूक नैतिकता कुठे गेली होती ? राजीनाम्याचा प्रश्न निघाला की पवार चेंडू फडणवीसांकडे टोलवायचे तर फडणवीस पवारांकडे! दोघानांही मुंडेंना थेट राजीनामा मागण्याचे धाडस का झाले नाही ? विधान सभेत आ. सुरेश धस यांनी स्व. देशमुख यांना कसे मारले, याचे वर्णन केले . त्यावेळी पवार- फडणवीस यांच्या हृदयाला पाझर का फुटला नाही ? एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री आणि सरकारमध्येच आहेत त्यांनी यावर भाष्य का केले नाही ?
मुंडे यांचा नैतिकतेचा आव
मुळात ज्या मंत्र्याला आजारामुळे दोन मिनिटापेक्षा जास्त वेळ बोलता येत नाही, त्याला मंत्री का करावे ? आणि त्यानेही निर्लज्जपणे प्रकरण अंगाशी आले की आजाराचे कारण देत मैदान का सोडवे? ज्या धनंजय मुंडे यांचे दोन विवाह झालेत, अनैतिक संबंध आहेत, दोन पेक्षा अधिक मुले आहेत, कराड सारख्या कुख्यात गुंडांशी घनिष्ट संबंध आहेत, अंबाजोगाई येथील राख विक्रीसारख्या प्रकरणात कराडचा हात आहे, हे अनेकजण वारंवार सांगत होते. अशाशी घनिष्ट सबंध असणाऱ्या धनंजय मुंडे यांच्याकडून नैतिक राजीनाम्याची अपेक्षा कोणी केली नव्हती, तर त्यांच्या हकालपट्टीची आवश्यकता होती.
या खूनप्रकरणात ज्या पद्धतीने फासे पडले, ते अत्यंत दुर्दैवी आहे आणि त्याला कराड,मुंडे यांच्याप्रमाणे अजितदादा आणि मुख्यमंत्री फडणवीस यांना जबाबदार धरायचे नाही का ?