तळेगाव-चाकण-शिक्रापूर या २५ किलोमीटर लांबीत चार पदरी उन्नत मार्ग प्रस्तावित
चौपदरी उन्नत मार्गासाठी साडेसहा हजार कोटी

तळेगाव : अर्थमंत्री अजित पवार यांनी विधानसभेत सोमवारी (ता.१०) सादर केलेल्या महाराष्ट्र राज्याच्या अर्थसंकल्पात तळेगाव-चाकण-शिक्रापूर या रस्त्याच्या तळेगाव ते चाकण या २५ किलोमीटर लांबीत प्रस्तावित चार पदरी उन्नत मार्गाच्या प्रकल्पासाठी साडेसहा हजार कोटी रुपये खर्च अपेक्षित असल्याचा उल्लेख केल्याने मावळ आणि खेड तालुक्यातील आवाहतूक कोंडीने त्रस्त नागरिकांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.
राज्याच्या अर्थसंकल्पात राज्यातील पायाभूत सुविधांवर भर दिला असल्याचे सांगतानाच अर्थमंत्री अजित पवार यांनी पुणे जिल्ह्यातील पुणे ते शिरुर आणि तळेगाव-चाकण-शिक्रापूर या राज्य सरकारकडून प्रस्तवित असलेल्या महत्वाच्या दोन रस्त्याबाबत घोषणा केली. पुणे ते शिरुर या ५४ किलोमीटर लांबीच्या रस्त्यासाठी सुमारे साडेसात ७ हजार ५१५ कोटी रुपये किंमतीच्या उन्नत मार्गाचे बांधकाम हाती घेण्यात येत आहे.
तसेच तळेगाव-चाकण-शिक्रापूर या रस्त्याच्या तळेगाव ते चाकण या २५ किलोमीटर लांबीत चार पदरी उन्नत मार्ग प्रस्तावित आहे. या प्रकल्पासाठी ६ हजार ४९९ कोटी रुपये खर्च अपेक्षित असल्याचे पवार यांनी सांगितले. त्यामुळे सदर रस्त्यांचे काम लवकरच सुरु होणार याबाबत स्थानिकांची आशा दुणावली आहे. अर्थमंत्र्यांनी घोषणा केली असली तरी, प्रत्यक्षात तळेगाव-चाकण महामार्गाच्या कामाच्या निविदा आणि भूसंपादन प्रक्रियेला अजून किती दिवस लागणार असा प्रश्न आहे.
हेही वाचा : अर्थसंकल्पीय अधिवेशन: कुरघोडीच्या राजकारणात पत्रकार महामंडळ बारगळले?
राष्ट्रीय महामार्ग म्हणून घोषित झाल्यानंतर गेल्या सात वर्षांपासून केंद्र सरकारच्या कोटींच्या निधीच्या घोषणांच्या सुकाळात राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५४८-डी तळेगाव-चाकण-शिक्रापूर रस्त्याचे काम गेली कित्येक वर्षे प्रलंबितच राहिले. गतवर्षी केंद्रीय रस्ते विकास मंत्रालयाकडून हा रस्ता राज्य सरकारकडे अधिकृतरीत्या हस्तांतरित करण्यात आला.
नव्यानेच स्थापन झालेल्या महाराष्ट्र राज्य पायाभूत सुविधा महामंडळ अर्थात एमएसआयडीसीच्या माध्यमातून बीओटी तत्वावर या रस्त्याचे काम आता होणार आहे. सदर रस्त्याचा विस्तृत प्रकल्प अहवाल पूर्ण झाला असला तरी, कामाचा टिप्पणीचा मसुदा मंत्रिमंडळाच्या मंजुरीसाठी प्रलंबित आहे.
भूसंपादनासाठी जवळपास ४१० कोटी रुपये अपेक्षित असून, गेल्या फेब्रुवारी महिन्यात त्याचा मसुदा अर्थ खात्याकडे सादर गेला आहे. अर्थ खात्याच्या नियोजन विभागाचे यावर अद्याप काम चालू असून, ते झाल्यानंतर मसुदा अर्थमंत्र्यांच्या स्वाक्षरीनंतर कॅबिनेटमध्ये मंजुरीसाठी ठेवला जाणार आहे.
तळेगाव-चाकण-शिक्रापूर या ५६ किलोमीटर अंतराच्या प्रलंबित महामार्गाच्या कामासाठी तळेगाव-चाकण-महामार्ग कृती समिती गेल्या पाच वर्षांपासून सातत्याने पाठपुरावा करीत आहे. कृती समितीच्या पदाधिकाऱ्यांनी मावळचे आमदार सुनील शेळके आणि खेडचे आमदार बाबाजी काळे यांना सोबत घेत गेल्या जानेवारी महिन्यात महाराष्ट्र राज्य पायाभूत सुविधा महामंडळाचे (एमएसआयडीसी) व्यवस्थापकीय संचालक ब्रिजेश दिक्षित यांची भेट घेऊन सद्यस्थितीचा आढावा घेत पाठपुरावा केला.
तसेच कॅबिनेट मंजुरी मिळावी यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना देखील निवेदन देऊन कॅबिनेट मंजुरीसाठी साकडे घातले.त्यानंतर गत फेब्रुवारी महिन्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना देखील याबाबत निवेदन देण्यात आले होते. या पार्श्वभूमीवर तळेगाव-चाकण रस्त्याच्या कामाचा अर्थसंकल्पात समावेश झाल्याने पाठपुराव्याला न्याय मिळाल्याची भावना कृती समितीच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केली.
तळेगाव-चाकण रस्त्याचे काम अर्थसंकल्पात समाविष्ठ झाल्याने कृती समितीच्या पाठपुराव्याला अंशतः न्याय मिळाला असे म्हणावे लागेल. आता सदर कामाच्या मसुदयाची कार्यालयीन प्रक्रिया युद्धपातळीवर पूर्ण करुन आगामी मंत्रिमंडळ बैठकीत त्याला मंजुरी मिळावी. आणि लवकरात लवकर निविदा, भूसंपादन प्रक्रिया पूर्ण करुन प्रत्यक्षात रस्त्याच्या कामाला सुरुवात व्हावी.