breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकारण

जोड्याने मारेन म्हणणाऱ्या संजय राऊतांना किरीट सोमय्यांनी दिलं उत्तर; म्हणाले, “एक नाही तर दोन्ही जोडे…”

मुंबई |

शिवसेना खासदार संजय राऊत यांनी मंगळवारी शिवसेना भवनात घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये भाजपा नेते किरीट सोमय्या आणि त्यांचे पुत्र नील सोमय्या यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. पीएमसी बँक घोटाळा प्रकरणातील मुख्य आरोपी राकेश वाधवानशी किरीट सोमय्यांचे संबंध असल्याचा आरोप संजय राऊतांनी केला आहे. तसंच मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवरील आरोपांसंबंधी बोलताना सिद्ध करा, नाही तर जोड्याने मारेन असं म्हटलं. त्यांच्या या टीकेला किरीट सोमय्या यांनी दिल्लीत पत्रकार परिषद घेत उत्तर दिलं आहे.

संजय राऊत काय म्हणाले –
संजय राऊत यांनी किरीट सोमय्यांचा उल्लेख मुलुंडचा दलाल असा उल्लेख केला. “कोलराई गावात १९ बंगले बांधून ठेवले आहेत. माझं आव्हान आहे की, कधीही सांगा आपण चार बसेस करु आणि १९ बंगल्यांमध्ये पत्रकारांची पिकनिक काढू. जर बंगले दिसले तर मी राजकारण सोडेन. जर दिसले नाहीत तर संपूर्ण शिवसेना जोड्याने मारेल. आपण चार गाड्या करून त्या १९ बंगल्यांमध्ये पिकनिकला जाऊ, पत्रकारांची पिकनिक काढू जर तुम्हाला ते बंगले तिकडे दिसले तर मी राजकारण सोडेन, दिसले नाहीत तर अख्खी शिवसेना जोड्याने मारेल. दिशाभूल, खोटेपणाचा कळस, भंपकपणा करायचा कशासाठी,” असं संजय राऊत म्हणाले.

किरीट सोमय्यांचं उत्तर –
“किरीट सोमय्यांना जोड्याने मारण्याची गोष्ट आहे की रश्मी ठाकरेंना संबोधून संजय राऊत बोलत आहेत. १९ बंगले कोणाच्या नावावर आहेत? रश्मी उद्धव ठाकरे यांनी १२ नोव्हेंबर २०२० ला या १९ बंगल्यांचा मालमत्ता कर कोलराई ग्रामपंचायतला भरला. रश्मी ठाकरे आणि मनिषा वायकर यांनी हा कर भरला आहे. इतकंच नाही तर रश्मी ठाकरे यांनी आधीच्या दोन वर्षांचा मालमत्ता कर भरला असून त्याआधीच्या सहा वर्षांचा मालमत्ता कर अन्वय नाईकच्या नावे आहे. हा कर किरीट सोमय्यांनी भरलेला नाही. संजय राऊत तुम्ही कोणाला जोड्याने मारणार आहात?,” अशी विचारणा किरीट सोमय्या यांनी केली आहे.

 

“१ एप्रिल ते २०१३ ते ३१ मार्च २०२१ पर्यंतचा १९ बंगल्याचा कर यांच्या खात्यातूनच गेला आहे. ११ नोव्हेंबर २०२० ला अन्वय नाईक आणि उद्धव ठाकरे यांच्यातील जमिनीचे तसंच व्यवसायिक संबंध मी उघड केले होते. अन्वय नाईक यांनी २००८ मध्ये बांधले होते. हा ठाकरे सरकारनेच दिलेला रेकॉर्ड आहे. २००९ पासून दरवर्षी या बंगल्याचा कर भरला जात आहे. आधी अन्वय नाईक आणि नंतर रश्मी ठाकरे, मनिषा वायकर हा कर भरत होत्या,” असं किरीट सोमय्यांनी सांगितलं.

“ग्रामपंचायतीचा रेकॉर्ड गेल्या वर्षी मी मिळवला आहे. त्यात ग्रामपंचायतीने रश्मी ठाकरे आणि मनिषा वायकर यांच्यातर्फे ३० जानेवारी २०१९ रोजी घरपट्टी नावे करण्याचा अर्ज आला असून मान्य करण्यात आल्याचं नमूद आहे. रश्मी ठाकरेंच्या नावाने घरं दाखवत आहेत. इतकंच नाही तर रश्मी ठाकरे आणि मनिषा वायकर यांनी एप्रिल २०१४ मध्ये करार केला. त्यात घरं असल्याचे पुरावे त्यांनी जोडले असून किरीट सोमय्या, नील सोमय्या यांनी जोडलेले नाहीत. महत्वाचं म्हणजे हे घर वनविभागाच्या जमिनीवर बांधण्यात आलं आहे,” अशी माहिती किरीट सोमय्या यांनी दिली.

“आता तुम्ही मीडियाला मी तुम्हाला, किरीट सोमय्यांना घेऊन जातो असं सांगत आहात, त्यापेक्षा रश्मी ठाकरे, मनिषा वायकर, मुख्यमंत्र्यांना घेऊन जा. खरं नाही तर घरपट्टी कशाला भरत आहेत? याचं उत्तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी दिलं पाहिजे. मुख्यमंत्री झाल्यानंतर ही घरपट्टी भरण्यात आली आहे,” असं किरीट सोमय्या म्हणाले.

“उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाल्यानंतर १२ नोव्हेंबर २०२० ला मालमत्ता कर भरल्यानंतर घरं चोरीला गेली का? मुख्यमंत्र्यांची घरं चोरीला गेल्याची तक्रार मी पोलीस ठाण्यात दिली आहे. आता जाऊन मग घरं नाहीये दाखवायचं नाटक कशाला? घरं नाहीयेत हे मी वर्षभरापासून सांगत आहे. मग मुख्यमंत्र्यांच्या पत्नी आणि मनिषा वायकर यांनी घरं असल्याचा आभास निर्माण करत कोटींची संपत्ती दाखवल्याचा आरोप मी नाही करु शकतं. अन्वय नाईक खोटारडेपणा करत होते असं मुख्यमंत्र्यांना सांगायचं आहे का?,” अशी विचारणा किरीट सोमय्यांनी केली.

संजय राऊतांना उद्धव ठाकरेंवर खुन्नस काढायची असेल नील सोमय्याचा वापर कशाला करता? अशी विचारणा किरीट सोमय्या यांनी यावेळी केली. “थेट जाऊन मुख्यमंत्र्यांच्या कुटुंबाला जाऊन मदत करत नसल्याचं सांगा. मी काढलेला घोटाळा संजय राऊतांनी पुन्हा एकदा समोर आणण्याचं कारण काय? मग जोड्याने किरीट सोमय्याला मारायचं आहे की तुमचा पक्ष, तुमचा घोटाळा यावरुन लक्ष हटवण्यासाठी आहे,” असा सवाल किरीट सोमय्यांनी विचारला आहे.

“पाटणकर हे रश्मी ठाकरेंचे बंधू आहेत. कर्जतला वैजनाथ हिंदू देवस्थानाची जमीन पाटणकरच्या नावाने हस्तांतरित झाली. आधी सलीमच्या नावे असणारी जमीन लगेच पाटणकरच्या नावे झाली. मी कागदपत्रं समोर ठेवली आहेत. यात गुन्हा काय आहे का? याची त्यांनी स्पष्टता करावी. याऐवजी किरीट सोमय्या आणि नील सोमय्याचं नाव घेतलं जात आहे. कोविड घोटाळ्यावर एकही शब्द काढलेला नाही. जेलमध्ये टाकायचं असेल तर आम्ही येतो सोबत. खोल्या सॅनिटाइज करण्याची गरजही नाही,” असं आव्हानच किरीट सोमय्यांनी दिलं. कोविड घोटाळ्याची चौकशी का करत नाही? अशी विचारणा किरीट सोमय्यांनी यावेळी केली.

“मला जोड्याने मारणार असाल तर मी तयार आहे. मी संजय राऊत यांना माझा जोडा देतो. त्यांनी रश्मी ठाकरेंच्या १९ बंगल्यांसंबंधी जे पुरावे दिले आहेत त्यासंबंधी त्यांना विचारावं. जर त्यांनी कर भरल्याचा, अर्ज केल्याचं वैगैरे अमान्य केलं तर एक नाही तर दोन्ही जोडे मारा,” असं किरीट सोमय्या म्हणाले.

संजय राऊत यांचे सोमय्यांवर आरोप काय?
नील किरीट सोमय्या यांची ‘निकॉन इन्फ्रा कन्सट्रक्शन’ ही कंपनी असून वसईतील गोखिवरे येथे मोठा प्रकल्प राबवत असून त्यांचाही पीएमसी बँक घोटाळय़ातील राकेश वाधवानशी संबंध आहे. देवेंद्र लाडानीच्या नावे सोमय्यांनी ४०० कोटी रुपयांची जमीन ४.५ कोटी रुपयांना घेतली. तसेच वाधवान याच्याकडून १०० कोटी रुपये वसूल केले. सोमय्यांच्या प्रकल्पांना पर्यावरण विभागाची परवानगी नाही, असा आरोप करत पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी त्याची दखल घ्यावी, अशी मागणी राऊत यांनी केली आहे.

मराठीद्वेष..
शाळांमधील मराठी सक्तीच्या विरोधात भाजपाचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी न्यायालयात याचिका दाखल केली होती़ यावरून सोमय्या यांचा मराठीद्वेष स्पष्ट होतो, असे नमूद करीत आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राऊत यांनी भाजपवर मराठीद्वेषाचा आरोप केला. महाविकास आघाडी सरकार पाडण्याचा प्रयत्न झाल्यास महाराष्ट्रात ठिणगी पडेल, असा इशाराही त्यांनी दिला.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button