ताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

बालगुन्हेगारी ! शहराच्या भविष्याला झालेला कर्करोग

पिंपरी चिंचवड | वर्तमानातील नियोजन उज्वल भविष्याचा वेध घेते. जर वर्तमान बिघडलेला असेल, पुढचे नियोजन नसेल तर भविष्य अंधारात हे निश्चित. आजचे बालक उद्याचे नागरिक आहेत. हे आजचे बालक बिघडले तर उद्याचे चांगले नागरिक निर्माण होतील काय. त्यामुळे या बालकांकडे विशेष लक्ष द्यायला हवे.सध्या शहरात बालगुन्हेगारांचे प्रमाण वाढले आहे. हे बालगुन्हेगार पुढे जाऊन सराईत गुन्हेगार होतात. यामुळे शहरातील शांतता, कायदा सुव्यवस्था बिघडते. एकप्रकारे बालगुन्हेगार म्हणजे शहराच्या भविष्याला झालेला कर्करोग आहे. हा कर्करोग वेळीच काढला तर तो नियंत्रणात राहील, कदाचित तो संपुष्टातही येईल अशी आशा.पिंपरी-चिंचवड शहर ही औद्योगिक नगरी आहे. इथे देशाच्या प्रत्येक भागातून आलेले चाकरमानी विसावले आहेत. विविध संस्कृती, बहुभाषिकांनी नटलेले हे शहर आहे. व्यक्ती तितक्या वृत्ती या उक्तीप्रमाणे शहरात अनेक कुरापती करणारे नागरिकही इथे आहेत. चालू वर्षात आजवर जवळपास नऊ हजार गुन्ह्यांची पिंपरी-चिंचवड शहरातील विविध पोलीस ठाण्यांमध्ये नोंद झाली आहे. त्यात अनेकांना अटक झाली. अनेकांना तुरुंगाची हवा मिळाली.

यात एक गंभीर बाब अशी की, खून, खुनाचा प्रयत्न, लैंगिक अत्याचार, वाहन चोरी, चोरी, जबरी चोरी अशा गंभीर स्वरूपाच्या गुन्ह्यात आतापर्यंत 135 बालगुन्हेगार आहेत. तर 110 गंभीर गुन्ह्यांमध्ये बालकांचा सहभाग आढळून आला आहे. अल्पवयीन मुलांचा गुन्हेगारी घटनांमधील सहभाग हा चिंतेचा विषय आहे. या चिंतेत भर घालणारी बाब अशी की, यातील काही बालगुन्हेगार तर आता पोलिसांच्या रेकॉर्डवरील बनले आहेत. मिसरूड फुटण्याआधीच, घरातील जबाबदारी खांद्यावर पडण्याआधीच हातात कोयता, तलवारी, पिस्तूल, काठ्या घेऊन फिरणारी ही चिल्लर गॅंग पुढे जाऊन टोळीचे रूप धारण करते आणि शहराचा चेहरा मोहरा बदलून टाकते.

‘मी या भागातला भाई आहे. मला घाबरायचं. मला हप्ता द्यायचा. मी अमक्याचा उजवा हात आहे. मी तमक्याचा शागीर्द आहे’. अशी बिरुदावली मिरवत ही पोरं दहशत निर्माण करतात. कमावण्याची शून्य अक्कल असताना गळ्यात सोन्याचे गोफ, फिरायला आलिशान दुचाकी, चारचाकी गाड्या हे त्यांच्याकडे येतं कुठून, हा संशोधनाचा विषय आहे. बहुतांश जणांची घरची आर्थिक परिस्थिती अत्यंत हलाखीची असते. पण मुलगा मात्र रुबाबात गाडीवर फिरताना दिसतो, हे चित्र भविष्याच्या दृष्टीने काही बरे नाही.

सांगवी येथे नुकतीच एक घटना घडली. त्यात अल्पवयीन मुलांनी स्वतःचे नाव व्हावे, यासाठी भलताच उद्योग करून ठेवला. आमदारांचे बंधू असलेल्या एका बांधकाम व्यावसायिकाच्या कार्यालयावर दोघांनी पेट्रोलने भरलेल्या दोन बाटल्या फेकल्या. नशीब बलवत्तर म्हणून त्या बाटल्या कार्यालयापर्यंत पोहोचल्या नाहीत. त्यामुळे कोणतीही जीवित हानी झाली नाही. एक बाटली इलेक्ट्रिक डीपीवर तर एक रस्त्यावर पडली आणि फुटून धमाका झाला. यानंतर आरोपी दुचाकीवरून पळून गेले. पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले. चौकशीत त्यांनी पोलिसांना सांगितले की, आमचे शहरात नाव व्हावे, म्हणून आम्ही हा गुन्हा केला.

नाव कमावण्यासाठी मुलं जर अशा कुरापती करत असतील. तर त्यांना वेळीच आवर घालणं गरजेचं आहे. ही धोक्याची घंटा ओळखायला हवी. आज शहरात नाव व्हावं म्हणून पेट्रोल बॉम्ब टाकणारी ही पोरं उद्या राज्यात आणि देशात नाव व्हावं म्हणून कोणत्या थराला जातील, याचा विचार न केलेलाच बरा.

अनेक गुन्हेगारी टोळ्या, सराईत गुन्हेगार अल्पवयीन मुलांचा गुन्ह्यांमध्ये वापर करून घेतात. 18 वर्षांखालील मुलांना कठोर शिक्षा होत नाही, हे आता सर्वश्रुत झाल्याने त्याचाच फायदा सज्ञान आरोपी घेताना दिसतात. सुरुवातीला पाकिटमारी, चोरी करणारी ही मुले पुढे घरफोडी, दरोडे तसेच हाणामारीच्याही सुपा-या घ्यायला मागेपुढे पाहत नाहीत.

शिक्षण, सामाजिक वातावरण, व्यसनाधीनता, सोशल मीडिया, मोबाईलचा अतिवापर, चित्रपट आणि मालिकांमधून होणारे गुन्हेगारीचे उदात्तीकरण अशी अनेक कारणे बालगुन्हेगारीसाठी पोषक आहेत, ज्यामुळे बालगुन्हेगारांचे प्रमाण वाढत आहे. मुलांच्या अगोदर पालकांचे ब्रेन वॉशिंग करायला हवे. कारण पोटाची खळगी भरण्यासाठी आलेली बि-हाडे रोजंदारीच्या गर्तेत एवढी अडकली आहेत, कि त्यामुळे त्यांना आपल्या मुलांकडेही लक्ष द्यायला वेळ नाही. कधीकधी हे पालक मुलांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करतात. लहानपणी लाडाने गालावर मारणारा चॅम्प पुढे जाऊन आई-वडिलांना मारहाण करणारा चॅम्पियन होतो, तेंव्हा पालकांच्या लक्षात येते की, वेळीच लक्ष दिलं असतं, वेळीच कान धरले असते तर आज ही वेळ आलीच नसती.

पिंपरी-चिंचवड पोलिसांनी बालगुन्हेगारांच्या समुपदेशनासाठी बालस्नेही पोलीस कक्ष निर्मितीचा उपक्रम हाती घेतला आहे. हा उपक्रम स्तुत्यच आहे. पण यात केवळ लहान खेळणी, घसरगुंडी, छोटा भीमच्या बाहुल्या ठेऊन चालणार नाही. बाहुल्या, घसरगुंडी खेळण्याच्या वयातील मुलं गुन्हेगारीकडे वळतच नाहीत. शिशु गटाच्या वरच्या गटातील मुलं बिघडू लागली आहेत, हे लक्षात घ्यायला हवं. जखम पायाला झाली अन उपचार हाताला केले, असं केलं तर सगळंच मुसळ केरात जायचं.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button