TOP Newsताज्या घडामोडीपुणे

गांधी मार्गानेच भारत पुढे गेला पाहिजे: संजय आवटे

पुणे : महाराष्ट्र गांधी स्मारक निधी तर्फे आयोजित राष्ट्रपिता महात्मा गांधी सप्ताहाचा समारोप शुक्रवारी सायंकाळी ज्येष्ठ पत्रकार संजय आवटे(संपादक, लोकमत,पुणे ) यांच्या उपस्थितीत झाला. गांधी भवन(कोथरूड) येथे शुक्रवारी, ७ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ६ वाजता हा कार्यक्रम झाला. संदीप बर्वे यांनी प्रास्ताविक केले, नीलम पंडित यांनी संविधानाच्या प्रास्ताविकेचे वाचन केले.
महाराष्ट्र गांधी स्मारक निधीचे सचिव अन्वर राजन हे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. प्रशांत कोठडिया, डॉ. प्रवीण सप्तर्षी, सचिन पांडुळे यांच्यासह अनेक मान्यवर सभागृहात उपस्थित होते.
संजय आवटे म्हणाले, ‘गांधींशिवाय भारताची जगात ओळख नाही. गांधी हे उत्तर आहे, समस्या नाही, त्यामुळे गंभीर चेहरा करुन गांधींची चर्चा करण्यापेक्षा जल्लोषात गांधी विचार जगात पोहोचविला पाहिजे. भोवतालच्या सर्व प्रश्नांवर गांधी सेलिब्रेट करणे, हे उत्तर आहे.
आपल्याला राष्ट्रपिता म्हणून गांधीजी लाभले, हा वारसा समजून घेतला पाहिजे. संवादाची माध्यमे नसताना अल्पावधीत गांधी हे अखंड , अवाढव्य भारताचे नेते झाले. अहिंसेच्या संकल्पनेवर त्यांनी देश जोडला आणि ते जीवंतपणे दंतकथा झाले.
ज्या काळात जगात हिटलर, मुसोलिनी यांच्यासारखे भयंकर नेते पुढे येत होते, तेव्हा भारतात गांधीसारखा महान नेता पुढे येत होते. आज हिटलर, मुसोलिनींना त्यांच्या देशात मान्यता नाही, पण जगात गांधीजींना मान्यता मिळाली.
लोकांच्या शहाणपणावर गांधींचा विश्वास होता.लोकांकडून ते शिकत होते. परंपरेच्या अधिष्ठानावर ते उभे होते.ते लोकशाहीवादी होते, व्यक्ती स्वातंत्र्याचे पाठीराखे होते.
गांधी, पटेल, नेहरू, बोस, आंबेडकर हे थोर नेते होते. ते प्रचंड मोठे काम करत होते, त्यांच्यात कार्यपध्दतीचे मतभेद असू शकतील, पण जे कामच करत नव्हते, त्यांनी या उठाठेवी करुन काय उपयोग ?
आवटे पुढे म्हणाले, ‘आपण आज बोलभांड, प्रतिक्रियावादी झाले आहोत. स्वातंत्र्यलढा, क्रांती हे पुण्याचे काम आहे, हे गांधीजींमुळे सर्वसामान्य माणसाला वाटले.गांधीजींनी प्रत्येकाला कार्यरत ठेवले. नंतर गांधीजींना आपण सोडून दिले. गांधीजींचे मॉडेल उलटे करुन त्यांच्या विचाराच्या विरोधकांनी वापरले. म्हणून त्यांचा राम वेगळया रथात बसला, गाय वेगळया गोटात गेली.
गांधींच्या आधीच्या आंदोलनांनी देशभक्त तयार केले. पण, गांधींनी देश उभा केला.गांधी अधिक नेहरू अधिक आंबेडकर हाच खरा भारत आहे.
गांधीजींसमोर जितकी भयंकर परिस्थिती होती, तितकी आज आपल्यासमोर नाही. नौआखालीत मुस्लीमाने गांधींजींचा खून केला नाही, तो खून नंतर कोणी केला, हे सर्वांनाच माहित आहे.गांधी समजून घेऊन पुढे गेले पाहिजे. गांधी मार्गाने आपण पुढे गेले पाहिजे. ‘आयडिया ऑफ इंडिया ‘ ही संकल्पना आपण मांडत राहिली पाहिजे,असेही आवटे यांनी सांगीतले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button