breaking-newsक्रिडाताज्या घडामोडीमहाराष्ट्र

खेलो इंडिया युवा स्पर्धा :महाराष्ट्राची २० पदकांसह जोरदार मुसंडी

जलतरण, टेनिस, तिरंदाजी, वेटलिफ्टिंग, खो-खो, कुस्ती, बॅडमिंटनमध्ये पदके

चेन्नई : स्पर्धेच्या बाराव्या दिवशी महाराष्ट्राच्या खेळाडूंनी पुन्हा एकदा स्पर्धेतील आपले निर्विवाद वर्चस्व सिद्ध करताना तब्बल २० पदकांची कमाई केली. खेळाडूंनी जलतरण, टेनिस, तिरंदाजी, वेटलिफ्टिंग, खो-खो, कुस्ती, बॅडमिंटनमध्ये पदके मिळविली. आज दिवसभरात ८ सुवर्ण, ८ रौप्य, ४ कांस्य पदके मिळविताना १४९ पदकांपर्यंत मजल मारली. महाराष्ट्राचा प्रतिस्पर्धी असणारा हरयाणा १०९ पदकांसह दुसऱ्या तर तामिळनाडू ९१ पदकांसह तिसऱ्या स्थानी आहे.

जलतरणातही महाराष्ट्राचा डंका कायम ; पलक जोशी सुवर्णपदकाची मानकरी

पलक जोशी हिचे सुवर्णपदक तर सानवी देशवाल व ऋषभ दास यांचे रुपेरी यश तसेच मुलींच्या रिले शर्यतीत रौप्यपदक अशी कौतुकास्पद कामगिरी करत आजही महाराष्ट्राच्या खेळाडूंनी जलतरणामध्ये आपली घोडदौड कायम राखली.

महाराष्ट्राच्या पलक जोशी हिने २०० मीटर्स बॅकस्टोक शर्यतीत सोनेरी कामगिरी केली तिने हे अंतर दोन मिनिटे 18.59 सेकंदात पार केले. तिने आतापर्यंत खेलो इंडिया व राष्ट्रीय क्रीडा स्पर्धांमध्येही सातत्यपूर्ण कामगिरी केली आहे. दोनशे मीटर्स वैयक्तिक मिडले प्रकारात सानवी देशवाल हिने महाराष्ट्राला आणखी एक रौप्य पदक मिळवून दिले. तिने हे अंतर दोन मिनिटे २७.६४ सेकंदात पूर्ण केले. मुलींच्या चार बाय शंभर मीटर्स रिले शर्यतीत महाराष्ट्राला रुपेरी यश मिळाले. प्रतिष्ठा डांगी, सानवी देशवाल, आदिती हेगडे व अलिफिया धनसुरा यांनी हे अंतर चार मिनिटे ३४.३० सेकंदात पार केले.

मुलांच्या गटात काल सोनेरी हॅट्ट्रिक करणाऱ्या ऋषभ दास याने आपल्या नावावर आणखी एका पदकाची नोंद केली. त्याने २०० मीटर्स बॅकस्टोक शर्यतीत रौप्यपदक मिळवताना दोन मिनिटे ५.१९ सेकंद वेळ नोंदविली.

टेनिस दुहेरीमध्ये महाराष्ट्राला १ रौप्य ; १ कांस्य

टेनिसमध्ये तनिष्क जाधव व काहीर वारीक यांच्या जोडीने रौप्य पदकाची कमाई केली. दुहेरीच्या अंतिम लढतीमध्ये तनिष्क जाधव व काहीर वारीक हे तामिळनाडूच्या प्रणव व महालिंगम के. यांच्याकडून ६-३, ६-२ असे पराभूत झाल्याने त्यांना यावेळी रौप्य पदकावर समाधान मानावे लागले.

मुलींच्या गटाच्या दुहेरीत सोनल पाटील व ऐश्वर्या जाधव यांच्या जोडीने कांस्यपदकाची कमाई केली. स्पर्धेतील उपांत्य लढतीत त्यांना पराभूत व्हावे लागले होते.

तिरंदाजीत महाराष्ट्राचा तीन सुवर्णांसह पदकाचा षटकार ; आदितीची डबल धमाका, महाराष्ट्राला विजेतेपद

महाराष्ट्राच्या तिरंदाजांनी खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धेत प्रथमच सर्वोत्तम कामगिरीचे प्रदर्शन घडवित ३ सुवर्ण, २ रौप्य व १ कांस्य अशी एकूण ६ पदकांची विक्रमी कामगिरी करीत प्रथमच दोन्ही गटात सर्वसाधारण विजेतेपद पटकाविले. कंपाऊंड व रिकर्व्ह दोन्ही प्रकारात महाराष्ट्राच्या खेळाडूंवी हुकूमत गाजवित दिवस गाजविला.

अपेक्षेप्रमाणे कंम्पाऊड प्रकारात जागतिक विजेती आदिती स्वामीने वैयक्तिक व मिश्र दुहेरीतील सुवर्णयशाचा वेध घेतला. वैयक्तिक प्रकारात महाराष्ट्र विरूध्द महाराष्ट्र लढत रंगली. सातार्‍याची आदिती विरूध्द जालनाच्या तेजल साळवे लढतीत अनुभची आदितीने 1 गुणांच्या आघाडीवर बाजी मारली. खेलो इंडिया स्पर्धेतील आदितीचे हे सलग तिसरे सुवर्णयश आहे. आदितीच्या साथीने मिश्र दुहेरीत मानव जाधवने आंध्रप्रदेशचा पराभव केला.

रिकर्व्ह प्रकारातही महाराष्ट्राच्या मिश्र दुहेरी जोडीने सुवर्णपदक कमवले. महाराष्ट्राच्या पृथ्वीराज घाडगे व शर्वरी शेंडे जोडीने हरियाणाच्या अवनी व अगस्तीसिंगवर ६-२ गुणांची दणदणीत विजय संपादन केला. महिलांच्या एकेरीच्या अंतिम लढतीत शर्वरी शेंडेला हरियाणाच्या अवनी मलिककडून २-६ गुणांनी पराभव स्वीकारावा लागला. प्रथमच खेलो इंडिया खेळताना पुण्याच्या शर्वरीने 2 पदकाची कमाई केली. मुलांच्या कंपाऊड प्रकारातील कांस्यपदकाच्या लढतीत बुलढाण्याच्या महिर अपारने राजस्थानच्या सचिन चेचीला पराभूत केले. दुसर्‍यांदा खेलो इंडिया खेळणार्‍या महिरने पदकाची शर्थ करीत राजस्थानला नमवले.

हेही वाचा – छगन भुजबळ यांचं मनोज जरांगे पाटलांना थेट आव्हान; म्हणाले…

वेटलिफ्टिंगमध्ये ग्रिष्मा थोरात हिला रौप्य, सार्थ जाधव याला कांस्यपदक

वेटलिफ्टिंग मध्ये महाराष्ट्राने आणखी दोन पदकांची कमाई करीत यशस्वी सांगता केली. ग्रिष्मा थोरात हिने मुलींच्या ७६ किलो वजनी गटात रुपेरी यश संपादन केले तर सार्थ जाधव याने १०२ किलो वजनी गटात कांस्य पदक जिंकले. महाराष्ट्राला मुलांच्या सांघिक विभागात तिसरे स्थान मिळाले तर मुलींमध्ये त्यांना सांघिक उपविजेतेपद मिळाले.

महाराष्ट्राच्या ग्रिष्मा थोरात हिने मुलींच्या ७६ किलो वजनी गटात रुपेरी यश संपादन केले. तिने स्नॅच मध्ये ७२ किलो वजन उचलले तर क्लीन व जर्कमध्ये तिने ९५ किलो असे एकूण १६७ किलो वजन उचलले. ती ठाणे येथील खेळाडू असून तिला माधुरी सिंहासने यांचे मार्गदर्शन लाभले आहे. ती दहावीत शिकत असून या स्पर्धेतील तिचे हे पहिले पदक आहे. यापूर्वी दोन वेळा तिने खेलो इंडिया स्पर्धेत भाग घेतला होता तथापि दोन्ही वेळा तिला पदकाने हुलकावणी दिली होती. दोन वर्षांपूर्वी तिच्या वडिलांचे कोरोनाच्या आजाराने निधन झाले. ते घरातील एकमेव कमावणारे होते त्यामुळे त्यांच्या कुटुंबाचा आधारच गेला. तिच्या आईने ठाणे येथे अंगणवाडी सेविका म्हणून काम स्वीकारले आणि आपल्या कन्येच्या करिअर विकासास हातभार लावला. अतिशय हलाखीच्या परिस्थितीतून ग्रिश्मा हिने वेटलिफ्टिंग मधील करिअर सुरू ठेवले आहे.

येथे मिळालेल्या रौप्यपदकामुळे माझा आत्मविश्वास उंचावला आहे. आता आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताचे प्रतिनिधित्व करीत यश मिळविण्याचे माझे ध्येय आहे. आजचे पदक हे मी माझ्या वडिलांना आणि अपार मेहनत करणाऱ्या माझ्या आईला तसेच माझ्या प्रशिक्षिका माधुरी सिंहासने यांना अर्पण करीत आहे असे तिने सांगितले.

कांस्यपदक मिळवणाऱ्या सार्थ जाधव याने १०२ किलो वजनी गटात स्नॅच मध्ये ११२ किलो वजन उचलले तर क्लीन व जर्कमध्ये तिने १५२ किलो असे एकूण २६४ किलो वजन उचलले. तो कल्याण येथे शिवछत्रपती पुरस्कार विजेते सुनील दळवी यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करीत आहे. त्याचे वडील महेश जाधव हे कुस्तीगीर असून त्यांच्या प्रोत्साहनामुळे तो वेटलिफ्टिंग मध्ये करिअर करीत आहे.

खो खो मध्ये जय महाराष्ट्र ; दोन्ही गटात महाराष्ट्राला विजेतेपद

मदुराई येथे आयोजित करण्यात आलेल्या खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धेतील खो-खो मध्ये महाराष्ट्राने मुले व मुली या दोन्ही गटात एकतर्फी विजेतेपद पटकावले आणि निर्विवाद वर्चस्व गाजविले.

मुलींच्या अंतिम सामन्यात महाराष्ट्राने ओडिसावर ३३-२४ अशी साडेतीन मिनिटे राखून व नऊ गुणांनी मात केली. त्यावेळी महाराष्ट्राकडून अश्विनी शिंदे (दोन मिनिटे ४५ सेकंद), प्रीती काळे (दोन मिनिटे दहा सेकंद), संध्या सुरवसे (दीड मिनिट व दोन गडी), संपदा मोरे (एक मिनिट ३५ सेकंद व तीन गडी), दीपाली राठोड (दोन मिनिटे व तीन गडी), निशा वैजल (पावणे दोन मिनिटे), सुहानी धोत्रे (६ गडी) यांनी महत्त्वपूर्ण कामगिरी केली.

महाराष्ट्राचे मुलांच्या अंतिम सामन्यात दिल्ली संघाचा ४० विरुद्ध १० असा दहा गुण व चार मिनिटे राखून दणदणीत पराभव केला. महाराष्ट्राकडून रामचंद्र झोरे याने सात गडी बाद केले तर भरत सिंग याने चार गडी बाद केले तसेच एक मिनिटे ४० सेकंद पळतीचा खेळ केला. त्यांना गणेश बोरेकर (दोन मिनिट दहा सेकंद व ६ गडी), चेतन बिका व व अजय कश्यप (प्रत्येकी दोन मिनिटे १० सेकंद) यांची सुरेख साथ लाभली.

महाराष्ट्राच्या संघांना राजेंद्र साप्ते, पंकज गावंडे, मनीषा मानकर, प्रीती करवा, नरेंद्र मेंगळ यांचे मार्गदर्शन लाभले. संघांबरोबर सपोर्ट स्टाफ मध्ये प्रियांका मोरे व कविता घाणेकर यांचा समावेश होता. संघाबरोबर व्यवस्थापक म्हणून सुप्रिया गाढवे व गुरुदत्त चव्हाण यांच्याकडे जबाबदारी सोपवण्यात आली होती.

कुस्तीमध्ये महाराष्ट्राला १ सुवर्ण, १ रौप्य तर १ कांस्यपदक

महाराष्ट्राच्या कुस्तीगिरांनी खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धेतील कुस्तीचा शेवटचा दिवस पदकांची कमाई करताना गाजविला. महाराष्ट्राच्या अर्जुन गादेकरने ८० किलो वजनी गटात दिल्लीच्या नीरजकुमारला पराभूत करताना सुवर्णपदकाची कमाई केली. ५३ किलो मुलींच्या गटातील अंतिम लढतीत सानिका पाटीलला पराभव स्वीकारावा लागल्याने तिला रौप्य पदकावर समाधान मानावे लागले. तर अपेक्षा पाटीलने ६५ किलो वजनी गटात कांस्य पदकाची कमाई केली.

बॅडमिंटनमध्ये मुलींच्या गटात महाराष्ट्राला सर्वसाधारण उपविजेतेपद

बॅडमिंटनमध्ये महाराष्ट्राच्या मुलींनी दमदार कामागिरी बजावताना सर्वसाधारण उपविजेतेपद पटकवले. आंध्र प्रदेश संघाला सर्वसाधारण विजेतेपद देण्यात आले तर ओडिसा संघाने गटात तिसरे स्थान राखले.

मुलींच्या दुहेरी गटात महाराष्ट्राच्या श्रावणी वाळेकर आणि तारिणी सुरी या दोघींनी ओडिसाच्या प्रगती परिडा आणि विशाखा टोप्पो यांच्या जोडीला २१-१३, २०-२२, २१-१६ असे पराभूत करीत सुवर्ण कामगिरी बजावली.

पहिला सेट जिंकणाऱ्या श्रावणी आणि तारिणीला दुसऱ्या सेटमध्ये ओडिसाच्या चिवट प्रतिकारचा सामना करावा लागला. मात्र तिसऱ्या सेटमध्ये श्रावणी आणि तारिणी यांनी खेळ उंचावताना सुवर्णपदक खेचून आणले.

श्रावणी आणि तारिणी यांच्या जोडीने उपांत्य फेरीत उत्तराखंडच्या गायत्री रावत व मान्सा रावत या जोडीला पराभूत करताना अंतिम फेरीत प्रवेश केला होता. गत स्पर्धेत देखील या प्रकारात महाराष्ट्राच्या खेळाडूंनी सुवर्ण कामगिरी केली होती.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button