उच्चशिक्षण पूर्ण होताच विद्यार्थ्यांना मिळणार नोकरी
कुलगुरू डॉ. प्रकाश महानवर यांनी विद्यापीठात स्वतंत्र ट्रेनिंग ॲण्ड प्लेसमेंट सेल सुरू
सोलापूर : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाला २० वर्षे झाली, तरीदेखील पदवी-पदव्युत्तर झालेल्या तरुण-तरुणींना विद्यापीठातील ‘कॅम्पस ड्राइव्ह’मधून नोकरी, रोजगार मिळण्याचे प्रमाण अत्यल्प आहे. त्यामुळे उच्चशिक्षणातील प्रवेश देखील मर्यादितच राहिले. या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांची गरज ओळखून कुलगुरू डॉ. प्रकाश महानवर यांनी विद्यापीठात स्वतंत्र ट्रेनिंग ॲण्ड प्लेसमेंट सेल सुरू केला आहे. त्यातून आता दरवर्षी कॅम्पस ड्राईव्ह आयोजित करून पदवी-पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांना रोजगार तथा नोकरी देण्याचे नियोजन आहे.
विद्यापीठात सामाजिकशास्त्रे, संगणकशास्त्र, फिजिक्स, केमिस्ट्री, अर्थ सायन्स, कॉमर्स मॅनेजमेंट, लाइफ सायन्स, तंत्रज्ञान, आरोग्य विज्ञान, ललित कला, भाषा व वाड;मय अशी संकुले आहेत. त्याअंतर्गत दरवर्षी १८०० विद्यार्थी शिक्षण घेतात. दुसरीकडे विद्यापीठाशी संलग्नित १०९ महाविद्यालयाअंतर्गत देखील जवळपास ६५ हजार विद्यार्थी प्रवेशित असतात. शिक्षण पूर्ण केल्यावर नोकरीच्या शोधात हजारो तरुण-तरुणी स्थलांतर करतात ही वस्तुस्थिती आहे. या पार्श्वभूमीवर आता विद्यापीठात कौशल्य विकासाचे १४५ हून अधिक कोर्सेस सुरू करण्यात आले आहेत.
तसेच शिक्षण पूर्ण केल्यावर विद्यार्थ्यास रोजगार मिळावा, यासाठी विद्यापीठाने एक पाऊल पुढे टाकले असून, दरवर्षी किमान दोन जॉब फेअर (कॅम्पस सिलेक्शन) राबविण्याचेही नियोजन केले आहे. नव्याने सुरू केलेल्या ट्रेनिंग ॲण्ड प्लेसमेंट सेलची जबाबदारी डॉ. अनिल घनवट यांच्यावर सोपविली आहे. आता उच्च शिक्षण पूर्ण झालेला विद्यार्थी बेरोजगार राहणार नाही, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे.
फेब्रुवारीअखेर मोठा जॉब फेअर
महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स आणि बोर्ड ऑफ अप्रेंटिसशिप ट्रेनिंग (बोट) सेंटर या केंद्र शासनाच्या संस्थेशी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाने सामंजस्य करार केला आहे. त्यांच्या मदतीने फेब्रुवारीअखेर विद्यापीठाच्या वतीने मोठा जॉब फेअर घेण्याचे नियोजन केले जात आहे. ‘बोट’शी सामंजस्य करार करणारे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ हे राज्यातील पहिले आहे. शेकडो कंपन्या ‘बोट’अंतर्गत नोंदलेल्या आहेत. अभियांत्रिकीसह आता पारंपरिक अभ्यासक्रमातील विद्यार्थ्यांनाही त्यांच्याकडून जॉब तथा रोजगार, नोकरीची संधी मिळणार आहे. दरवर्षी विद्यापीठ व संलग्नित महाविद्यालयांमधील शेकडो विद्यार्थ्यांना त्याठिकाणी प्रशिक्षण व नोकरीची संधी मिळेल, असा विश्वास विद्यापीठाला आहे.
पाच हजार विद्यार्थ्यांसाठी जॉब फेअर घेण्याचे नियोजन
विद्यापीठातील संकुलांसह संलग्नित महाविद्यालयांमध्ये विद्यार्थ्यांची संख्या वाढावी, त्यांची अपेक्षापूर्ती व्हावी, शिक्षण पूर्ण होताच त्यांना चांगला जॉब तथा रोजगार मिळावा, यासाठी विद्यापीठात ट्रेनिंग ॲण्ड प्लेसमेंट सेल सुरू केला आहे. फेब्रुवारीमध्ये जवळपास पाच हजार विद्यार्थ्यांसाठी जॉब फेअर घेण्याचे नियोजन आहे. त्यात विद्यापीठासह संलग्नित महाविद्यालयातील सर्वच अभ्यासक्रमांच्या विद्यार्थ्यांना सहभागी होता येणार आहे.
– डॉ. प्रकाश महानवर, कुलगुरू, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ
सोलापूर विद्यापीठाचा पसारा…
संलग्नित महाविद्यालये
१०९
एकूण प्रवेशित विद्यार्थी
६५,०००
विद्यापीठातील संकुले
११
प्रवेशित विद्यार्थी
१,८००
विद्यार्थ्यांना ५ दिवसांचे विशेष प्रशिक्षण
उच्चशिक्षण पूर्ण झाल्यावर नोकरीपूर्वी तरुण-तरुणींनी मुलाखतीची तयारी नेमकी कशी असावी, मुलाखतीला जाताना पोषाख कसा असावा, नेमकी काय खबरदारी घ्यावी, बायोडाटा कसा तयार करावा, अशा सर्वच बारीक सारिक बाबींवर विद्यापीठाच्या माध्यमातून ५ दिवसांचे विशेष प्रशिक्षण देखील देण्याची सोय करण्यात आली आहे. जेणेकरून मुलाखत किंवा बायोडाट्याच्या माध्यमातूनही विद्यार्थ्यांना जॉब मिळेल हा हेतू आहे.





