शिक्षण विश्व: निवेदन-सूत्रसंचालन कार्यशाळा उत्साहात
ट्रेनर सुनील मिरचंदानी यांनी पब्लिक स्पिकिंगच्या सांगितल्या ‘10 टेक्निक’

पिंपरी-चिंचवड | विद्यार्थी विकास मंडळ एमआयटी आर्ट्स कॉमर्स सायन्स कॉलेज आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ विद्यार्थी विकास मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने निवेदन आणि सूत्रसंचालन कार्यशाळा उत्साहात झाली. ही कार्यशाळा आयोजित करण्यामागचा उद्देश्य म्हणजे महाविद्यालयातील सांस्कृतिक आणि सामाजिक कार्यक्रमांचे सूत्रसंचालन,सभा, चर्चासत्रे आणि परिषदांसाठी निवेदन कौशल्य विकसित करणे हा आहे.
या कार्यशाळेसाठी प्रमुख मार्गदर्शक म्हणून रुचिका भोंडवे आणि ट्रेनर सुनील मिरचंदानी यांची व्याख्याने आयोजित करण्यात आली होती. या कार्यक्रमाचे आयोजन विद्यार्थी विकास मंडळ अधिकारी प्रा. पल्लवी महागावकर यांनी केले होते. कार्यशाळेत रुचिका भोंडवे यांनी निवेदन कसे करायचे, आवाजात चढ उतार कसा आणायचा, कार्यक्रमासाठी स्क्रिप्ट कशी लिहायची त्याचबरोबर निवेदनात असलेल्या नोकरीच्या संधी याची देखील माहिती दिली.
हेही वाचा : राज्य सरकारचा मोठा निर्णय! प्रतिज्ञापत्राची ५०० रुपयांची स्टॅम ड्युटी माफ
ट्रेनर सुनील मिरचंदानी यांनी पब्लिक स्पिकिंगच्या 10 टेक्निक सांगितल्या, स्टेजवर जाताना जी भीती वाटते त्यावर ती कशी मात करायची, तसेच त्यांनी कॉन्फिडंट वॉक मुलांकडून करवून घेतला.
प्रमाणपत्र वितरणाच्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तन्वी आणि सिद्धी या विद्यार्थिनींनी केले. या कार्यशाळेत एमआयटी कॉलेज सह पिंपरी चिंचवड मधील इतर महाविद्यालयातील एकूण 51 विद्यार्थी सहभागी झाले होते. ही कार्यशाळा महाविद्यालयाचे संचालक डॉ. वापरे आणि उपसंचालिका प्रा. अक्षदा कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आली होती. तसेच या कार्यशाळेसाठी प्रा. मनीषा पाटील, डॉ. सुप्रिया लोंढे, डॉ. संदीप ढवळे, डॉ. प्रकाश राऊत, डॉ सुरेखा गायकवाड, प्रा वसंत करमाड या सदस्यांचे सहकार्य लाभले. ‘